पंढरीची वारी म्हणजे भागवत धर्मियांचे महाप्रचंड संमेलनच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 07:34 PM2019-07-12T19:34:06+5:302019-07-12T19:34:36+5:30

आपल्या सर्व प्रापंचीक अडचणीचे ओझे त्या विठ्ठलरुपी ईश्वराच्या स्वाधीन करुन इहलोकीच्या स्वर्गाकडे प्रयाण करणे आणि अशा सोहळयाचे रुप दृष्टीक्षेपात येणे हे भाग्यच आहे.

Pandharpur Wari is the biggest gathering of Bhagwat Dharma's | पंढरीची वारी म्हणजे भागवत धर्मियांचे महाप्रचंड संमेलनच 

पंढरीची वारी म्हणजे भागवत धर्मियांचे महाप्रचंड संमेलनच 

Next

- डॉ भालचंद्र ना. संगनवार

                     आवडीने भावे हरिनाम घेशी 
                      तूझी चिंता त्याशी सर्व आहे.

 

मानवी आस्था भक्ती, नियमन आणि संयम याचा अनोखा मिलाप आपणास आषाढी आणि कार्तिकीस पहावयास मिळतो. अत्यंत निर्विकार पणे सर्व प्रापंचीक अडचणी बाजूस ठेऊन वारकरी मोठया श्रध्देने भूलोकीचा स्वर्ग असणाऱ्या पंढरपूरी विठ्ठल दर्शनास निघतात. मनाची शक्ती इतकी प्रबळ असते की स्वत:च्या जिवाची पर्वा न करता विविध व्याधीवर मात करत मार्गक्रमण करीत असतात. देह जावो अथवा राहो पांडूरंगी दृष्ठ भावो या संकल्पनेला साजेसे आचरण सर्वत्र पहावयास मिळते. गरीब-श्रीमंत, लहान-थोर हा विषय कूठेच दृष्टीपथात दिसत नाही, जनू कांही सर्व विश्व विठ्ठलमय झाल्याचे दिसते. एवढी उर्जा, स्वयंनियमन व निर्धार कोठून निर्माण होते हे खरेच न उलगडणारे कोडे आहे. आपल्या सर्व प्रापंचीक अडचणीचे ओझे त्या विठ्ठलरुपी ईश्वराच्या स्वाधीन करुन इहलोकीच्या स्वर्गाकडे प्रयाण करणे आणि अशा सोहळयाचे रुप दृष्टीक्षेपात येणे हे भाग्यच आहे.
 

        वाहूनी प्रवाहात भक्तीच्या तूज्या 
        आज मी पावन झालो
        नाही तूळशी माळा गळा तरी
        विठ्ठला मी वारकरी झालो.

ज्या संपूर्ण जगताला आपल्या अतूट आंतरीक संबंधाने बांधून ठेवले त्याचे वर्णन शब्दात मावत नाहीच. खऱ्या अर्थाने सर्व जाती, धर्म, पंथाच्या पूढे जाऊन समाजातल्या सर्व घटकाला ‘यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर’ असे आवाहन करणाऱ्या मानवधर्मीय वारकऱ्यांची परंपरा खरोखरच मानवाला सूख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखऊन जातात. पंढरीची वारी ही भागवत धर्मियांचे महाप्रचंड संमेलनच आहे असे बहूतांना वाटते.

पंढरीची वारी आणि वारकरी यांच्या आचरणात तत्वज्ञानाचे प्रयोजन आणि आदर्श जीवनप्रणाली निर्माण करु शकत़े नीति मूल्यांची जपणूक करणारी प्रणाली बनावी असे अभिप्रेत आहे. तत्वज्ञानाचा मूख्य गाभा हा शास्त्रानिष्ठ आणि आत्मनिष्ठ या दोन्हींचा समन्वय आहे. महाराष्ट्राच्या जडण घडणीत वारकरी संप्रदायाचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे. भक्तीच्या माध्यमातून सोपी वाट सामान्य जनतेच्या, स्त्रियांच्या, उपेक्षिताच्या अंतकरणात निर्माण करण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने केले आहे. आपण सर्व समान आहोत असा आत्मविश्वास सर्वामध्ये निर्माण करण्याचे कार्य या माध्यमातून झाले आहे व होत आहे. याचा परिणाम असा झाला की ही समाजातील भेदाभेद नाहीसा होण्यास चालना मिळाली. मराठी मनांवर निरंतर अधिराज्य गाजविणाऱ्या या दैवताचे निर्देश श्रृतिस्मृती पूराणांनी केलेले नाहीत. विठ्ठल हा संताच्या भावकोशात विष्णूकृष्णरुप मानला गेला असून तो सहस्त्राआगळा आहे. त्यामूळेच या वारकरी संप्रदायात समानतेच्या तत्वावर विठ्ठलाच्या भक्तीत भागवत धर्माच्या पताकेखाली सर्व भक्त समान आहेत. भक्तीच्या माध्यमातून सामान्य जनतेत आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य या संप्रदायाने केले आहे. 

(लेखक लातूर येथे जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत ) 

Web Title: Pandharpur Wari is the biggest gathering of Bhagwat Dharma's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.