फक्त वैतागू नका, थोडा धीर धरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:54 AM2020-04-09T05:54:07+5:302020-04-09T05:54:07+5:30

सध्या संक्रमण रोखणे, जीव वाचविणे सर्वात महत्त्वाचे आहे. ही काही नियंत्रणाबाहेरची परिस्थिती नाही.

Don't worry, just be patient! | फक्त वैतागू नका, थोडा धीर धरा!

फक्त वैतागू नका, थोडा धीर धरा!

Next

सध्या संक्रमण रोखणे, जीव वाचविणे सर्वात महत्त्वाचे आहे. ही काही नियंत्रणाबाहेरची परिस्थिती नाही. पण त्यासाठी संचारबंदी, सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवे. तुमच्या मनात त्याचे नकारात्मक चित्र बनवू नका. तीन आठवड्यांच्या सुटीनंतर नव्या ऊर्जेने कामाला लागा. सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व ओळखा. काही दिवसांनी हळूहळू सर्व रुळावर येईल. फक्त वैतागू नका. थोडा धीर धरा.


कोरोनामुळे जगभरात अनेकांना जीवास मुकावे लागले आहे. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्सही बाधीत झाले. आजूबाजूला जे घडतेय ते सहन न झाल्यामुळे जर्मनीमध्ये एका वित्तमंत्र्यांनी आत्महत्या केली. हे नकारात्मक चित्र आहे. जग पुष्कळ हळुवार शांत झाले आहे. सर्व यंत्रे बंद आहेत. पण मला खात्री आहे की इतर सर्व प्राणी खूप खुश आहेत. अनेक ठिकाणी जंगली जनावरे रस्त्यावर येत आहेत. त्यांना वाटायला लागले आहे की, मानवी व्हायरस गेलेला दिसतोय.


असे म्हणून मी माझ्या लोकांचे दु:ख कमी लेखत नाही. पण जेव्हा कुठलीही संचारबंदी नव्हती तेव्हा असे नव्हते की लोक दु:ख भोगत नव्हते. प्रत्येक चार मिनिटाला रस्त्यावर कोणाला तरी फॅक्चर व्हायचे. कुणाचे तरी हाड तुटायचे. प्रत्येक बारा मिनिटांनी कुणाला तरी हात किंवा पाय गमवावा लागत होता. आता कुणालाही हात-पाय गमवावे लागलेले नाहीत. मला खात्री आहे की, फॅक्चर झालेल्यांची संख्याही अगदी कमी झालेली असेल. कारण पूर्वी कधीच मानवी इतिहासात इतकी हाडे तुटली नसतील जितकी विसाव्या आणि एकविसाव्या शतकात तुटली आहेत. याचे साधे कारण म्हणजे आपण आपले शरीर ज्या वेगाने जाण्यासाठी रचले गेले आहे, त्यापेक्षा अधिक वेगाने धावतोय.
सध्या अनेक जणांसोबत फक्त एवढेच घडतेय की, जेव्हा ते कामाला जात होते तेव्हा ते रोजच वैतागत होते. म्हणायचे की, हे कामाच्या ताणामुळे होतेय. बॉस किती भयंकर आहे, ट्रॅफिक किती वाईट आहे वगैरे. आम्ही त्या सर्व वाईट गोष्टी काढून टाकल्या. आता तुम्ही तुमच्या घरी, होम स्वीट होममध्ये आहात. पण आता लोक म्हणू लागलेत की, आम्हाला बाहेर पडायचे आहे.
लोक वाईट वेळ आलीय, असे बोलत आहेत. प्रत्यक्षात अनिश्चितता हे जीवनाचे स्वरूप आहे. जीवनाच्या अनिश्चिततेबरोबर ताल धरून कसे नाचायचे ते तुम्ही शिकला नाहीत तर तुम्ही कधीच आनंदी आणि उल्हसित जीवन जगू शकणार नाही. जेव्हा तुम्ही ५-६ वर्षांचे होता तेव्हा ते नक्कीच आनंदी आणि उल्हसित जीवन होते. हळूहळू तुमच्या शरीरात ताठरता येऊ लागली. तुमचा जिवंतपणा कमी होऊ लागला आहे. तो वय झालेय म्हणून नाही तर तुम्ही जीवनात निश्चितता आणण्याचा प्रयत्न करत आहात म्हणून. जेव्हा की, जीवनाचा स्वभावच अनिश्चितता आहे.
खूप सारे लोक माझ्याकडे येतात, त्यांची एकच विनंती असते, सदगुरू आम्हाला आशीर्वाद द्या की, आम्हाला काहीच होऊ नये. अरे, हा कुठल्या प्रकारचा आशीर्वाद मागताय, हा मृत्यूसाठीचा आशीर्वाद आहे. फक्तमृत्यूमुळे काही होणार नाही. पण जर तुम्ही जिवंत असाल तर पुष्कळ काही होऊ शकते. माझा तुम्हाला आशीर्वाद असा आहे की, जीवन म्हणून जे काही आहे ते सर्व तुमच्यासोबत घडू दे, कारण ते जर आता घडले नाही तर कधी घडणार? खरे तर हेच जीवन आहे आणि ते सकारात्मकपणे जगायला हवे.
तुम्ही जे काही करता ते पूर्णपणे सहभागाने आणि स्वेच्छेने केले तर हा तुमचा स्वत:चा स्वर्ग आहे. जर तुम्ही ते नावडीने केले तर नक्कीच नरकाप्रमाणे भासेल. ज्यांना लॉकडाऊन, संचारबंदीचे दु:ख होतेय त्यांनी हे मुद्दे लक्षात घ्यायला हवे. पण सध्या तरी त्यांना घरात राहण्याचा, त्यांच्या प्रिय व्यक्तींचाच त्रास होतोय. याआधी नेहमी ते याच प्रिय व्यक्तींबाबत बोलत होते, पण आता ते होम स्वीट होममध्ये वैतागले आहेत. यापूर्वी ते सतत व्यस्त होते, त्यामुळे असे वाटणे स्वाभाविक आहे.
आता तुम्ही जे दु:ख भोगताय ते बऱ्याच अंशी तुमचे मानसिक नाटक आहे. तुम्हाला फक्त एक चांगला दिग्दर्शक होण्याची गरज आहे. जगाचे नाटक कदाचित तुम्हाला हवे तसे घडणार नाही, ते तुमच्यापेक्षा खूप मोठे आहे. पण किमान तुमच्या डोक्यात जे घडतेय ते तुम्हाला हवे तसे आणि त्याहीपेक्षा सकारात्मक घडायला हवे. ही वेळ आहे त्याला ताब्यात घेण्याची.
जर तुम्ही या तीन आठवड्यांबद्दल रडारड केली तर पुढची तीन वर्षे तुम्ही शनिवार, रविवार सुट्टी न घेता काम करायला हवे. कारण मला वाटते की, तुम्हाला तुमचे काम एवढे आवडत आहे, एकतर हे किंवा ते. दोन्हींचा तुम्हाला त्रास होत असेल तर काय करायचे?
सद्गुरु जग्गी वासुदेव
संपादित
(लोकमत भक्ती यू ट्युब चॅनल)

Web Title: Don't worry, just be patient!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.