anandache dohi anand tarang : Panduranga looks like a shadow | आनंदाचे डोही आनंद तरंग : पांडुरंगाचं रुप सावळे दिसे शोभा।
आनंदाचे डोही आनंद तरंग : पांडुरंगाचं रुप सावळे दिसे शोभा।

- डॉ. रामचंद्र देखणे  
(प्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार)
पांडुरंग स्वरूप पंढरपूर हे एक महान तीर्थ, पुंडलिक हा महान भक्त. भगवान पांडुरंग म्हणजे द्वारकाधीश कृष्णच, तोच पंढरपुरामध्ये विटेवर उभा आहे. भगवंताचे एवढे नावीन्यपूर्ण रूप कोठेही नाही. पांडुरंग कोण? पांडुरंग हे कृष्णाचे रूप आहे. संस्कृतात काळी छटा आणि धवल छटा याच्या मिश्रणाला पांडुरंग म्हणतात. पंढरीच्या विठ्ठलाचे हेच रूप असल्याने त्याला पांडुरंग हे नाव पडले.
स्वाध्याय प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले म्हणतात, श्रीकृष्ण मूळचा काळा. तो सारा दिवस काम करून जेव्हा गायीच्या थव्यासंगे परत घरी येत असे तेव्हा गायीच्या पावलांनी उडत असलेली धूळ त्याच्या मुखावर आणि अंगावर साचे. त्या वेळचे त्याचे धूळमिश्रित काळे-सावळे रूप म्हणजे पांडुरंगस्वरूप. भगवान श्रीकृष्ण हा कर्मयोगी आहे. गायी चारता चारता, कर्मयोग आचरताना अंगावर उडालेल्या धुळीने काळ्या कृष्णाला धवलता लाभली.  जन्मत: प्राप्त झालेला काळेपणा आणि कर्मयोगाने लाभणारा धवलपणा या दोन रंगांचे मिश्रण म्हणजे पांडुरंग. कर्मयोगी बनल्यानंतरचे कृष्णाचे रूप म्हणजे पांडुरंग. अशा परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं.पांडुरंगाला शंकराचार्य वंदन करतात. पांडुरंग हा सावळ्या कांतीचा. हे सावळेपणही त्यालाच शोभतं.
विटेवरी नीट केळी कर्दळीचा गाभा ।।
पांडुरंगाचं रुप सावळे दिसे शोभा । 
पांडुरंग नीलमेघासारखा आहे म्हणून पांडुरंगाष्टकात आचार्य त्याला नीलमेघावभासम या शब्दाने संबोधतात. हा नील-सावळा रंग भव्यतेचे आणि व्यापकतेचे दर्शन घडवतो. ह्या पांडुरंगाकडे पाहिल्यावर जगाचा रंग फिका वाटतो. पांडु म्हणजे स्वच्छ. म्हणून पांडुरंग म्हणजे स्वच्छ रंग असलेला. पांडुरंग हा भक्तीच्या रंगात रंगतो आणि भक्तांनाही रंगवतो. विनटावे नामी केशवाच्या असे म्हणत भक्तही ह्या रंगाने नटतात. भक्तीचा रंग हा सृष्टीतील श्रेष्ठतम रंग आहे. आपल्याजवळील सर्व पाणी जगाला देणाऱ्या सावळ्या मेघाप्रमाणे, आपल्याजवळील सर्व काही जगाला देण्यासाठी उभ्या असलेल्या पांडुरंगानेही त्याच परोपकारी मेघाचा सावळा रंग धारण करावा हेच खरे.! दिव्य तेज झळकती पांडुरंगाचे स्वरूप मेघसुंदर आहे. 

Web Title: anandache dohi anand tarang : Panduranga looks like a shadow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.