Yavatmal's Sagar Narcade Indian handball team coach | यवतमाळचे सागर नारखेडे भारतीय हॅन्डबॉल संघाचे प्रशिक्षक

ठळक मुद्देआशिया हॅन्डबॉल ट्रॉफी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील हॅन्डबॉलचे मैदान गाजविणारे प्रा.डॉ.सागर प्रल्हादराव नारखेडे यांची पाकिस्तानात होणाऱ्या दक्षिण व मध्य आशिया हॅन्डबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेकरिता भारतीय ज्युनिअर संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीने यवतमाळच्या शिरपेचात आणखी एका मानाचा तुरा खोवला गेला आहे.
हॅन्डबॉल फेडरेशन आॅफ इंडियाचे सेक्रेटरी जनरल आनंदेश्वर पांडे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. पाकिस्तानच्या फैसलाबाद येथील आंतरराष्ट्रीय हॅन्डबॉल स्टेडियमवर यजमान पाकिस्तानसह भारत, अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव, यमन आदी आठ देशांचे संघ सहभागी होणार आहेत. डॉ. नारखेडे १८ वर्षाआतील मुलांच्या भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रतिनिधित्व करणार आहे. भारतीय संघाचे स्पर्धापूर्व शिबिर लखनौ येथे २१ फेब्रुवारी ते ८ मार्चपर्यंत आयोजित होते. या शिबिरात नारखेडे यांच्या मार्गदर्शनात संघाने तयारी केली.
नारखेडे यांचे दहावी ते एमएपर्यंतचे शिक्षण अमोलकचंद महाविद्यालयात झाले. बीपीएड व एनआयएस नंतर त्यांनी राष्ट्रीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली. सध्या ते सरस्वती कला महाविद्यालय दहिहांडा (जि.अकोला) येथे शारीरिक शिक्षण संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीचे मार्गदर्शक शैलेश भगत, मनोज जयस्वाल, विजय वानखेडे व यवतमाळ जिल्हा हॅन्डबॉल संघटनेने कौतुक केले आहे.


Web Title: Yavatmal's Sagar Narcade Indian handball team coach
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.