शाश्वत सुखासाठी करावा संतसंगतीचा धावा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 06:59 PM2020-05-02T18:59:57+5:302020-05-02T19:03:09+5:30

संतसंगतीत वासनेचं बीजंच जळून जातं आणि हे घडताच रामनामाची आवड निर्माण होऊन आपलं सुख हे क्षणोक्षणी वाढायला लागतं.

Dedication towards Saints for eternal happiness ..! | शाश्वत सुखासाठी करावा संतसंगतीचा धावा..!

शाश्वत सुखासाठी करावा संतसंगतीचा धावा..!

Next

- ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी (बीड)

मनुष्याला जीवनात शाश्वत सुख हवं असेल, तर त्याने संतसंग करावा, सज्जनांचा संग करावा. असंगाशी संग केल्यास श्रीरंग प्राप्त होत नाही..! विषयाच्या संगाने मानवी जीवनाचं अधःपतन होतं. भगवान श्रीकृष्ण श्रीमद् भगवद् गीतेत म्हणतात -

ध्यायतो विषयान्पुंसः संगस्तेषूप जायते ।

विषयसंगाच्या स्टेशनवरुन सुटलेली देहरुपी गाडी, विवेकाचा ब्रेक तुटल्यामुळे, सर्वनाश घाटात कोसळून पडते._ विषयसंगाने परमोप्रत जाताच येत नाही. संतांच्या, सज्जनांच्या संगतीत मात्र वासना जळून जाते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात -

संतचरण रज लागता सहज । वासनेचे बीज जळोनि जाय ॥
मग रामनामे उपजे आवडी । सुख घडोघडी वाढो लागे ॥

संतसंगतीत वासनेचं बीजंच जळून जातं आणि हे घडताच रामनामाची आवड निर्माण होऊन आपलं सुख हे क्षणोक्षणी वाढायला लागतं. आमच्या संतांनी शब्द किती तोलूनमापून वापरले आहेत बघा _बीज जळोनि जाय_ म्हणजे एखादं बीज जेव्हा जळून जातं तेव्हा ते परत कधीच उगवत नाही, उत्पन्न होत नाही म्हणून एकदा का मनुष्य संतसंगतीत गेला की, त्याची वासना संपूर्णतः जळते, नामशेष होते. संतसंगतीत मानवी जीवनाचं कल्याणच होतं.

एकदा तुकाराम महाराजांची स्वारी विठ्ठलाचे भजन करीत एका झाडाखाली बसली होती. त्याच रस्त्याने ४ चोर जात होते. त्यांनी विचार केला, आपल्याला टेहळणी करण्यासाठी अगदी योग्य माणूस मिळाला. त्यांच्यापैकी एकजण पुढे आला आणि म्हणाला, महाराज! तुम्ही आमच्याबरोबर याल का?महाराज म्हणाले, हो! चोर म्हणाले, चला मग! आणि त्या चोरांबरोबर तुकाराम महाराज सावकार वाड्याजवळ आले. चोर म्हणाले, आमच्याबरोबर आत चला. आम्ही आमचे चोरीचे काम करु आणि तुम्ही समोर दालनात बसा. जर सावकार वाड्यातील कोणी जागं झालं तर फक्त विठ्ठल-विठ्ठल म्हणा आम्ही पळून जाऊ किंवा लपून बसू! चोर आत शिरुन चोरी करु लागले आणि महाराज दालनात आले. पाहतात तर काय? त्या सावकाराच्या दालनात सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती शोभत होती. समोर मंदतेजाने समई तेवत होती. फुलांचा, तुळशीचा, धूपाचा सुगंध दरवळत होता अशा त्या मूर्ती पाहताच लगेच महाराजांनी भजन करायला सुरूवात केली.

रुप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी ।
तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा ।।

भजनाचा आवाज ऐकताच सावकार आणि सारी मंडळी जागी झाली. समोर तुकाराम महाराजांना पाहताच त्या सावकाराला पराकोटीचा आनंद झाला कारण तो खरा वैष्णव होता. त्याने महाराजांचे पाय धरले. दूध-फळे महाराजांसमोर ठेवून ते खाण्याचा आग्रह तो त्यंना करु लागला. एवढ्यात महाराजांच्या लक्षात आलं आणि ते म्हणाले, अहो.! मी एकटा नाही माझ्याबरोबर आणखी चार जण आहेत. सावकार म्हणाला, कुठे आहेत ते.? बोलवा त्यांना..! आणि हे सगळं संभाषण ऐकून लपलेले चोर बाहेर आले. त्यांनी सावकाराची माफी मागितली, महाराजांचे चरण धरले आणि ते त्यांच्या भजनी मंडळात सामील झाले. 

तुकाराम महाराजांसारख्या संताच्या संगतीने चोरही सज्जन बनले. चोरीचा व्यवसाय सोडून भक्तिमार्गाला लागले. एका क्षणाच्या संतसंगाने चोरांच्या जीवनाचे कल्याण झाले म्हणून इतरांचा संग नकोच फक्त संतसंग हवा..!
श्रीसमर्थ रामदास स्वामी आपल्याला मनोबोधात हेच सांगतात  -
मना सर्वही संग सोडोनि द्यावा । अति आदरे सज्जनांचा करावा ।
जयाचेनी संगे महादु:ख भंगे । जनी साधनेवीण सन्मार्ग लागे ।।

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी  8793030303 )

Web Title: Dedication towards Saints for eternal happiness ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.