अकर्माचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 04:01 AM2020-01-27T04:01:58+5:302020-01-27T04:05:02+5:30

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते। तत्स्वयं योगसंसिद्ध: कालेनात्मनि विन्दति।।

 The joy of Akarma | अकर्माचा आनंद

अकर्माचा आनंद

Next

- वामन देशपांडे

शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी साधकापाशी अतूट श्रद्धा हवी की या मायेने ओथंबलेल्या मर्त्य भ्रममूलक दृश्य विश्वात परमेश्वरी तत्त्व फक्त सत्य आहे. हे सत्य एकदा का जाणिवेच्या पातळीवर आतल्या अंतकरणात स्थिर झाले की खऱ्या अर्थाने आपल्या मोक्षप्राप्तीच्या साधनेला सुरूवात होते. भगवंत अर्जुनाला सांगतात,
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।
तत्स्वयं योगसंसिद्ध: कालेनात्मनि विन्दति।।
पार्था, या मानवी विश्वात, ज्ञानप्राप्ती व्हावी म्हणून अथक साधना करून फक्त परमेश्वरी अस्तित्व सत्यच आहे, याचे ज्ञान प्रथम करून घ्यावे, तरच करीत असलेली साधना फलद्रुप होते. म्हणून या मानवी विश्वात शुद्ध ज्ञानासारखे अतिशय पवित्र दुसरे काहीही नाही, हे तू प्रथम जाणून घे. जे योगसिद्ध आहेत, ते निष्काम कर्मयोगी सिद्ध पुरूष या शुद्ध ज्ञानाची प्राप्ती करून घेतात. पार्था, मानवी जीवनालाच ज्ञानाची प्राप्ती करून घेता येते. हे ज्ञानप्राप्तीचे सामर्थ्य इतर कुठल्याही योनीत नाही. परमेश्वरी अस्तित्वाची जाणीव फक्त माणसापाशीच आहे. म्हणून माणसाने इतर भोगयोनींप्रमाणे आपला मानवी जन्म भोगात रत होण्यात खर्च न करता, देहबुद्धी जागृत न करता, आत्मसाक्षीने जगण्याचा प्रयत्न करावा. निष्काम वृत्तीने आपले विहीत कर्म प्राणपणाने पूर्ण करीत, परमेश्वर प्राप्तीसाठी दृढ चित्ताने उपासना करावी. ज्ञानाइतके पवित्र या विश्वात प्राप्त करण्यासारखे दुसरे काहीही नाही हे सत्य प्रतिपादित करताना भगवंतांनी एक अत्यंत महत्त्वाचा तत्त्वविचार अधोरेखित केला. ज्ञानप्राप्तीसाठी कोणा श्रेष्ठ तत्त्वज्ञानी पुरूषोत्तमाच्या ज्ञानसहवासात राहण्याची आवश्यकता नाही. कारण हे भगवंतांना अभिप्रेत असलेले ज्ञान, निष्काम कर्मयोगाद्वारे प्राप्त करून घेणे, कुणाही साधक भक्ताला सहज शक्य आहे. मी पण एकदा का गळून पडले की, करीत असलेल्या कर्माचे कर्तेपण संपुष्टात येते. आपण कर्म करीत नसून भगवंतच आपल्याला प्रेरणा देऊन हे कर्म आपल्याकडून करवून घेत आहे हा सद्भाव शुद्धाचरणी अंतकरणात सतत स्फुरण पावत राहिला की मर्त्य मानवी जीवनातील कर्तेपण आणि फलाशा अक्षरश: भस्मिभूत होऊन जाते.

Web Title:  The joy of Akarma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.