प्रसन्न मनामुळे सर्वकार्ये सिद्धीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 08:07 AM2019-10-14T08:07:54+5:302019-10-14T08:10:19+5:30

ज्याचे मन अत्यंत प्रसन्न आहे, त्याचे सर्वकार्य सिद्धीस जाते. चैतन्यमय आनंद त्यांच्या मनात मावत नाही. चेहऱ्यावरचा भाव सहज टिपता येतो.

the spiritual secrets of happiness health and success | प्रसन्न मनामुळे सर्वकार्ये सिद्धीस

प्रसन्न मनामुळे सर्वकार्ये सिद्धीस

Next

ज्याचे मन अत्यंत प्रसन्न आहे, त्याचे सर्वकार्य सिद्धीस जाते. चैतन्यमय आनंद त्यांच्या मनात मावत नाही. चेहऱ्यावरचा भाव सहज टिपता येतो. प्रसन्न मन असणाऱ्या माणसांचे बोलणे सहजतेने बाहेर पडते. त्यांच्या बोलण्याचा लोकांच्या मनावर चांगला परिणाम होतो. लोक त्यांच्या प्रभावाखाली येतात. त्यांच्या सान्निध्यात आल्यास जीवनाला काही नवा अर्थ मिळतो. जगण्याला नवा ध्यास मिळून जीवन सात्त्विकतेत जाते. चेहऱ्यावर तेजाची एक झलक असते. स्वत:मध्ये एक वेगळी ऊर्जा उत्पन्न झाल्यासारखे वाटते. अंतर्मनात एक नाद ऐकू येतो. तो आतला आवाज असतो. तोच आवाज ईश्वराचा असतो. तेज:पुंज चेहरा बनतो.

आपल्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकाला त्या प्रकाशाची जाणीव होते. आपल्या मनात येणाऱ्या विचाराला कुठेतरी आळा बसतो. मनात प्रसन्नतेची हुबेहुब प्रतिकृती आकार घेते. त्यामुळे दृष्टी फिरेल तिकडे प्रसन्नतेचे मळे फुललेले दिसून येतात. सगळ्या समस्यांचे मन निवारण करते. प्रसन्न मनच सर्वसिद्धीस कारणीभूत असते. सिद्धी प्राप्त झाल्यास सर्व गोष्टी आपोआपच प्राप्त होतात. मनाचा आखाडा फार मोठा आहे. त्याला प्रसन्न करणे एवढे सोपे नसते; परंतु एकदा का ते प्रसन्न झाले की सर्वसुखाची अनुभूती येते. मनातील सर्वसंकल्प पूर्णत्वाला जातात. त्यामुळे समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम करता येते. जीवनमुक्तीचा संदेश देता येतो. प्रसन्न मनामुळे असाध्य ते साध्य होते. मनाच्या प्रसन्नतेवरच जीवा-शिवाची भेट अवलंबून आहे. समाजामध्ये आदराचे स्थान निर्माण करणे हेही मनाच्या प्रसन्नतेवरच आहे. प्रसन्न मन असलेल्या व्यक्तीच्या सहवासात आल्यास अलौकिक आनंदाची प्राप्ती होते. उभ्या आयुष्यातली दु:खे गळून पडतात. दैवगतीच बदलून जाते.

प्रसन्न मनाची व्यक्ती कुणाचा द्वेष करत नाही. आपल्या आपल्या आनंदात मग्न असते. तो कुणालाही दोष देत नाही, कुणाच्या डोक्यावर ओझे टाकत नाही. त्यांच्या मनात कुठलेही विचार घोंगवत नाहीत. आपल्या ध्येयापासून विचलित होत नाही. सहनशीलता दया-क्षमा-शांती या गुणांची त्याच्या जवळ खाण असते. जीवनातला गुणार्थ त्याला कळलेला असतो. त्याची बुद्धी तल्लख असते. प्रसन्न मन असलेल्या व्यक्ती परिस्थितीला आनंदाने सामोरे जातात. जी परिस्थिती उद्भवेल तिचा सामना शांतपणे करतात. त्यांचा आत्मविश्वास दृढ असतो. त्यांचे कार्य सूर्यासारखे देदीप्यमान असते. प्रसन्न मन ठेवल्यास व असल्यास सर्वसुखाची बाग बहरून येते.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

Web Title: the spiritual secrets of happiness health and success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.