जनतेला विवेकानंदांचे विचार आत्मसात करायला शिकवण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 08:08 AM2020-01-12T08:08:03+5:302020-01-12T08:09:57+5:30

देशात दोन धर्मात जी अढी आणि विद्वेशाचे वातावरण पसरत आहे ते पाहिले तर आज स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या विचारांचे स्मरण आणि आचरण करण्याची नितांत जरुरी आहे

The need to educate the masses to adopt the thoughts of Vivekananda | जनतेला विवेकानंदांचे विचार आत्मसात करायला शिकवण्याची गरज

जनतेला विवेकानंदांचे विचार आत्मसात करायला शिकवण्याची गरज

Next

- देवेंद्र कांदोळकर

भगवे वस्त्र आणि नावाआधी आलेला ‘स्वामी’ हा शब्द पाहून अनेकानां विवेकानंद हे कट्टर हिन्दुत्ववादी होते, असे वाटत आले आहे. सध्या आपल्या देशात दोन धर्मात जी अढी आणि विद्वेशाचे वातावरण पसरत आहे ते पाहिले तर आज स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या विचारांचे स्मरण आणि आचरण करण्याची नितांत जरुरी आहे.

अलीकडे एनकेन प्रकारे हिंदुत्वाचे धृवीकरण केले जात आहे आणि मुस्लीमद्वेष झपाट्याने फैलावत आहे. ‘देश सध्या कठीण काळातून जात आहे. हिंसाचार थांबल्याशिवाय नागरिकत्व कायद्याच्या घटनात्मक वैधतेवर सुनावणी न करण्याचा निर्णय’ भारताच्या सरन्यायधिशाना घ्यावा लागत आहे . अशा या पार्श्वभूमीवर आज स्वामी विवेकानंद असते तर काय म्हणाले असते ?

‘आपल्या मायभूमीच्या दृष्टीने विचार करता हिंदू धर्म आणि इस्लाम धर्म यांचा समन्वय अर्थात वेदांतातील एकत्वाचे तत्वज्ञान आणि इस्लाम धर्मामधील प्रत्यक्षातील समता यांचा मिलाफ हेच एकमेव आशास्थान आहे . वेदांती मेंदू आणि इस्लामी देह धारण करून भावी भारत उदयास येणार आहे...’


इस्लामलाही सलाम करणाऱ्या स्वामी विवेकानंदांचे हे विचार आपण कधी समजून घेणार?
विवेकानंद म्हणायचे, ‘माझा तर असा अनुभव आहे की आजवर जर कोणता धर्म समतेच्या निकट पोहोचला असेल तर तो इस्लाम धर्मच आहे . भारतावर मुसलमानांनी मिळवलेला विजय गरिबांच्या व दलितांच्या उन्नतीस कारणीभूत झाला म्हणूनच आपल्यापैकी एक पंचमांश लोक मुसलमान बनले. तलवार आणि विध्वंस याच्या जोरावर इस्लामने धर्मांतर केले असे म्हणणे मुर्खपणा आहे .’

स्वामींच्या या सांगण्याने आमच्यात शहाणपण येईल का?
‘जग आज सहिष्णूतेच्या तत्वाची अपेक्षा करत आहे. धर्म सहिष्णुता आत्मसात केल्याशिवाय कोणतीच सभ्यता दीर्घकाळ टिकू शकणार नाही. दुराग्रह, रक्तपात व पाशवी अत्याचार थांबविल्याशिवाय कोणत्याही सभ्यतेचा विकास होणे शक्य नाही. एकमेकांकडे सहानुभूतीने पाहिल्याशिवाय कोणतीही सभ्यता डोके वर काढू शकणार नाही. सहानुभूती निर्माण करण्याची पहिली पायरी म्हणजे एकमेकांच्या धार्मिक मतांकडे सहानुभूतीने पाहाणे. आपल्या धर्म कल्पना व समजुती कितीही भिन्न असल्या तरी आपण परस्परांना सहाय्य केले पाहिजे.’

जनतेला आपण विवेकानंदांचे हे विचार आत्मसात करायला शिकवणार की त्यांना दुराग्रह, कट्टरता, सांप्रदायिकतेच्या गर्तेत ढकलणार?
वयाच्या तिसाव्या वर्षी शिकागो येथील विश्व धर्म संमेलनप्रसंगी भाषण करतेवेळी स्वामी विवेकानंद म्हणाले होते, ‘माझ्या भगिनीनो आणि बंधुनो , सर्व धर्मांची जननी असलेल्या, सर्व जाती - पंथांच्या लाखो- करोडो हिंदूंच्या वतीने आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद देतो. जगातील सहिष्णुता व सर्वसमावेशकतेचा संदेश देणाऱ्या धमार्चा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे. आम्ही केवळ सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेवरच विश्वास ठेवतो असे नाही तर जगातील प्रत्येक धर्माचा सत्य म्हणून स्वीकार करतो. जगाच्या पाठीवरील सर्व देशातील आणि धर्मातील पीडित व गांजलेल्या लोकांना आश्रय देणाºया देशाचा नागरिक असल्याचा मला आभिमान आहे.’

स्वामी विवेकानंदांच्या जयंती दिनी विविध कार्यक्रम व परिषदा आयोजन करणारे कार्यकर्ते , भगवी वस्त्र परिधान करणारे योगी, ‘मेरे प्यारे भाईयो और बहनो...’ अशा सुरुवातीसह भाषणे करणारे नेते आणि श्रोते यांनी आता स्वत:लाच विचारायची वेळ आली आहे ; आपण सारे स्वामी विवेकानंदांना अभिमान वाटणाऱ्या उपरोल्लोखित शिकवणीचा मान राखतो की अवमान करतो ?

Web Title: The need to educate the masses to adopt the thoughts of Vivekananda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.