राज्य सरकारच्या संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेद्वारे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण उपलब्ध आहे.
ज्यामध्ये डीजीसीए (नागरी उड्डाण संचालनालय) मान्यताप्राप्त प्रशिक्षण, रोजगारक्षमता वाढवणे आणि स्वयंरोजगाराच्या संधी देणे यावर भर दिला जातो. यासाठी १८ ते ५५ वयोगटातील युवक-युवती अर्ज करू शकतात.
या प्रशिक्षणामुळे तरुणांना ड्रोन तंत्रज्ञानाची ओळख होऊन ते स्वावलंबी बनू शकतात. करिअरच्या नवीन संधीमुळे तरुणांनी या प्रशिक्षणाकडे वळावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दहा दिवस प्रशिक्षण
◼️ १० दिवसांचे डीजीसीए मान्यताप्राप्त प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणान्या उमेदवारांना अधिकृत रिमोट पायलट लायसन्स दिले जाणार आहे.
◼️ कृषी, सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि चलचित्र निर्मिती या क्षेत्रात करिअरच्या नव्या वाटा खुल्या होतील.
मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण
◼️ ड्रोन तंत्रज्ञान हे आजच्या युगातील सर्वात गतिशील आणि संधीने भरलेले क्षेत्र आहे. अनेकविध क्षेत्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढला आहे.
◼️ ही पार्श्वभूमी पाहता नव्या तंत्रज्ञानाच्या युगात तरुण-तरुणींना आधुनिक कौशल्यांनी सक्षम करण्यासाठी सरकारने मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण उपक्रम राबवला आहे.
विविध अभ्यासक्रम
१) मध्यम व लघू वर्गातील ड्रोन पायलट प्रशिक्षण.
२) प्रशिक्षक प्रशिक्षण.
३) कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर.
४) आपत्ती व्यवस्थापनासाठी ड्रोन तंत्रज्ञान.
५) नकाशांकन व सर्वेक्षण.
६) ड्रोन देखभाल व दुरुस्ती.
७) ड्रोन छायाचित्रण व व्हिडिओ निर्मिती.
८) व्यवस्थापन आणि सुरक्षा प्रशिक्षण.
यांना घेता येणार लाभ
◼️ राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असावा.
◼️ वय १८ ते ५५ वर्षादरम्यान असावे.
◼️ उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान १० वी उत्तीर्ण असावा.
◼️ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
◼️ शेतकरी कुटुंबातील उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
◼️ ज्यांना इतर सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही असे तरुण-तरुणी अशांना या प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
◼️ अर्जदाराचा नोदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांचा फिटनेस दाखला आवश्यक.
(वैद्यकीय दाखल्याचा नमुना डाऊनलोड करून वैद्यकीय अधिकारी यांचे स्वाक्षरीनंतर संकेतस्थळावर अपलोड करावा)
◼️ लाभार्थ्याकडे भारतीय पारपत्र (पासपोर्ट)/वाहन चालक परवाना/शिधा पत्रिका यापैकी उपलब्ध दस्तऐवजाची स्वस्वाक्षरीत प्रत जोडावी.
◼️ उमेदवाराच्या स्वत:च्या आधार संलग्न बँक खात्याचा तपशिल बँकेचे नाव, शाखेचे नाव, बँक खाते क्रमांक, खाते प्रकार, IFSC कोड.
अर्ज करण्याची पध्दत
◼️ अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक अर्जदारांनी विहीत नमुन्यामध्ये विहित मुदतीत अमृतच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील.
◼️ अर्जाची एक हार्डप्रिंट स्वाक्षरीत करून आवश्यक सर्व दस्तऐवज स्वसाक्षांकित करून अमृतच्या कार्यालयास दिलेल्या विहीत मुदतीत सादर करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
या प्रशिक्षणासाठी अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील अमृत संस्थेच्या जिल्हा व्यवस्थापक यांचेशी संपर्क साधावा.
अधिक वाचा: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेत मोठा बदल; आता शेत रस्त्यांच्या कामांना येणार वेग
