आनंद तरंग: ही हुरहुर का...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 02:26 AM2019-09-12T02:26:17+5:302019-09-12T02:26:31+5:30

हसू लागल्या नाना विद्या, आणि नाना कला, सगुण रूपाचा तुझ्या गणपती, असा लागला लळा

Anand Wave: This is a ... | आनंद तरंग: ही हुरहुर का...

आनंद तरंग: ही हुरहुर का...

Next

शैलजा शेवडे

सगुण रूपाचा तुझ्या, गणपती, असा लागला लळा,
येता जाता तुला पहावे, आनंदसोहळा।
निराकार ब्रह्माने साजिरे, रूप गोड घेतले,
मातीचे गणराज होऊनी, घरोघरी आले।
देव पाहुणा हर्षाने मग, भक्त नाचू लागले,
चैतन्याने वातावरण हे, सर्व भरून गेले।
हसू लागल्या नाना विद्या, आणि नाना कला,
सगुण रूपाचा तुझ्या गणपती, असा लागला लळा।
वक्र तुंड तू गजवदना, लंबोदर रे त्रिनयना,
किती आगळे रूप तुझे रे, तोषिवणारे सर्व मना।
किती किती अन् पुन्हा पुन्हा तुज पाहू एकदंता,
आनंदाच्या लहरी केवळ, तुझ्या कथा ऐकता।
भक्तीरसात डुंबून जाणे, आनंदच आगळा,
सगुण रूपाचा तुझ्या गणपती, असा लागला लळा।
ही हुरहुर का अशी दाटली, विसर्जनाच्या क्षणी,
वाजतगाजत निरोप जरी, तरी कल्लोळ हा मनी।
जनसागर हा मागे देवा, एकच हे मागणे,
पुढच्या वर्षी लवकर येणे, ध्यानी हे ठेवणे।
मूर्तीविण ही मखर मोकळी, बघून दाटे गळा,
सगुणरूपाचा तुझ्या गणपती, असा लागला लळा।
गणेशा, तुझं सगुणरूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. अत्यंत आनंददायी आहे. पण संत एकनाथ म्हणतात,
पाहता नरू ना कुंजरू। व्यक्ताव्यक्तासी परू।
ऐसा जाणोनी निर्विकारू। नमनादरू ग्रंथार्थी।।
तुझ्या सद्रूपाचे दर्शन झाल्यावर कळले, की तू मानवही नाहीस, गजही नाहीस. व्यक्तही नाहीस आणि अव्यक्तही नाहीस तर त्याही अतीत म्हणजे पलीकडचा असा निर्विकार आहेस. म्हणून ग्रंथाच्या आरंभी तुला आदरपूर्वक नमस्कार करतो... खरोखर मनात विलक्षण हुरहुर दाटली आहे. माहीत आहे, तू सर्वत्र आहेस. तू तर वाङ्मय आहेस. शब्दब्रह्म आहेस. चिन्मय गणेश वाङ्मयरूपात भेटतोस.

Web Title: Anand Wave: This is a ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.