मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रताची कथा, महत्व आहे तरी काय? वाचा फक्त एका क्लिकवर

By Manali.bagul | Published: December 17, 2020 01:33 PM2020-12-17T13:33:17+5:302020-12-17T13:37:35+5:30

Margashirsha guruvar vrat katha : लक्ष्मीची पूजा करुन उपवास करतात.

Margashirsha guruvar vrat : Significance and importance of Margashirsha guruvar vrat | मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रताची कथा, महत्व आहे तरी काय? वाचा फक्त एका क्लिकवर

मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रताची कथा, महत्व आहे तरी काय? वाचा फक्त एका क्लिकवर

googlenewsNext

मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते. अनेक घरांमध्ये वर्षानुवर्ष महिला या प्रकारचे व्रत करतात.  गुरुवारी अनेक सुवासिनी स्त्रीया मनोभावे हे व्रत करतात. लक्ष्मीची पूजा करुन उपवास करतात. सवाष्ण स्त्रियांना हळदी कुंकू लावून वाण दिले जाते. आजपासून या व्रतांची सुरूवात झाली. यानिमि्त्ताने आम्ही तुम्हाला  या उपवासाचे महत्व आणि पूजेच्या कथेबाबत सांगणार आहोत.

मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रताची कथा

सौराष्ट्राचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शुर व प्रजादक्ष होता. त्याच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका होतं. राणी दिसायला अतिशय सुंदर मात्र प्रचंड अहंकारी होती. सुख, समृद्धी, ऐश्वर्यात राणी लोळत होती. राजाही लाड, कौतुक करत असल्याने ती अधिकच गर्वाने फुगली. त्या दोघांना सात पुत्र आणि एक कन्या झाली. या कन्येचे नाव शामबाला होतं.

एके दिवशी लक्ष्मी देवीने विचार केला की मी भद्रश्रवा राजाकडे काही दिवस जावून राहते. त्यामुळे त्याच्या संपत्तीत अधिकच वाढ होईल. परिणामी प्रजाही सुखी होईल. मी जर कोणा गरिबाकडे गेले तर स्वार्थाने तो स्वतःचे हित पाहील. म्हणून लक्ष्मी देवी वृद्ध ब्राह्मण स्त्री चे रुप धारण करुन भद्रश्रवा राजाच्या दरबारी येते. वृद्ध स्त्री चे रुप धारण करुनही तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते. तिला पाहताच दरबारातील एका दासीने तिची विचारपूस केली. 

त्यावर वृद्ध स्त्रीच्या रुपातील लक्ष्मी देवीने सांगितले की, तुझी राणी मागच्या जम्नात ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्यासोबत अजिबात पटत नसे. एके दिवशी नेहमीच्या भांडणांना विसरुन ती रागाने घराबाहेर पडली. रानातून अनवाणी चालत असताना तिला काही सुवासिनी व्रत करताना दिसल्या. ते लक्ष्मीचं व्रत होतं. ते पाहिल्यानंतर तीही त्या व्रतात सहभागी झाली. व्रतात इतकी रमली की ती आपले दुःख विसरली. तिचं दारिद्रय नष्ट झालं.

लक्ष्मीची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली. कालांतराने ती मरण पावली आणि पुढील जन्मात भद्रश्रवा राजाची राणी झाली. राणी झाल्याने ती ऐश्वर्यात लोळू लागली. मात्र देवीला विसरली. म्हणून त्याचीच आठवण करुन द्यायला मी इथे आले आहे. तसंच महालक्ष्मीच्या व्रताची महती वृद्ध स्त्री रुपी लक्ष्मी देवी दासीला ऐकवते. त्यानंतर दासी महलात जावून राणीसाहेबांना वृद्ध स्त्रीने सांगितलेली महती ऐकवते. 

मात्र राजवैभवात लोळणाऱ्या तिला या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि बाहेर येऊन ती दारात उभी असलेल्या वृद्ध स्त्री रुपी लक्ष्मी देवीचा अपमान करते. झालेला अपमान सहन न झाल्याने लक्ष्मी देवी तिथे थांबत नाही. बाहेर पडत असताना तिला राजकुमारी शामबाला भेटते. शामबालाला वृद्ध स्त्री घडलेला प्रकार सांगते. त्यावर शामबाला वृद्ध स्त्रीची माफी मागवीते. देला तिची दया येते आणि ती मार्गशीष महिन्यातील गुरुवारचे महत्त्वही पटवून देते. 

