भगवंत भक्तीत अर्पणवृत्ती महत्त्वाची

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 05:11 AM2020-01-04T05:11:15+5:302020-01-04T05:11:31+5:30

भगवंतांची प्राप्ती व्हावी, हा सदभाव सर्वांगात एकदा का सळसळू लागला की, मर्त्य विश्वातल्या कुठल्याही स्वरूपातल्या गोष्टींविषयी अथवा पदार्थांविषयी मनात आसक्तीच निर्माण होत नाही.

Sacrifice is important in devotion | भगवंत भक्तीत अर्पणवृत्ती महत्त्वाची

भगवंत भक्तीत अर्पणवृत्ती महत्त्वाची

Next

- वामन देशपांडे

फलेच्छेतून निर्माण झालेली कर्मासक्ती माणसाला कर्मबंधनात अडकविते. सत्यच जर सांगायचे झाले, तर कर्मबंधनातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कर्म आणि कर्मफल त्याविषयी वाटणारी विलक्षण ममता आणि तीव्र स्वरूपातली आसक्ती पूर्णपणे नष्ट होणे अत्यंत आवश्यक आहे. भगवंतांची प्राप्ती व्हावी, हा सदभाव सर्वांगात एकदा का सळसळू लागला की, मर्त्य विश्वातल्या कुठल्याही स्वरूपातल्या गोष्टींविषयी अथवा पदार्थांविषयी मनात आसक्तीच निर्माण होत नाही. स्वत:च्या देहाविषयी ममता सहजरीत्या लोप पावते. ही सर्वोत्तम साधनावस्था असते. अशा उच्चावस्थेला एकदा का साधक पोहोचला की, तो करीत असलेले प्रत्येक कर्म मग तो भगवंतांचे स्मरण करीत, त्याच्याच साक्षीने करतो आणि पूर्ण झालेले कर्म, फलासहित भगवंतांनाच अर्पण करतो. फक्त भगवंतांचीच उपासना करतो, अशा श्रेष्ठ साधकांविषयी आपले मत प्रकट करताना म्हणतात की,
तेषामहं समुद्धता मृत्युसंसारसागरात।
भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम।।
पार्था, ज्या साधक भक्तांचे अवघे चित्त माझ्यातच पूर्णपणे गुंतलेले असते, जे केवळ माझ्याच नामसाधनेत गुंतलेले असतात, अशा श्रेष्ठ परमभक्तांना मृत्यूसम असलेल्या संसारसागरातून अलगदपणे उचलून घेत, मोक्षमार्गावर आणून सोडतो. जन्ममृत्यूच्या चक्रातून
सोडवितो. त्याचा योग्यसमयी उद्धार करतो. त्यांना मोक्षाचे वरदान देतो. भगवंतांप्रती एकदा का अर्पणवृत्ती निर्माण झाली, भगवंतांसाठी प्रत्येक कर्म करण्यास मन उद्युक्त झाले की, भक्तियोग खऱ्या अर्थाने सिद्ध होतो. अशा परमभक्तीतच साधकाची साधना पूर्णत्वाला पोहोचते. देहबुद्धी संपुष्टात आली की, आत्मसाक्षीने जगणे सुरू होते. सर्वस्वाचा त्याग करून आयुष्य भगवंतभक्तीत एकदा का तन्मय झाले की, भक्ती साधनेला विलक्षण गती प्राप्त होते.

Web Title: Sacrifice is important in devotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.