रब्बी हंगामात कडधान्य उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांसोबत पर्यायी, कमी खर्चिक आणि अधिक उत्पन्न देणारी पिके घेण्यास प्रोत्साहन देणे, यासाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना मसूर बियाण्यांचे मोफत वाटप सुरू करण्यात आले आहे. या योजनेतून मसूर लागवडीखालील क्षेत्र वाढवणे हे कृषी विभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
जिल्ह्यातील अनेक भागात कमी पर्जन्यमान किंवा मर्यादित सिंचन सुविधा असल्यामुळे अनेक शेतकरी रब्बी हंगामात पीक घेण्यास धजावत नाहीत. अशा परिस्थितीत कमी पाण्यावर येणारे आणि दुष्काळसदृश परिस्थितीतही तग धरू शकणारे मसूर हे पीक शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरत आहे.
प्रात्यक्षिकासाठी विविध गावांची निवड करून मसूर बियाण्यांचे मिनी किट्स तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक लाभार्थ्याला निर्धारित प्रमाणातील बियाण्याचे किट पूर्णपणे मोफत देण्यात येत आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, या योजनेमुळे मसूर लागवडीखालील क्षेत्र वाढेल. परिणामी देशांतर्गत कडधान्य उत्पादनात वाढ होऊन नागरिकांना अधिक पौष्टिक अन्नधान्य उपलब्ध होण्यास मदत होईल. मोफत बियाण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
मसूरमध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वे मुबलक !
कडधान्यांमध्ये मसूरला विशेष स्थान असून खिचडी, डाळ, डंपलिंग इत्यार्दीमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मसूरमध्ये सुमारे २५ टक्के प्रथिने, १.३ टक्के चरबी, ३.२ टक्के फायबर आणि ५७ टक्के कार्बोहायड्रेट असतात. कमी खर्च आणि कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळत असल्यामुळे मसूर लागवड शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.
असा घेता येणार लाभ
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी सहायक किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. मसूर बियाणे किट मिळवण्यासाठी सातबारा उतारा, आधारकार्ड, फार्मर आयडी आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
कृषी विभागाचे आवाहन
तालुका कृषी अधिकारी पवार म्हणाले की, मसूर हे पीक जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत करते. तसेच, बाजारपेठेत या पिकाची कायम मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होऊ शकते.
शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि शेतीत पीक वैविध्य आणावे. मोफत बियाणे वाटप केल्याने शेतकऱ्यांचा प्रारंभिक खर्च कमी होणार आहे आणि नवीन पीक पद्धतींचा प्रयोग करण्यासही प्रोत्साहन मिळणार आहे.
खामगावात बियाणे उपलब्ध
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत मसूर बियाणे वाटप करण्यात येत आहे. खामगाव तालुक्यात बियाणे उपलब्ध असून, कृषी सहाय्यकांमार्फत वाटप सुरू आहे. काही गावांमध्ये वाटप पूर्ण झाले असून काही ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा : उत्तम आरोग्यासाठी साखर खाणं हानिकारकच, पण गूळ किती चांगला? जाणून घ्या सविस्तर