तो दिवस मार्गशीष महिन्यातील पहिला गुरुवार असतो. शामबाला मनापासून गुरुवारचे व्रत करते. देवीच्या कृपेने तिचा विवाह सिध्देश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी होतो. तिला सुख, समाधान, ऐश्वर्य सारं काही प्राप्त होतं. पतीसोबत आनंदाने जीवन जगू लागते. मात्र सुरतचंद्रिका राणीवर देवीचा प्रकोप होतो आणि भद्रश्रवा राजाचे सारे राजवैभव नष्ट होते. आलेलं दारिद्रय पाहून राणी राजाला विनंती करते की, आपला जावई खूप धनवान आहे. आपण त्याच्याकडून काही मदत घेऊ शकतो. पत्नीच्या विनंतीला मान देत राजा एकटाच मुलीला भेटायला निघतो. चालून दमल्यानंतर एका नदीकाठी बसतो. तिथे पाणी भरायला येणाऱ्या दास्या त्याची विनम्रतेने चौकशी करतात. 

तेव्हा तो राणी शामबालाचा वडिल असल्याचे समजते. ही खबर दासी राणीपर्यंत पोहचवतात. तेव्हा राज पोशाख पाठवून अगदी थाटामाटात शामबाला वडिलांचे स्वागत करते. पंचपक्वान्नांचं भोजन होतं. परतताना जावई सुवर्णमुद्रांनी भरलेला हंडा राजासोबत देतो. राजा परतल्यावर सुरतचंद्रिकेला प्रचंड आनंद होतो. मात्र हंडा उघडताच त्यात कोळसे दिसतात.
नशीबाला दोष देत असेच काही दिवस निघून जातात. मग सुरतचंद्रीका एक दिवस मुलीच्या सासरी जाते. तो दिवस मार्गशीष महिन्यातील शेवटचा गुरुवार असतो. त्या दिवशी शामबालाने महालक्ष्मीचे व्रत केलेले असते. तिला मागचा जन्म आठवतो आणि त्यानंतर ती पुन्हा लक्ष्मीचे व्रत करु लागते. त्यानंतर तिला पुन्हा ऐश्वर्य प्राप्त होते. राजा आणि ती आनंदाने जगू लागतात.

काही दिवसांनंतर शामबाला आपल्या माहेरी येते. तेव्हा राणीला कोळशांनी भरलेला हंडा आठवतो. त्यामुळे तिचे कोणत्याही प्रकारचे आदरातिथ्यं ती करत नाही. याउलट अपमान करते. सासरी परताना तिला काहीच देत नाही. मात्र याचं कोणतंही दुःख करुन न घेता मूठभर मीठ घेऊन ती सासरी परतते.

सासरी आल्यानंतर पती मालाधर तिला विचारतो, माहेरुन काय आणणलंस? त्यावर ती उत्तरते मी तिथेलं सारआणले आहे. याचा अर्थ काय? या पतीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ती एक दिवस अळणी स्वयंपाक करते. जेवणातील अळणी पदार्थ चाखतो. त्यानंतर शामबाला पानात थोडसं मीठ वाढतो. त्या मीठाने साऱ्या अन्नाला चव येते.

तेव्हा शामबाला म्हणते, हेचा आहे माहेरुन आणलेले सार. मीठ जीवनाचे अमृत आहे ! अन्नाला चव येते ती मिठानंच ! मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचं मीठ खावं, त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. शामबालेच्या बोलण्यातील खोच पती जाणतो.

त्यानंतर मालाधर राजा निश्चयाने उठला. त्यानं आपले सेवक सासर्‍याकडे पाठविले. त्यांना बोलावून घेतले. भद्रश्रवा जावयाकडे येतो. दोघांची गुप्त बैठक होते. मग ते भद्रश्रवांचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करतात. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रूसैनिक जमिनीवर कोसळत होते. अपूर्व विजय होतो आणि भद्रश्रवाला राज्य पुन्हा मिळतं. त्यानंतर सुरतचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळते. या व्रतामुळे राजा-राणी सुखी झाले.

महत्व

जे कुणी महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील, त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उतू नये, नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन-चिंतन करावे; म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील; तुमची कामना पूर्ण करील असे मानले जाते.

आंब्याच्या डहाळय़ा, चौरंगावर मांडलेला पाण्याने भरलेला कलश आणि महालक्ष्मीचं रूप म्हणून तिची स्थापन केलेली मूर्ती, सजवून केलेली आरास, या व्रताचं महात्म्य वर्णन करत लक्ष्मीचा केला जाणारा स्तुतिपाठ, आरती, नैवेद्य असे रुप या काळात घराघरांमध्ये पाहायला मिळते.

कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी ही पूजा केली जाते. लक्ष्मीला गोडोधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. स्त्रिया मनोभावे लक्ष्मीची कहाणी वाचतात. पूजेच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. या दिवशी हळदीकुंकू देऊन सवाष्णींना फळे तसेच इतर वाण दिले जाते. या महिन्यात मांसाहारा करणं अनेक घरांमध्ये टाळलं जातं.
 

Web Title: Margashirsha guruvar vrat : Significance and importance of Margashirsha guruvar vrat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.