The village lost from the map of India ... kapasi | भारताच्या नकाशातून हरवलेले गाव...कापशी

ठळक मुद्देलोकशाही नव्हे ‘टोळी’राज : ग्रामपंचायत नाही, पण मतदार आहेत, रस्ते, वीज, पाण्याचीही समस्या

किशोर वंजारी ।
आॅनलाईन लोकमत
नेर : भारतातल्या एका माणसाने नुकताच नव्या देशाचा शोध लावला. कोणत्याही देशाची मालकी नसलेला हा भूभाग त्याने ‘किंगडम आॅफ दीक्षित’ म्हणून घोषित केला अन् त्या देशाचा मीच राजा, असे जाहीरही केले... भारतीय रक्ताचा हा पराक्रम एका बाजूने तर दुसऱ्या बाजूला आपल्याच गावाजवळचे गाव आपण आपल्या देशात समाविष्ट करायला विसरून गेलो आहोत...
होय, ब्रिटिश राजवटीत भारताचा भाग असलेले एक गाव आता भारतीय लोकशाही राजवटीत मात्र भारताच्या नकाशावरच नाही. फार दूर नाही आपल्या नेर तालुक्यातच आहे हे दुर्दैवी गाव. कापशी त्याचे नाव. इंग्रज अधिकारी येथे राहायचे. त्यांचे जुने घर येथे आजही कायम आहे. कापशीला इंग्रज काळाचा इतिहास आहे, पण वर्तमान आणि भविष्य नाही.
भारत सरकार, महाराष्ट्र सरकार एवढेच काय कोणत्याही ग्रामपंचायतीच्या दफ्तरात या गावाला स्थान नाही. पण मजेची बाब, येथील गावकरी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदार आहेत!
कापशीतील ४६५ लोकसंख्येच्या गरजा कोण भागवित असेल? जगातली सर्वात मजबूत लोकशाही असलेल्या भारतातील हे गाव आजही टोळी संस्कृतीवर जगतेय. गावकरीच दर पाच वर्षांनी एकत्र येतात. एकाला अध्यक्ष बनवितात. तर इतर सात जणांना सदस्य म्हणून नेमतात. हीच कार्यकारिणी गावचा कारभार बघते. कोणतेही काम असेल तर लोकवर्गणी केली जाते. स्वयंघोषित सरपंच या लोकवर्गणीतून गावच्या गरजा भागवतो.
दोन ग्रामपंचायतींनी झिडकारले
कापशी गाव ३० वर्षांपूर्वी जांबोरा गटग्रामपंचायतीशी (ता. दारव्हा) संलग्न होते. मात्र जांबोरा गटग्रामपंचायतमधून कापशीला वगळण्यात आले. कापशीपासून तीनच किलोमीटरवर सारंगपूर (ता. नेर) ग्रामपंचायत आहे. मात्र, सारंगपूरच्या गावकऱ्यांनी कापशीचा समावेश आपल्या ग्रामपंचायतीत न करण्याचा ठराव घेतला. तेव्हापासून कापशी भारताच्या नकाशातून गायब झाले ते अजूनही गायबच आहे.
ब्रिटीश जहागिरीचे गाव
कापशी गावात इंग्रज लोक राहात होते. त्याचे घर आजही या गावात अस्तित्वात आहे. मतदारयादीत अजूनही टोनी उर्फ अँथनी विपलेश मेलवील या शेवटच्या काळातील शेवटच्या इंग्रज माणसाचे नाव कायम आहे. टोनीचा मूत्यू दोन वर्षांपूर्वीच झाला. त्यानंतर त्याच्या मुली जबलपूरला गेल्या. टोनीच्या पूर्वजांकडे सारंगपूर व कापशी या दोन गावची जहागीरदारी होती, असे या गावातील ८० वर्षीय पंढरी पांडुरंग खेरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. टोनी गेला आणि कोणी वालीच उरला नाही.
