परमार्थासाठी मन आवश्यक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:49 PM2020-01-11T12:49:21+5:302020-01-11T12:49:27+5:30

 परमाथार्साठी तर हे मन आणि चित्तच मोठं भांडवल असते. जेथे मन असते तेथे मनुष्य राहतो. म्हणूनच परमार्थासाठी मन आवश्यक असते.

Mind is must for Paramartha! | परमार्थासाठी मन आवश्यक!

परमार्थासाठी मन आवश्यक!

googlenewsNext

इंद्रियांपेक्षा मन, मनापेक्षा बुद्धी, बुद्धीपेक्षा आत्मस्वरूप श्रेष्ठ आहे, हे सांगण्याचं कारण खरा प्राधान्यक्रम कशाला दिला पाहिजे, हे बिंबवणं आहे. नुसती बुद्धी श्रेष्ठ नाही, आत्मस्वरूपस्थ बुद्धी श्रेष्ठ आहे. नुसतं मन श्रेष्ठ नाही, आत्मबुद्धीच्या ताब्यातलं मन श्रेष्ठ आहे. नुसती इंद्रियं श्रेष्ठ नाहीत, आत्मबुद्धीच्या ताब्यातील मनानं संयमित इंद्रियं श्रेष्ठ आहेत! तेव्हा आज मनाच्या ताब्यात बुद्धी असेल, तर मन समर्पित झालं की बुद्धी समर्पित होईल.
 मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चार गोष्टींनी आपलं अंत:करण बनलं आहे. म्हणून या चार गोष्टींना अंत:करण चातुष्ट? म्हणतात. मग इथे मन आणि बुद्धी या दोघांचाच उल्लेख का? कारण मन आणि बुद्धी सूक्ष्म आहेच, पण चित्त आणि अहं अधिकच सूक्ष्म आहे! बुद्धीच्या प्रत्येक तरंगाचा साठा जिथे होतो, त्याला ‘चित्त‘ म्हणतात.  या तिन्हींच्या अनंत तरंगांची साठवण असल्याने हे चित्तही त्रिगुणांनी संस्कारित असतं. अनंत विकार, अनंत संकल्प-विकल्पांनी भरलेलं चित्त मलीन होऊन जातं. मन, बुद्धीच्या कार्यप्रक्रियेत हेच चित्त, अर्थात चित्तातले ठसे सोबत करतात. त्यामुळेच चित्तशुद्धी, मनाचं न-मन आणि बुद्धीची सद्बुद्धी होणं, या गोष्टी साधनेचं लक्ष्य असतात. मन, चित्त आणि बुद्धी सद्गुरूचरणी एकवटली तर ‘अहं’च्या ऐवजी ‘सोऽहं’चं स्फुरण होईल!
ज्याला प्रपंच नाही करता आला। त्याचा परमार्थ ढिला पडला।। हे वाचताच आपल्या मनात जो अर्थ उमटतो तो खरा नाही! प्रपंचालाच केंद्रबिंदू मानून आपण जगत आहोत. त्यामुळे या वाक्यात प्रपंचाचीच थोरवी गायली आहे, असंच आपल्याला वाटतं. जो प्रपंच नीट करू शकत नाही तो परमार्थही करू शकत नाही, असा याचा अर्थ आपल्याला वाटतो. परमाथार्साठी आधी प्रपंच नीट करणं आवश्यक आणि महत्त्वाचं आहे.
परमार्थ ही वृत्ती आहे. प्रपंच ही कृती आहे.याचाच अर्थ प्रपंच ही करण्याची गोष्ट आहे. कृती आहे. ती कृती जर योग्य प्रकारे केली नाही तर वृत्ती आटोक्यात राहाणार नाही. ती ढिली पडेल. परमार्थ हा वृत्तीवरच अवलंबून असल्याने जर प्रपंचाची कृती अयोग्य झाली तर परमार्थही ढिला पडेल.  परमाथार्साठी तर हे मन आणि चित्तच मोठं भांडवल असते. जेथे मन असते तेथे मनुष्य राहतो. म्हणूनच परमार्थासाठी मन आवश्यक असते.

- वेदांताचार्य श्री राधेराधे महाराज
बर्डेश्वर संस्थान, तरवाडी.

Web Title: Mind is must for Paramartha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.