- भूषण रामराजे
नंदुरबार : मिरची आगार असलेल्या नंदुरबारातमिरची आवक कमालीची घसरली आहे. या घसरणीचा थेट परिणाम शहरातील मिरची पावडर तयार करणाऱ्या उद्योगांवर झाला आहे. आतापासून या उद्योजकांना मालाच्या तुटवडा जाणवत आहे. नोव्हेंबर संपत असताना मिरची पावडर तयार करणाऱ्या उद्योगांकडे कच्चा माल म्हणून असलेली मिरची तुरळक प्रमाणात असल्याने यंदा नंदुरबारातील पावडर उद्योगाला आर्थिक फटका बसण्यासह किरकोळ बाजारात मिरची पावडरचे दर किलोमागे ३० ते ३५ टक्के वाढण्याचीही शक्यता आहे.
आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांसोबत महाराष्ट्रातील नंदुरबार येथील मिरची देशाच्या कानाकोपऱ्यातील व्यापारी खरेदी करतात. ऑक्टोबरपासून सुरू होणार नंदुरबार जिल्ह्यातील मिरची हंगाम थेट मार्च-एप्रिलपर्यंत सुरु राहत असल्याने मिरची खरेदी करणारे, पथारीवर सुकविणे आणि त्यापासून पावडर तयार करणे या उद्योगांना चालना मिळून रोजगाराची निर्मिती होते. यंदा हा उद्योग अधिक गतिमान होणार अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती.
प्रामुख्याने नंदुरबार आणि शहादा या दोन तालुक्यांत साडेसहा हजारपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात लाली, व्हीएनआर व तेजा या वाणांची लागवड झाल्याने शेतकरी आणि व्यापारी असे दोघेही खूश होते. परंतु, ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात अतिवृष्टी आणि खराब हवामान यामुळे मिरची पिकाला फटका बसून शेतकऱ्यांचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. हे निम्मे उत्पादन डिसेंबरमध्येच संपणार असल्याने पुढील चार महिने नंदुरबारचा मिरची उद्योग बंद पडणार आहे.
मिरची पावडर तयार करणारे उद्योजक अडचणीत
नंदुरबारमधील लाली, व्हीएनआर आणि तेजा या मिरची वाणांपासून तयार केलेली पावडर गुजरात आणि राजस्थानात सर्वाधिक मागणीची आहे. यातून महाराष्ट्रातही नंदुरबारची मिरची पोहोचते. नंदुरबारात पावडर तयार करणारे ४० कारखाने आहेत. या कारखानादारांकडे मिरची पावडर तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरेसा नाही. परिणामी मार्चनंतर पावडर तयार करण्याचा उद्योग काही काळासाठी बंद राहण्याची शक्यता आहे.
१० हजार टन मालाचा पुरवठादार नंदुरबार
नंदुरबार शहरातून दरवर्षी १० हजार टन मिरची पावडर तयार करून निर्यात केली जाते. यासाठी साधारण अडीच लाख क्विंटल मिरचीची खरेदी आवश्यक आहे. परंतु, यंदा मात्र १ लाख क्विंटलही मिरची येणार किंवा कसे याबाबत अंदाज बांधणे सुरू आहे. मिरची पुरेशी न आल्यास यंदा मिरचीचा उद्योग पाच हजार टनांपेक्षा कमी पावडर तयार करण्याची शक्यता आहे.
किरकोळ बाजार तापणार नंदुरबारातील मिरची उद्योजक, पथारीवरचे व्यापारी सध्या अडचणीत आहेत. मिरची सुकविण्यासाठी लागणारी मैदाने अर्थात पथारी भाड्याने घेत हा उद्योग चालतो. यंदा पथारीवर मिरची नसल्याने मैदानाचे भाडे भरणेही व्यापाऱ्यांना जड जात आहे.
नंदुरबार बाजारात केवळ ४० हजार क्विंटल आवक
नंदुरबार बाजारात आज अखेरीस ओल्या लाल मिरचीला १ हजार ६०० ते ५ हजार ५११ रुपये प्रतिक्विंटल दर दिला जात आहे. सुक्या लाल मिरचीला व्यापारी सर्वाधिक ६ हजार ६०० ते ११ हजार २०० प्रतिक्विंटल दर देण्यात येत आहेत. यंदाच्या हंगामात नोव्हेंबर महिन्यात हे सर्वाधिक दर आहेत. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात हे दर ९ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल होते. शुक्रवारपर्यंत (दि. २८ नोव्हेंबर) नंदुरबार बाजारात ४२ हजार क्विंटल मिरची आवक झाली आहे. आवक होत असलेली बहुतांश मिरची ही पाऊस आणि व्हायरसमुळे डागाळली असल्याचा दावा व्यापारी करत आहेत.
ही मिरची खराब असली तरी डिसेंबरनंतर बाजारात मिरची येणार नसल्याची चाहूल व्यापाऱ्यांना लागल्याने ही मिरची वाढीव दरांनी खरेदी होत आहे. या मिरचीपासून पावडर तयार करण्याची प्रक्रिया केली जाते. यंदाच्या हंगामात मिरचीचे 3 उत्पादन कमी होत असल्याने मिरची पावडरची प्रतिकिलो किंमत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्याचे दर हे थेट ३५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढल्याचे सांगण्यात आले आहेत. हे दर ४०० रुपयांच्या पुढे येत्या काही दिवसांत जाणार आहे.
