पाच योजनांमध्ये यवतमाळ महाराष्ट्रात ‘टॉप’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 09:49 PM2018-10-20T21:49:46+5:302018-10-20T21:50:43+5:30

राज्य सरकारच्या महत्वाच्या पाच योजनांची काटेकोर अंमलबजावणी करून त्यात यवतमाळ जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर नेण्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यशस्वी झाले आहेत. डॉ. देशमुख यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून नुकताच एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला.

Yavatmal in five schemes on Top 'Top' | पाच योजनांमध्ये यवतमाळ महाराष्ट्रात ‘टॉप’वर

पाच योजनांमध्ये यवतमाळ महाराष्ट्रात ‘टॉप’वर

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची वर्षपूर्ती : राष्ट्रीयीकृत बँकांना आणले वठणीवर, कीटकनाशक बळी थांबविले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य सरकारच्या महत्वाच्या पाच योजनांची काटेकोर अंमलबजावणी करून त्यात यवतमाळ जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर नेण्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यशस्वी झाले आहेत.
डॉ. देशमुख यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून नुकताच एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने या वर्षभरातील त्यांच्या नेतृत्वात प्रशासनाच्या उपलब्धीबाबत त्यांच्याशी संवाद साधला. वर्षभरातील कामगिरीचा लेखाजोगा मांडताना त्यांनी आपल्या व अधिनस्त यंत्रणेच्या कामावर समाधान व्यक्त केले. त्याचवेळी अनेक क्षेत्रात कामाची गती वाढविण्याची आवश्यकता व वाव असल्याचेही कबूल केले. डॉ. देशमुख म्हणाले, शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याचे प्रशासन सांभाळणे आव्हान आहे. शेतकरी डोळ्यापुढे ठेऊन आपण सिंचनावर सर्वाधिक भर दिला. सिंचनाच्या माध्यमातून शेतीला हिरवेगार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेततळे, सिंचन विहिरी, विहिरी खोलीकरण, फेरफार निर्गती, वॉटर कप, गाळमुक्त धरण यावर प्रशासनाने सर्वाधिक भर दिला. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. या पाचही प्रमुख योजनांमध्ये यवतमाळ जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. राज्य सरकारकडून या कामगिरीचे जिल्हा प्रशासन व अधिनस्त यंत्रणेचे कौतुकही झाले आहे. एकाच वेळी शासनाच्या पाच योजनांमध्ये महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळविण्याची जिल्ह्याची ही पहिलीच वेळ असावी.
कपाशीवरील बोंडअळी व त्याच्या नियंत्रणासाठी होणारी कीटकनाशक फवारणी, त्यातून होणारे विषबाधा मृत्यू हेसुद्धा जिल्ह्यासाठी मोठे आव्हान होते. गेल्या वर्षी कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झाल्याने कित्येक शेतकरी-शेत मजुरांचा मृत्यू झाला. संपूर्ण देशभर हे कीटकनाशक बळी गाजले. त्यामुळे सन २०१८ च्या खरीप हंगामात कृषी क्षेत्रात संपूर्ण कपाशीच्या पट्ट्यातच भीतीचे वातावरण होते. त्यातही सर्वांचे लक्ष यवतमाळ जिल्ह्यावर लागलेले होते. परंतु बोंडअळी नियंत्रणात जिल्ह्याने चांगले यश मिळविले आहे. त्यासाठी आपण कृषी विभाग, बियाणे कंपन्या, कीटकनाशक कंपन्या, कृषी तज्ज्ञ यांच्या संपर्कात होतो. शेतकºयांची जनजागृती करणे आणि त्यांना प्रतिबंधात्मक कीट पुरविणे यावर भर दिला गेला. पर्यायाने या हंगामात जिल्ह्यात कीटकनाशकाचा एकही बळी गेला नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
राष्ट्रीयीकृत बँका शेतकºयांना पीक कर्ज देत नाहीत, वाईट-उद्धट वागणूक देतात, मग शेतकºयांना सावकाराच्या दारी जावे लागते, त्यातून तो पिचला जातो, आर्थिक संकटात सापडतो व पुढे त्याच्यावर आत्महत्येची वेळ येते ही आतापर्यंतची पीक कर्जाबाबतची जिल्ह्याची मालिका राहिली आहे. परंतु याला या खरीप हंगामात फाटा देण्यात आला. त्यासाठी राष्ट्रीयीकृत काही बँकांकडील शासनाच्या जिल्ह्यातील ठेवी काढून घेऊन त्यांना धडा शिकविण्यात आला. अखेर त्या धसक्याने राष्ट्रीयीकृत बँका वठणीवर आल्या. पर्यायाने जिल्ह्यात त्यांचे पीक कर्ज वाटप १२०० कोटींवर पोहोचले आहे. ठेवी काढल्याने राष्ट्रीयीकृत बँकांच्या तमाम वरिष्ठांचे फोन आले. मात्र त्यांनाही ठणकावून सांगितले. त्याचवेळी पीक कर्ज वाटपातील परफॉर्मन्स दाखवा, ठेवी परत करू, असा पर्याय त्यांना देण्यात आला. त्यामुळेच जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांच्या पीक कर्ज वाटपाचा आकडा दरवर्षी पेक्षा कितीतरी पटीने वाढल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. सलग दोन वर्ष जिल्ह्यातील गणेशोत्सव, दुर्गोत्सव व अन्य सण-उत्सव शांततेत पार पाडण्यात प्रशासन यशस्वी झाले. जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे. पोलिसांकडून आलेल्या मोक्का, एमपीडीए, तडीपारीच्या प्रस्तावांवर जिल्हा दंडाधिकारी म्हणून वेळीच निर्णय घेतले, शांततेला आव्हान देणाऱ्या हिस्ट्रीशिटर,क्रियाशील गुन्हेगारांवर जरब निर्माण केल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
पाण्याची पातळी सात मीटरने वाढली
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले की, जिल्ह्यात यंदा परतीचा पाऊस बरसला नसला तरी त्यापूर्वी झालेल्या समाधानकारक पावसामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत सात ते आठ मीटरने वाढ झाली आहे. विहिरी, बोअरवेलला भरपूर पाणी आहे. धरण, तलावांमध्येही मोठा साठा आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार, वॉटर कप आदी उपक्रमांचेही हे फलित आहे. सर्वत्रच पाण्याची पातळी चांगली असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीषणता जाणवणार नाही. कदाचित अमृत योजनेच्या पाण्याची गरजही भासणार नाही. मात्र अमृत योजनेचे काम प्रगतीपथावर असून सिव्हील वर्क पूर्ण झाल्याचे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.

Web Title: Yavatmal in five schemes on Top 'Top'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.