Go, drink tea! | जा, चहा पी!

जा, चहा पी!

- धनंजय जोशी
झेन गुरुंची शिकवायची पद्धत वेगळीच असते. काही वेळेला त्यांची स्वत:ची वागणूक बघून आपण शिकायचे असते. काही वेळेला ते तुम्हाला एक प्रश्न विचारतात, ज्याचे उत्तर तुमच्या साधनेमधूनच अनुभवायचे असते. तुमचा अनुभव खरा आहे की केवळ शाब्दिक आहे हे गुरुंना अगदी सहज कळून येते. त्या प्रश्नाला ‘कोआन’ म्हणतात. झेन गुरुंच्या प्रश्नांची उत्तरे अगदी सहज निर्मळ जीवनाचा मार्ग दाखवून जातात.
जोजू म्हणून एक झेन गुरु होऊन गेले. त्यांना कोणीही काही प्रश्न विचारला की ते एकच उत्तर द्यायचे, ‘गो ड्रिंक टी - जा चहा पी !’ आपल्याला वाटेल हे काय
चमत्कारिक उत्तर? पण त्यामागे फार खोल अर्थ आहे. एक छोटेसे झेन वाक्य आहे : तहान लागली की चहा प्यावा, झोप आली की झोपावे !- निर्मल, निष्पाप जीवनाचे हे सार आहे. आता हा संवाद बघा :
शिष्य : मास्टर, बुद्धाचे स्वरूप काय आहे? मला समजावून सांगाल का?
जोजू : जा चहा पी.
शिष्य : पण मी सकाळीच चहा प्यालो.
जोजू : मग कशाला इथे आलास हे वेड्यासारखे प्रश्न घेऊन? जा परत.
साधनेनंतर मला ह्या संवादातली गंमत समजून आली. जोजूला समजले होते की, त्या शिष्याला फक्त शाब्दिक ज्ञान हवे आहे! म्हणून जोजू त्याला बौद्धिक आकाशातून जमिनीवर आणतात.
झेन या जीवनमार्गाला ‘एव्हरीडे माइण्ड’ - म्हणजे ‘आजच्या दिवसाचा मार्ग’ म्हणतात. म्हणून जोजू म्हणतात, चहा पी! आत्ता जे करतो आहेस, ते ध्यान ठेवून कर!
बरं, मी काय म्हणतो, तुमचा नास्ता झाला का आज?

Web Title: Go, drink tea!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.