Living in the soul..! | देहात राहूनही देहातीत..! 
देहात राहूनही देहातीत..! 

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)
 

परमेश्वर प्राप्तीसाठी नामसाधना करीत असतांना साधक त्या साधनेत इतका तद्रुप व्हावा की त्याला देहाचा विसर पडावा. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात -
ते वर्तत दिसती देही । परी ते देही ना माझ्या ठायी ॥
आणि मी तयाच्या ह्रदयी । समग्र असे ॥

अर्जुना..! असा साधक देहात असला तरी देहापासून अलिप्त असतो. देहाबद्दल त्याला तादात्म्य नसते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात -
असो ऐसा कोठे आठवची नाही । देहिच विदेही भोगू दशा ॥ 
साधकाने प्रपंचात कसे राहावे..? याचे वर्णन संत करतात. काही उदाहरणांनी हा विषय आपण स्पष्ट करु यात.

समजा एखाद्या गावातील धर्मशाळेत एखादा प्रवासी आला. रात्रभर तो त्या धर्मशाळेत मुक्कामी राहिला तर तो असा कधी विचार करतो का की ही धर्मशाळा बांधावयास किती खर्च आला असेल? कोणत्या कंपनीचे सिमेंट वापरले असेल? या गोष्टींशी त्याला घेणे देणे नाही कारण त्याला हे नक्की माहीत आहे की, मी फक्त एकच दिवस इथे राहणार आहे. नाथबाबा वर्णन करतात -
वस्तीकर वस्ती आला । प्रात:काळी उठून गेला ॥
तो जितक्या उदासीनपणे त्या घटनेकडे बघतो, तितक्याच उदासीनपणे साधकाने देहाकडे बघावे तरच देहीचं विदेहीदशा प्राप्त होते. जसे चित्रपटातील सगळ्या घटना पडद्यावरच घडत असतात पण पडद्याचा त्या घटनांशी संबंध नसतो. तसेच देहासंबंधात घडणाऱ्या घटनांशी आत्म्याचा संबंध नसतो. परमेश्वर प्राप्तीसाठी साधना करणाऱ्या साधकाला हे ज्ञान झालेले असते म्हणून तो देहाविषयी उदास होतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात -
तरी जो या देहावरी । उदासु ऐसी या परी ॥
उखिता जैसा बिढारी । बैसविला आहे ॥

साधकाला साधना करतांना या अवस्थेपर्यंत जाता आले पाहिजे. तो देह भावातच अडकून बसला तर देहात असणारा परमात्मा कसा प्राप्त होईल...?

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्र. 9421344960 )


Web Title: Living in the soul..!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.