Sericulture Farming : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) जिल्हा परिषद कृषी विभागाच्या पुढाकाराने सोयगाव तालुक्यात रेशीम उद्योगाला नवीन उभारी मिळाली आहे. (Sericulture Farming)
शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणारा रेशीम उद्योग तालुक्यात जलद गतीने विस्तारत असून आतापर्यंत ५५ शेतकऱ्यांनी तुती लागवड यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. यातून १३ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उत्पन्न सुरू झाले असून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळू लागले आहे.(Sericulture Farming)
५५ एकरांत तुती लागवड
तालुक्यात एकूण ५५ एकरांवर तुतीचे रोपण करण्यात आले आहे. तुती लागवडीचा विशेष फायदा म्हणजे एकदा केलेला खर्च १५ ते २० वर्षे सतत उत्पादन देणारा ठरतो. रेशीम कोषाला बाजारात ४०० ते ६५० रुपये प्रतिकिलो इतका भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना नियमित व हमखास उत्पन्न मिळू लागले आहे.
शेतकऱ्यांना मोठा फायदा
प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांना कुशल व अकुशल कामांसाठी मिळून एकूण ४ लाख ३२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यामुळे तुती लागवड ते कोष उत्पादन या प्रक्रियेचा मोठा आर्थिक भार सरकार उचलत असून शेतकऱ्यांवरील गुंतवणुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
मका-कपाशीपेक्षा रेशीम उद्योग फायदेशीर
अत्यल्प उत्पन्न देणाऱ्या पारंपरिक मका व कपाशी पिकांमुळे झालेल्या नुकसानीनंतर अनेक शेतकरी पर्याय शोधत होते. रेशीम उद्योग हा कमी जोखमीचा, निश्चित उत्पन्न देणारा व्यवसाय असल्याने अनेकांनी याकडे वळण घेतले.
रेशीम उद्योगाची महत्त्वाची वैशिष्ट्ये काय?
एका एकरात ६६ तुती रोपांची लागवड
वर्षभर उत्पादन
नियमित काम आणि उत्पन्न
बाजारात चांगली मागणी
शेतकऱ्यांसाठी नवीन संधी
सोयगाव तालुक्यात रेशीम उद्योगाचा विस्तार होत असून पुढील काही महिन्यांत अधिक शेतकरी या उद्योगात सहभागी होतील, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. तुती लागवड आणि रेशीम उत्पादनामुळे शेतकऱ्यांना वर्षभर रोजगार मिळत आहे आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होत आहे.
शाश्वत उत्पन्नाची हमी
कपाशी आणि मका शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होत होते. पण रेशीम उद्योगात नियमित पैसा फिरतोय. कुटुंबाला चांगला हातभार लागतोय.- दिलीप पाटील, शेतकरी
शेतीपूरक व कुटुंबास श्रमाधारित रोजगार
रेशीम उद्योग हा शाश्वत उत्पादन देणारा, आर्थिक स्थैर्य मिळवून देणारा व्यवसाय आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल वाढत असून उत्पादनही हळूहळू वाढत आहे. - संतोष भालेराव, कृषी अधिकारी
