दत्तात्रय पाटील
महावितरणच्या तांत्रिक चुकीमुळे ५ व ७.५ ऐवजी ७.५१ ते ९.९९ अश्वशक्ती असा उल्लेख झाल्याने अनेक शेतकरी वीजबिल माफीतून अपात्र ठरले आहेत. आता त्या शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाची महावितरणच्या मुरगूड (जि.कोल्हापूर) विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. प्रत्यक्ष पाहणीत पंपाची अश्वशक्ती ७.५ पेक्षा कमी असेल तर तो शेतकरी शासनाच्या वीजबिल माफीसाठी पात्र होणार आहे.
कृषी पंपधारक शेतकऱ्यांना वीज बिलमाफीचा लाभ मिळावा यासाठी मुरगूडचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विहिरींसह नदीकाठावरील पंपांची पाहणी करण्यासाठी पायाला भिंगरी बांधली आहे. यामुळे प्रत्यक्षात ७.५ अश्वशक्तीपेक्षा कमी असणाऱ्या पंपधारक शेतकऱ्यांची या महिन्याअखेरीस येणाऱ्या वीजबिलातून मुक्तता होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून अधिकाऱ्यांना शेती पंपाना प्रत्यक्ष भेटी देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मुरगूड अंतर्गत येणाऱ्या ५८ गावांत ११ हजार ५०० कृषी पंपधारक आहेत. यापैकी ९०८ वीजग्राहक अपात्र होते. या ग्राहकापैकी ५४४ ग्राहकांची प्रत्यक्ष पाहणी पूर्ण झाली आहे. पात्र शेतकऱ्यांना वीज माफीचा लाभ मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अपात्र
विद्युत पंपांची मागणी केलेल्या शेतकऱ्यांना महावितरणकडून मागणीप्रमाणे तीन, पाच, साडेसात अश्वशक्तीची मंजुरीही मिळाली आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या वीजबिलावर परवान्याचा उल्लेख ८ किंवा त्यापेक्षा अधिक अश्वशक्ती असा केला जात आहे. महावितरणच्या या अनागोंदी कारभारामुळे शेकडो शेतकरी वीजबिल माफीपासून वंचित राहणार होते.
बानगेतून आंदोलनाची वात...
सर्वच शेतकऱ्यांना वीज बिलमाफीचा लाभ मिळावा. तसेच ७.५ एचपी खालील शेतकऱ्यांच्या बिलाची दुरुस्ती व्हावी यासाठी १५ सप्टेंबर २४ रोजी प्रताप होगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बानगे येथे मेळावा घेऊन शासनाचे लक्ष वेधले होते. तसेच परिसरातील शेतकऱ्यांनीही पालकमंत्र्यांसह अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता.
वरिष्ठ लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या सूचनेनुसार वीजपंपाची प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. नदी काठावरील काही शेतकऱ्यांनी पावसाळ्यात घरी आणलेले पंप जोडलेले नाहीत. संबंधित शेतकऱ्यांनी पंप जोडणी करून कळवावे. - शरदकुमार संकपाळ, उपकार्यकारी अभियंता, मुरगूड ता.कागल जि.कोल्हापूर.
अशी होत आहे अश्वशक्ती तपासणी
विहीर अथवा नदीकाठी असणाऱ्या पंपाची पाहणी करण्यासाठी तो पंप सुरू केला जातो. तसेच अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने विद्युत पेटीतील अश्वशक्ती तपासली जाते. तसेच, पंपावरही संबंधित कंपनीच्या अश्वशक्ती नोंदीचीही दखल घेऊन अहवाल तयार केला जात आहे.
