Join us

Mango History: जगाला आंबा या फळाची अशी भुरळ पडली, काय होता आंब्याचा इतिहास?

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 28, 2024 4:46 PM

बौद्धांपासून खिलजीपर्यंत आणि पेशव्यांपासून सामान्यांपर्यंत आपल्या सुंगधासह रसाळ, गोड चवीने आजही आंबा लाखोंच्या मनावर राज्य करत आहे.

आंबा कोणाला नाही आवडत? या  गोड, रसाळ फळानं भारतीयांच्या मनावर त्याचा सुवासासह चवीनंही सुमारे ४००० वर्षांपासून राज्य केलं आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि आंबे चाखण्याचं भारतातल्या लहानांचं नातं कित्येक वर्षांचं! हापूस, केशर, दशहरीसह पायरी, बदाम अशा कितीतरी नावांचा हा आंबा पाश्चात्य जगाला आंबा माहित झाला मागच्या ४०० वर्षांपासून! जाणून घेऊया आंब्याचा रसाळ इतिहास...

आंब्याचं मुळ शोधताना काही मनोरंजक ऐतिहासिक गोष्टी पुढे येतात. आंबा फार पूर्वीपासून भारतीयांना परिचित आहे. वैज्ञानिक जीवाश्म पुराव्यांवरून असं समोर येतं की २५ ते ३० दशलक्ष वर्षांपूर्वी इशान्य भारत, म्यानमार आणि बांग्लादेशात आंबा पहिल्यांदा दिसला आणि तिथून तो दक्षिण भारतात गेला.

...आणि जग या फळाला आंबा म्हणून ओळखू लागले

आंब्यांचं पहिलं नाव 'आम्रफळ' असं होतं. पुढे दक्षिणेत गेल्यावर त्याला तमिळी लोक 'आम-काय' असं म्हणू लागली. आंबा जसजसा वेगवेगळ्या समुदायापर्यंत पोहोचू लागला तसतसे भाषेतील अपभ्रंश वाढले. पुढे त्याचे 'मामकाय' झाले. मल्याळी लोकांनी त्याला पुढे 'मांगा' असे बदलले. केरळमध्ये आल्यानंतर पोर्तूगिजांना या फळाची भुरळ पडली आणि त्यांनी जगाला आंबा अशी या फळाची ओळख करून दिली.

पदवी देण्यासाठी आंब्याचं नाव

प्राचीन भारतात शासक वर्गात पदवी देण्यासाठी आंब्याच्या जातींची नावं वापरली गेल्याची अनेक उदाहरणं सापडतात. बौद्धकाळात वैशालीच्या प्रसिद्ध गणिका आम्रपाली यांना दिलेला सन्मान याचेच उदाहरण. आंब्याचे झाड ही प्रेमाची देवता. हिंदू राजा नंद याच्या राजवटीत अलेक्झांडर भारतात आला आणि राजा पोरसशी त्याचे युद्ध झाले. जेंव्हा त्याला ग्रीसमध्ये परत जाण्याची वेळ आली तेव्हा त्यानं आपल्यासोबत आंब्याचे अनेक  प्रकार नेले.

बौद्धांच्या काळात अनुयायांमध्ये आंबा हे विश्वास आणि समृद्ध असण्याचं एक प्रतिक होतं. त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बुद्धांच्या आणि आंब्याच्या झाडाच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत. पुढे भेटवस्तू म्हणून आंब्याची देवाणघेवाण करण्याची पद्धत सुरु झाली.

खिलजीच्या जेवणात आंब्याची मेजवानी

मध्ययुगीन काळात अल्लाउद्दिन खिलजी हा आंब्याचा मोठा चाहता. भारतात त्याच्या मेजवान्यांमध्ये आंब्याच्या वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असे. पुढे अनेक मुघल सम्राटांनी त्यांची आंब्याची आवड जपली. आणि आंबा मुघलकाळातही एका पिढीकडून दूसऱ्या पिढीकडे पोहोचत गेला.पेशव्यांनी मराठा वर्चस्वाचं प्रतिक म्हणून...

मराठ्यांचे पेशवे रघूनाथ यांनी मराठ्यांचे वर्चस्व दाखवून देण्यासाठी १ कोटी आंब्यांची झाडे लावली होती. साम्राज्याची ताकद दाखवणारा, लोककथांचा भाग असणारा फळांचा राजा आंबा पुढे ब्रिटीशकाळात सामान्यांचे घरगुती फळ बनला. पण तरीही त्याच्या गोड चवीने काहीशा वक्र आकाराने आणि बालपणीच्या जून्या आठवणींनी त्याची श्रेष्ठता कायम ठेवली आहे. आजही तो फळांचा राजा आहे. समृद्धी, आनंद आणि सुबत्तेचं प्रतिक म्हणून कुठल्याही शुभकार्यात आंब्याच्या पानांचं तोरण अजूनही लोक आपल्या दाराला लावतात. आंब्याच्या फोडी चाखून आजही आंबा भारतीय घरांमध्ये आनंद आणतोय..

टॅग्स :आंबाइतिहास