जिल्ह्याने दिल्या दोन महिला खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:18 PM2019-03-19T22:18:53+5:302019-03-19T22:19:25+5:30

जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आजवर अनेक खासदार संसदेत पोहोचले. काही बोलले, काही नुसतेच गेले आणि आले. पण एवढ्या वर्षात महिलांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, असा विचारही राष्ट्रीय पक्षांच्या श्रेष्ठींनी केला नाही. दहा लाख २२ हजार ७६४ इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या आहे.

Two women MPs given in district | जिल्ह्याने दिल्या दोन महिला खासदार

जिल्ह्याने दिल्या दोन महिला खासदार

Next
ठळक मुद्देदहा लाख महिला मतदार : मात्र मूळ यवतमाळच्या एकाही महिलेला संधी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आजवर अनेक खासदार संसदेत पोहोचले. काही बोलले, काही नुसतेच गेले आणि आले. पण एवढ्या वर्षात महिलांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, असा विचारही राष्ट्रीय पक्षांच्या श्रेष्ठींनी केला नाही. दहा लाख २२ हजार ७६४ इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या आहे. पण या दहा लाख महिलांमधून आजवरच्या लोकसभा निवडणुकीत दहा महिला उमेदवार पुढे येऊ शकलेल्या नाही. किंबहुना त्यांना पुढे येऊ दिले गेलेले नाही. भावना गवळी आणि सूर्यकांता पाटील ही दोन नावे महिला खासदार म्हणून सांगता येतील. मात्र, त्यांचे मूळगाव लक्षात घेतले तर जिल्ह्यातून आजवर महिला खासदार झाली नाही, हे वास्तव स्वीकारावेच लागेल.
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघ तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये विभाजित झाले आहेत. यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर आणि हिंगोली हे ते तीन लोकसभा मतदारसंघ. त्यापैकी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात भावना गवळींना तीन वेळा खासदारकी मिळाली. तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात दोन वेळा सूर्यकांता पाटील यांना खासदारकी मिळविता आली. मात्र या दोन्ही महिला खासदारांचे मूळ यवतमाळ जिल्ह्यात नाही. भावना गवळी वाशीम जिल्ह्यात तर सूर्यकांता पाटील नांदेडच्या रहिवासी आहेत. हा विचार करता यवतमाळ जिल्ह्यातील १० लाखांपेक्षा अधिक संख्येने असलेल्या महिला मतदारांमधून आजवर एकही महिला खासदार होऊ शकलेली नाही.
पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून २०१४ च्या निवडणुकीपर्यंत विचार केल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा या राजकीय पक्षांनी जिल्ह्यातील महिलेला लोकसभेची उमेदवारीच दिलेली नाही. (शिवसेनेच्या भावना गवळी हा अपवाद असला तरी गवळी जिल्ह्याबाहेरच्या रहिवासी ठरतात.) वणीपासून आर्णीपर्यंत आणि झरीपासून उमरखेडपर्यंत विस्तारलेल्या यवतमाळ जिल्ह्यात १० लाख २२ हजार ७६४ महिला मतदार आहेत. जिल्ह्यातल्या दारूविक्रीपासून, अवैध वरली मटक्यासारख्या साऱ्याच प्रश्नांशी त्यांची ओळख आहे. किंबहुना या समस्यांमुळे त्याच सर्वाधिक पीडित आहेत. दारूबंदीचा प्रश्न घेऊन हजारो महिला रस्त्यावर आवाज उठवित आहेत. पण लोकसभेच्या मैदानात त्यातून एखादीला तिकिट द्यावे, तिला संसदेत धाडण्यासाठी झटावे, अशी मानसिकता एकाही पक्षाने दाखविलेली नाही. मोजक्या पाच-सहा महिलांनी हिंमत करून अपक्ष उमेदवारी दाखल करून पाहिली. पण कोट्यवधीचे ‘बजेट’ असलेल्या निवडणुकांमध्ये त्यांची कोणी दखलही घेतली नाही.
 

Web Title: Two women MPs given in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.