दिलीप मिसाळ
यंदाच्या रब्बी हंगामात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ज्वारीची विक्रमी पेरणी झाली असताना आता शेंडेअळीचा वाढलेला प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ करत आहे. (Sorghum Pest Control)
गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १३ हजार ५६९ हेक्टरने ज्वारीची पेरणी वाढली असली तरी अळीचा प्रकोप नियंत्रणात न आल्यास २५–३० टक्के उत्पादन घटण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे. (Sorghum Pest Control)
ज्वारी पेरणीत विक्रमी वाढ
२०२४–२५ मध्ये ज्वारीची पेरणी ३२ हजार ८०८ हेक्टर इतकी होती. मात्र, खरीप हंगामातील अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे सोयाबीन व कपाशीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीकडे अधिक कल दर्शवला.
याचा परिणाम म्हणून २०२५–२६ मध्ये पेरणी क्षेत्र
वाढ : १३ हजार ५६९ हेक्टर
एकूण क्षेत्र : ४६ हजार ३७७ हेक्टर
खरीपातील आर्थिक फटका, परतीच्या पावसामुळे जमिनीत टिकून राहिलेला ओलावा, कमी खर्च आणि कमी जोखीम या तिन्ही कारणांमुळे शेतकरी ज्वारीकडे वळले.
परंतु शेंडेअळीचा प्रादुर्भाव; पिकांना धोका वाढला
गल्लेबोरगाव परिसरात उगवलेल्या रब्बी ज्वारीवर शेंडेअळीचा हल्ला वाढत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीअंती स्पष्ट झाले आहे.
ढगाळ वातावरण, वाढलेली आर्द्रता आणि अनियमित पावसाचे चक्र या सर्व कारणांमुळे अळींची संख्या जलद गतीने वाढत आहे.
कृषी तज्ज्ञांचे मत काय?
अळी शेंडे, कोवळी पाने कुरतडते
दाणे विकसित होण्यापूर्वीच नुकसान
२५–३० टक्के उत्पादन घट होण्याची शक्यता
सामूहिक कीड नियंत्रण मोहिमेची मागणी
गावातील शेतकरी अमोल भोजने, किशोर बोडखे यांनी प्रशासनाला तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.
अळीचा प्रादुर्भाव वाढला
अळीचा फैलाव अत्यंत वेगाने होत आहे
केवळ वैयक्तिक फवारणीने नियंत्रण होत नाही
तालुकास्तरावर सामूहिक मोहीम हवी
फेरोमोन ट्रॅप, लाईट ट्रॅप, नीम अर्क वापरूनही प्रादुर्भाव थांबत नाही
असे करा उपाय
तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तरगे यांनी शेतकऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
* अळी दिसताच त्वरित फवारणी आवश्यक; उशीरात नुकसान वाढते
* शिफारस केलेली कीडनाशके वापरा
* इमामेक्टिन बेन्झोएट ५%
* स्पायनोसॅड ४५%
* क्लोरपायरिफॉस २०%
फवारणी करा
* पानांवर छिद्रे दिसताच फवारणी करावी
* सलग दोन–तीन दिवस प्रादुर्भाव निरीक्षण
* पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार मात्रा समायोजन करा
ज्वारी पेरणी वाढून जिल्ह्याला उत्पादनात उभारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, वाढलेला अळी प्रादुर्भाव रोखला नाही तर मोठ्या क्षेत्रातील पिकावर थेट परिणाम होणार आहे.
शेतकरी काय सांगतात?
* खरीपात झालेले नुकसानातून अजून सावरले नाही
* रब्बी ज्वारी हेच मुख्य उत्पन्नाचे साधन
* अळी नियंत्रण न झाले तर आर्थिक तोटा वाढणार
ज्वारीची विक्रमी पेरणी हा जिल्ह्यासाठी सकारात्मक संकेत असला तरी शेंडेअळीचा प्रादुर्भाव गंभीर होत आहे. प्रशासन आणि कृषी विभागाने तातडीने सामूहिक कीड नियंत्रण मोहीम राबवल्यासच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
