नाशिक : राष्ट्रीय कृषी विकास योजना- प्रति थेंब अधिक पिक (सुक्ष्म सिंचन) जिल्ह्यात सन 2025-26 साठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजना-प्रति थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन) योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक यांना 55 टक्के व बहुभूधारक शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान देय आहे. याशिवाय मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून अतिरिक्त 25 टक्के व 30 टक्के पूरक अनुदान, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत अतिरिक्त 10 टक्के व 15 टक्के पूरक अनुदान उपलब्ध होते. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना मंजुर मापदंडाच्या 90 टक्के च्या मर्यादेत अनुदान देण्यात येते.
शेतकऱ्यांनी अर्ज भरण्यासाठी https://mahadbt.maharastra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी अर्ज सादर करताना माहिती अचूक भरावी अन्यथा अर्ज रद्द होण्याची शक्यता असते.
अर्ज करताना ॲग्रीस्टॅक फार्मर आडी, आधार कार्ड, बँक पासबुक व जातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ 5 हेक्टर पर्यंत देण्यात येणार आहे. पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर स्वीकारले जातील.
अर्जाची महाडीबीटी पोर्टलवर संगणकीय सोडत काढण्यात येईल व निवड झाल्यानंतर शेतकऱ्याला लघु संदेशाद्वारे कळविण्यात येईल. पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना नोंदणीकृत कंपनीच्या अधिकृत वितरकाकडून संच खरेदी करता येईल. संच बसविल्यानंतर उप कृषी अधिकारी यांच्यामार्फत मोका तपासणी होईल आणि त्यांनतर शेतकऱ्याच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा सामूहिक सेवा केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन माने यांनी केले आहे.