आम्ही मतदार, पण लाभार्थी नाही
नेर तालुक्यातील कापशी गावाची व्यथा : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
कापशी गाव कोणत्याच ग्रामपंचायतीत नाही. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात या गावाचा समावेश आहे. त्यामुळे कापशीवासी कागदोपत्री भारतीय नसले तरी मतदार आहेत. जिल्हा परिषदेची निवडणूक येताच या गावाकडे सर्वांचे लक्ष जाते. दौरे होतात. पुढे काहीच नाही.
कापशी गावाची स्वतंत्र ग्रामपंचायतही नाही. पण सोनवाढोणा पंचायत समिती आणि मांगलादेवी जिल्हा परिषद सर्कलमध्ये या गावाचा समावेश आहे. केवळ या निवडणुकीपुरतेच लोकप्रतिनिधी गावात प्राचाराला येतात. निवडणुकीनंतर कापशी कुठे आहे, कशी आहे हे कुणीही विचारत नाही. हातपाय जोडून थकलो पण गावाचे भविष्य अंधारात आहे, अशी व्यथा येथील वयोवृद्ध पुंडलिक पानचोरे यांनी व्यक्त केली.
सध्या अध्यक्ष सचिन खेरे, सदस्य येणूबाई मुरतुळे, गोपाळ विसनकर, शोभा डोंगरे, प्रवीण खेरे, राजू देवकर, प्रफुल्ल वासनीक ही ‘बॉडी’ काम पाहात आहे. लोकशाहीत जागा न मिळालेल्या या गावातील आदिवासी लोक गुरांसारखं जीवन जगतात. पाणी, वीज, नाल्या अशा एक ना अनेक समस्यांनी हे गाव अक्षरश: ग्रस्त आहे.
तरुणांचे लग्नाचे वांदे
कापशी गावाचे नाव नकाशातून गायब आहे. गावात समस्यांची जंत्री आहे. कागदपत्रांचा ठावठिकाणा नाही. त्यामुळे गावकऱ्यांना भविष्य नावाची गोष्टच उरलेली नाही. अशा गावात कुणीही सोयरिक संबंध करायला तयार नाही. कापशीच्या कोणत्याही तरुणाला मुलगी द्यायला कुणीही सहजासहजी राजी होत नाही. यामुळे कित्येक तरुण या गावात मी कशाला जन्मलो म्हणून पश्चात्ताप करीत आहेत.
आता गाव सोडण्याची तयारी
कापशीमध्ये पहिली ते पाचवीपर्यंत शाळा असून ३४ विद्यार्थी शिकत आहेत. त्यांच्यासाठी दोन शिक्षक आहे. पण आरोग्याची सोय नाही. पाणीपुरवठ्याची व्यवस्था नाही. सांडपाणी, रस्ते अशी कोणतीच व्यवस्था नाही. जांबोरा-कापशी रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनाचे फलक लावून आहे. पण हा रस्ता कधीच झाला नाही. रस्ताच नसल्याने एसटी बसही या गावाने पाहिली नाही. गावात स्मशानभूमी नाही. ४० वर्षानंतर या गावात पहिल्यांदा कुणाला तरी सरकारी नोकरी लागल्याचे सरपंच (ग्रामस्थांनी घोषित केलेले) सचिन खेरे यांनी सांगितले. जन्मतारखेच्या नोंदी असो की, कोणतेही कागदपत्र असो ते सर्व अडगळीत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता गाव सोडण्याची तयारी सुरू केली आहे.
९ वर्षांपासून प्रस्ताव धूळ खात
२००८ पासून या गावाला जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमधून कोणताही निधी या गावाला मिळालेला नाही. कापशी गावात ग्रामपंचायत व्हावी यासाठी २००९ मध्ये पहिल्यांदा प्रस्ताव पाठवण्यात आला. मात्र ९ वर्षांपासून या प्रस्तावाकडे प्रशासनाने ढुंकूनही पाहिले नाही. कोणताच निधी येत नसल्याने नाल्या, रस्ते, पाणीपुरवठ्याची व्यवस्था कोलमडली आहे.