राजरत्न सिरसाट
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (पीडीकेव्ही) संशोधनात आणखी एक मोठी भर पडली आहे. विद्यापीठातील भाजीपाला संशोधन विभागाने लसणाची नवी, सुधारित व उच्च उत्पादनक्षम अशी ‘एकेजी-७ पीडीकेव्ही मोर्णा’ ही नव्याने विकसित केलेली जात राज्यात पेरणीसाठी अधिकृतपणे मान्य मिळाली आहे. (New Garlic Variety)
केंद्राच्या केंद्रीय वाण रिलिज उपसमितीने या जातीला महाराष्ट्रात पेरणीची परवानगी दिली असून, ही पीडीकेव्हीने विकसित केलेली पहिलीच सुधारित लसूण जात ठरली आहे.(New Garlic Variety)
उच्च उत्पादन व गुणवत्तेची हमी
नवीन 'पीडीकेव्ही मोर्णा' जातीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे पारंपरिक जातींपेक्षा अधिक उत्पादनक्षमता, एकसमान आकारमानाचे कांदे, अधिक रोगप्रतिकारक क्षमता आणि उत्कृष्ट साठवणूक गुणवत्ता.
बाजारपेठेत दीर्घकाळ तग धरू शकणारा आणि दराच्या चढ-उतारातही शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवून देणारा हा वाण भविष्यात लसूण उत्पादनाच्या क्षेत्रात गेम-चेंजर ठरणार असल्याचे संशोधकांचे मत आहे.
कुलगुरू व वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांचे संशोधन
पीडीकेव्हीचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली भाजीपाला संशोधन विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. एम. घावडे आणि त्यांच्या टीमने मागील अनेक वर्षे काटेकोर संशोधन करून ही जात विकसित केली.
हवामानातील बदलांना जुळवून घेण्याची क्षमता आणि जास्त उत्पादन तसेच उच्च गुणवत्तेच्या गाठ्या ही या जातीची खास वैशिष्ट्ये आहेत.
बियाण्यांचे वितरण सुरू
राज्यात लसूण उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी ‘पीडीकेव्ही मोर्णा’ हा वाण महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास विद्यापीठाने व्यक्त केला आहे.
परिसरातील विविध कृषी संस्था व अग्रगण्य शेतकऱ्यांना एकूण सहा क्विंटल बियाण्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी हंगामात या जातीची पेरणी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.
पीडीकेव्ही मोर्णा : प्रमुख वैशिष्ट्ये
उत्पादनक्षमता : प्रति हेक्टर १८ ते २३ क्विंटल
गाठींचे स्वरूप : पांढऱ्या शुभ्र रंगाच्या, सरासरी वजन २१ ग्रॅम
पाकळ्या (कळ्या) : प्रति गाठा १५ ते २३ पाकळ्या, पाकळी प्रमाण ४०.६%
काढणी कालावधी : १३० ते १३५ दिवस
साठवण क्षमता : सहा महिन्यांत फक्त १२.६% नुकसान — अतिशय कमी!
कृषीक्षेत्रासाठी मोठी संधी
लसूण हा दीर्घकालीन बाजारमूल्य असणारा पिक असल्याने, या सुधारित वाणामुळे शेतकऱ्यांना उच्च नफा तसेच बाजारपेठेतील स्पर्धेत लाभ मिळण्याची शक्यता मोठी आहे.
विशेषतः साठवणुकीदरम्यान कमी नुकसान होणे, एकसमान गाठी आणि उत्तम गुणवत्ता यामुळे व्यापाऱ्यांकडून मागणी वाढण्याची दाट शक्यता आहे.
राज्यातील लसूण उत्पादन वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न अधिक मजबूत करण्यासाठी 'पीडीकेव्ही मोर्णा' ही नवी जात महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
