कृष्णा धाव आता...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 04:17 AM2019-08-08T04:17:45+5:302019-08-08T04:18:02+5:30

ज्याच्या जवळ प्रत्यक्ष परमेश्वर आहे, त्याचे कोण काय वाकडे करू शकणार..!

Krishna lifted Mt Govardhan and held it up as protection to his people and cattle from the rain | कृष्णा धाव आता...

कृष्णा धाव आता...

Next

- शैलजा शेवडे

गोकूळवासी जनांनी श्रीकृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे इंद्राप्रीत्यर्थ करायचा यज्ञ केला नाही. त्याऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा केली, त्यासाठी यज्ञ केला. त्यामुळे अहंकारी इंद्राला अतिशय राग आला. त्या रागाच्या आवेशात त्याने प्रलय करणाऱ्या मेघांना गोकुळाचा नाश करण्याची आज्ञा दिली. त्या मेघांनी भयंकर वृष्टी करून गोकूळवासीयांना जर्जर केले. तेव्हा सर्व जण कृष्णाला शरण गेले. त्याची प्रार्थना केली..
कृष्णा, कृष्णा, भक्तवत्सला, धाव धाव आता,
दयाघना हे, रक्षी आम्हां, तूच तूच त्राता
वज्राघाते, मेघ गरजती,
कडकड, कडकड, विजा चमकती,
अति भयंकर वादळवारे,
संततधारे, जर्जर सारे,
काय करावे, कोठे जावे, धाव धाव आता,
दयाघना हे, रक्षी आम्हां, तूच तूच त्राता,
मुसळासम या पाऊसधारा,
गारपिटी करी पिसाट वारा,
कुडकुडती ही गाई वासरे,
बुडून गेली, घरे नी दारे,
चरणी तुझिया आलो हरी रे, धाव धाव आता,
दयाघना हे, रक्षी आम्हां, तूच तूच त्राता,
पाणलोट ये, चारी दिशांनी,
बुडत चालली, सारी अवनी,
सूर्य दिसेना, तम हा दाटे,
प्रलयकाळच आला वाटे,
तुज्यावीण रे कोण वाचवी, धाव धाव आता,
दयाघना हे, रक्षी आम्हां, तूच तूच त्राता
गोकूळवासी जनांची ती आर्त प्रार्थना ऐकून कृष्ण समजला, इंद्राला गर्व झाला आहे, गर्वहरण करायला पाहिजे. म्हणून त्याने एखादे लहान मूल पावसाळ्यात आलेली कुत्र्याची छत्री (मश्रूम) जसे सहजपणे उखडते, तितक्या सहजपणे गोवर्धन पर्वत उचलला; आणि गोकूळवासीयांना त्याखाली आश्रयाला यायला सांगितले. सात दिवस रागावलेला इंद्र तुफान पावसाचा मारा करत होता. पण कृष्णाने योगमायेने सर्वांना गोवर्धन पर्वताखाली सुखरूप ठेवले. हे पाहून इंद्राचे गर्वहरण झाले. तो कृष्णाला शरण आला. वर्षाव थांबवला. कृष्णाने मग सर्वांना पर्वताच्या खालून बाहेर यायला सांगितले. सर्वांनी कृष्णाचा जयजयकार केला. अतिशय आनंदाने कृष्णाला जवळ घेतले, आशीर्वाद दिले. त्याची लीला वर्णन करणारी गाणी गायली. देवांनी त्याच्यावर पुष्पवर्षाव केला. गोपीजनांनी त्याची मिरवणूक काढली. ज्याच्या जवळ प्रत्यक्ष परमेश्वर आहे, त्याचे कोण काय वाकडे करू शकणार..!

Web Title: Krishna lifted Mt Govardhan and held it up as protection to his people and cattle from the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.