आनंदाचे डोही आनंद तरंग -  माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरीराया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 12:30 PM2019-07-26T12:30:35+5:302019-07-26T12:30:40+5:30

भगवंताने आपल्याला बुडवण्यासाठी हा भवसागर उभा केलेला नाही, तर आपल्याला खेळण्यासाठी संसाराची निर्मिती आहे.

anandache dohi anand tarang - shri vitthal god given peace to life by devotee | आनंदाचे डोही आनंद तरंग -  माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरीराया

आनंदाचे डोही आनंद तरंग -  माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरीराया

googlenewsNext

- डॉ.रामचंद्र देखणे- (प्रवचन व कीर्तनकार )
पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरावर पांडुरंगरूपी नाव पुंडलिकाच्या द्वारात कटेवर हात ठेवून उभी आहे आणि तुम्हाला उभ्याउभ्याच बोलावत आहे. फक्त त्याच्या पायांना मिठी घाला. पैलतीरावर आपोआप जाल. संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांनी पंढरीनाथाच्या पायी मिठी घातली आणि त्याचे सुंदर ते ध्यान आठवीत ते म्हणू लागले, 
ह्यह्यतुज पाहता सामोरी, 
दृष्टी न फिरे माघारी, 
माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरीराया, 
पंढरीच्या श्रीविठ्ठलाला पाहिले की त्याच्या सुंदर स्वरुपाचे वर्णन करण्यासाठी संतांचे शब्द सरसावतात आणि परब्रह्मरूपातील तत्त्ववेत्त्यांचे हे दर्शन दृश्यस्वरूपात येते. भक्त किंवा संत हे तात्त्विक पातळीवर अद्वैतात जातात. पण भावानिक पातळीवर द्वैतातच. ज्याने द्वैताचे द्वैत मोडते ते हे रूप इतके मनोहर आहे, की ब्रह्मभावात गेलेले संत पुन्हा स्वरूपस्थितीला येऊन वर्णन करू लागतात. 
      सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, 
        कर कटवरी ठेवोनिया.
विटेवरी उभा आहे, कटावर हात आहेत, कानात मकरकुंडले आहेत, गळ्यात कौस्तुभमण्याचा हार आहे, दंडावर, मनगटावर बाजूबंद आणि मणिबंध आहेत, कमरेला तिहेरी पितांबर आहे. समचरण विटेवर ठेवून हे सुंदर ते ध्यान भक्तिसुखाची शोभा वाढवित आहे. विठ्ठलाचे हे वर्णन म्हणजे मूर्तिविज्ञान, तर त्यातील रूपक हे मूर्तिज्ञान होय. कारण संतांनी चर्मचक्षूंबरोबर ज्ञानचक्षूनेही न्याहाळून हे वर्णन केले आहे. कटेवरील हात हे तर तत्त्वदर्शी असे सुंदर रुपक आहे. शंकराचार्यांनी पांडुरंगाचे वर्णन करताना विधातुवसत्यै असा शब्दप्रयोग केला आहे. विधातु म्हणजे ब्रह्मदेव आणि वसत्यै म्हणजे वसतिस्थान. ब्रह्मदेवाचे वसतिस्थान म्हणजे सत्यलोक आणि आपण यामध्ये  फक्त दहा बोटांचा फरक आहे. ह्या भवसागराचे पाणी कमरेपर्यंतच आहे हेच कटेवर हात ठेवून ते सुचवित आहेत. संतश्रेष्ठ तुकाराममहाराज म्हणतात, 
भवसागर तरता, कारे करितसे चिंता, 
   पैल उभा दाता, कटी कर ठेवुनिया...भवसागर तरून जाण्याची चिंता का करता, पलीकडे कटीवर हात ठेवून तो उभा आहे. भगवंताने आपल्याला बुडवण्यासाठी हा भवसागर उभा केलेला नाही, तर आपल्याला खेळण्यासाठी संसाराची निर्मिती आहे. नित्यानित्यवस्तुविवेक इहफलभोगाविराग, अमुत्रफलभोगाविराग, शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा, समाधान, मुमुक्षुता ही पाच बोटे आहेत. ह्या दहा बोटांनी जीवनाचा खेळ खेळला तर भवसागरही कमरेएवढाच आहे, तर सत्यालोकही फक्त दहा बोटावरच आहे. 

Web Title: anandache dohi anand tarang - shri vitthal god given peace to life by devotee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.