Did anyone know the game of god ? ' | खेळ कुणाला दैवाचा कळला ?’’ 
खेळ कुणाला दैवाचा कळला ?’’ 

- डॉ. दत्ता कोहिनकर- 

केदारचे वडील व्यवसायाने नामांकित डॉक्टर - प्रतिष्ठा - ऐश्‍वर्य सर्व काही मुबलक. केदार हा एकुलता एक सुशिक्षीत मुलगा. आई-वडिलांनी उत्तम संस्कार केलेले. पण केदारच्या मनात वडिलांबदद्ल तीव‘ द्वेष. तो वारंवार काहीही कारणे काढून वडिलांबरोबर भांडणे करायचा. वेळप्रसंगी वडिलांना शिवीगाळही करायचा. वडिलांबदद्ल मित्रांशी बोलताना खूप अपशब्द वापरायचा. वडील म्हणून त्यांची सर्व कर्तव्ये पूर्ण करत असून देखील केदार असे का वागतो हे त्याच्या वडिलांना पडलेले कोडे होते. बर्‍याचदा समाजात एखाद्या चांगल्या- सुस्वभावी बाईला तिचा पती खूप नाहक त्रास देत असतो. आई व वडील दोघेही उच्चशिक्षीत व्यवसायाने प्रतिष्ठित डॉक्टर. सर्व प्रकारची काळजी घेऊन देखील त्यांना झालेले मूल हे मतिमंद, अपंग. अत्यंत सुंदर देखण्या शिक्षीत मुले-मुली लग्नच जमत नसल्याची तक्रार व आलेले नैराश्य. 
अशा अनेक घटनांचा मागोवा घेतल्यावर कर्मफल सिध्दांताची निश्‍चिती अनुभवास येते. गजरे विकणारी व्यक्ती समाजकल्याणमंत्री होते. तर चहा विकणारी व्यक्ती या देशाची पंतप्रधान होते. जन्मताच एखादा मुलगा उद्योगपतीच्या घरात जन्मतो तर त्याच वेळी एखादा मुलगा हा जवळच्या झोपडपट्टी मध्ये जन्म घेतो. अपघातात सगळे दगावतात व चिमुरडी वाचते, तिला खरचटत पण नाही याला काय म्हणावयाचे ? 
शेवटी गतजन्मांचा या जन्माशी काहीतरी संबंध येत असावा असे वाटून त्या अज्ञाताविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. खूप प्रयत्न करूनही एखादी गोष्ट मिळत नाही आणि ध्यानी-मनी नसताना सहजपणे मोठमोठी कामे होऊन जातात. 
‘‘मी राजा असून आंधळा का ?’’ या धृतराष्ट्राच्या प्रश्‍नाला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण मागच्या जन्मात धर्नुधारी असताना नेम लावून उन्मत्तपणे पक्ष्यांचे डोळे फोडले या कर्मफलाचा आधार धृतराष्ट्रास देतात. 
एका माणसाने खूपच भावनाविवश होऊन रडत रडत वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांना मुक्ती मिळण्यासाठी भगवान बुद्धांकडे आग‘ह धरला. बुद्धांनी त्या माणसाला दोन मडकी आणून एका मडक्यात तूप व एका मडक्यात खडी भरावयास लावली. त्या दोन्ही मडक्यांना तलावात ठेवून काठीचा प्रहार करावयास लावले. मडकी फुटली - तुप तरंगले व खडी पाण्याखाली गेली. बुद्ध त्या व्यक्तीला म्हणाले आता तुला जे कर्मकांड करावयाचे ते कर. ज्यावेळेस ही खडी वर येईल व तूप खाली जाईल त्यावेळेस झटकन तुझे वडील मुक्त होतील. तो बुद्धांकडे पाहता गोंधळलेल्या स्वरात म्हणाला भगवान पण ही खडी जाड वजनदार ती पाण्यावर कशी येणार. हे तूप हलके - फुलके हे खाली कसे जाणार. निसर्गनियमानुसार हे होऊच शकत नाही. त्यावेळेस हसत भगवान बुद्ध म्हणाले, तुझ्या पित्याने या तुपासारखे हलके-फुलके सत्कर्म केले असेल तर ते वरच म्हणजे सतगतीला जाणार व या दगडांसारखे जड (त्रासदायक) काम केले असेल तर ते खालीच (अधोगतीलाच) जाणार. हाच निसर्गाचा नियम आहे. 
संत तुकाराम महाराज म्हणतात. 
‘‘शुद्ध बीजापोटी  फळे रसाळ गोमटी ।’’
मग आपल्या हातात काय आहे? आपले भविष्य काय असावे या दृष्टीने आपले वर्तन, आचरण आणि वृत्ती असावी. म्हणून सत्कर्म करा व यम-नियमांचे पालन करून सुखाचे अधिकारी व्हा. सर्व पापापासून दूर रहा. शास्त्रीय ज्ञानाच्या बळावर जीवन समृध्द व सुखावह करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करा पण कधी कधी जीवनाला वेढणारा अज्ञाताचा, अनिश्‍चितीचा जो कर्मफलसिध्दांताचा भाग आहे तो ही स्विकारण्याची तयारी असू द्या. शेवटी म्हणतात ना, 
‘‘जैसे ज्याचे कर्म तैसे - फळ देतो रे ईश्‍वर ।’’ 
आपल्याला त्या कर्मफळातून बोध घेऊन सुयोग्य काय आहे ? हे ठरविणे, जाणणे ही आपली पुढची गती ठरविते. कर्मफळ कसेही असो, मन मात्र समतेत प्रतिष्ठापीत करा.
 


Web Title: Did anyone know the game of god ? '
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.