थकीत बिलापोटी पसरणार यवतमाळ शहरात अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:10 PM2018-03-20T23:10:57+5:302018-03-20T23:10:57+5:30

पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या यवतमाळकरांना आता अंधाराचाही सामना करावा लागणार आहे. दोन कोटी ८१ लाख रुपये वीज बिल थकीत असल्याने महावितरण बुधवारी शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करणार आहे.

Yavatmal city spreads out of tiredness | थकीत बिलापोटी पसरणार यवतमाळ शहरात अंधार

थकीत बिलापोटी पसरणार यवतमाळ शहरात अंधार

Next
ठळक मुद्देमहावितरणचा शॉक : पालिकेकडे पथदिव्यांचे पावणे तीन कोटी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या यवतमाळकरांना आता अंधाराचाही सामना करावा लागणार आहे. दोन कोटी ८१ लाख रुपये वीज बिल थकीत असल्याने महावितरण बुधवारी शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करणार आहे. वारंवार नोटीस बजावूनही नगरपरिषदेने थकीत बिलाची रक्कम भरली नाही.
यवतमाळ शहरात २३ हजार ५०० पथदिवे आहेत. शहरातील विविध मार्गावर असलेल्या पथदिव्यांमुळे रात्री शहरात झगमगाट असतो. मात्र या पथदिव्यांचे नगरपरिषदेने बिल मात्र भरले नाही. यवतमाळ नगरपालिका व संलग्नीत लोहारा, वाघापूर, मोहा, उमरसरा, वडगाव आदी परिसरासह संपूर्ण शहरातील पथदिव्यांच्या वीज बिलापोटी दोन कोटी ८१ लाख ३८ हजार ७७९ रुपये थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्यासाठी महावितरण कंपनीने नगरपरिषदेला वारंवार विनंती केली. पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा करण्यात आला. वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस २३ फेब्रुवारीला बजावण्यात आली. त्यासोबतच वीज वितरण कंपनीच्यावतीने मौखिक विनंतीही करण्यात आली. परंतु नगरपरिषदेने वीज बिल मात्र भरले नाही. महावितरणने नोटीसमध्ये दिलेला १५ दिवसाचा कालावधीही निघून गेला. परंतु नगरपरिषद कोणताही निर्णय घेण्यास तयार नाही. परिणामी वीज वितरण कंपनी बुधवारी यवतमाळ शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करणार असल्याचे महावितरण कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी कळविले आहे. यवतमाळ शहरात ११५ कनेक्शनवरून वीज पुरवठा केला जातो. नगरपरिषदेने बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत वीज बिल भरले नाही तर सेक्शन आॅफीसचे कर्मचारी ११५ ठिकाणावरुन पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करणार आहे. यवतमाळ शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित झाला तर शहरात अंधाराचे साम्राज्य पसरणार आहे.
यवतमाळ शहरात ठिकठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. पाईपलाईनसाठीही खोदकाम करण्यात आले. यामुळे शहरातील एकही रस्ता चालण्यायोग्य नाही. पथदिवे असतानाही खड्ड्यात वाहन उसळून अपघात होत आहे. पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना रात्री वाहन चालविणे कठीण होणार आहे. आता नगरपरिषद काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
थकीत रक्कम विलीन होण्यापूर्वीच्या ग्रामपंचायतीकडील
पथदिव्यांचे थकीत असलेले बहुतांश बिल हे नगरपरिषदेत समाविष्ट होण्यापूर्वीच्या ग्रामपंचायतींचे आहे. जानेवारी २०१६ मध्ये शहरालगतच्या लोहारा, वाघापूर, मोहा, उमरसरा, वडगाव, पिंपळगाव, भोसा या ग्रामपंचायती समाविष्ठ झाल्या. त्यावेळी या ग्रामपंचायतीकडे मोठ्या प्रमाणात वीज बिल थकीत होते. आता या ग्रामपंचायतीच्या थकीत वीज बिलाचा भार नगरपरिषदेवर आला आहे. विशेष म्हणजे विलिनीकरणापूर्वीच्या यवतमाळ नगरपरिषदेतील वीज बिल नियमित भरले जात असल्याची माहिती आहे. मात्र आता समाविष्ठ ग्रामपंचायतीकडील थकीत वीज बिलापोटी संपूर्ण शहराला अंधारात जावे लागणार आहे.

Web Title: Yavatmal city spreads out of tiredness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.