‘ईओं’च्या कक्षात शिक्षकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 09:59 PM2018-06-25T21:59:41+5:302018-06-25T22:00:09+5:30

जिल्हा परिषद शाळांना नियमबाह्यपणे आणि सरसकट जोडण्यात आलेल्या पाचव्या, आठव्या वर्गामुळे अनुदानित शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे.

The teachers in the 'eo' room are stuck | ‘ईओं’च्या कक्षात शिक्षकांचा ठिय्या

‘ईओं’च्या कक्षात शिक्षकांचा ठिय्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषद शाळांना नियमबाह्यपणे आणि सरसकट जोडण्यात आलेल्या पाचव्या, आठव्या वर्गामुळे अनुदानित शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. नोकरी जाण्याच्या धास्तीने अनुदानित शाळांचे शिक्षक घाबरलेले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने असे वर्ग बंद करावे, या मागणीसाठी शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात धडक दिली. शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हणणे ऐकून न घेतल्यामुळे शिक्षकांनी त्यांच्या कक्षापुढे ठिय्या आंदोलन सुरू केले.
अमरावती विभागातील जिल्हा परिषदांनी आरटीईच्या अटी न पाळता पाचवा आणि आठवा वर्ग सुरू केला. त्यामुळे त्याच गावातील अनुदानित शिक्षण संस्थेच्या शाळांवर पटसंख्या घटण्याचे संकट ओढवले आहे.
-तर १२०० शिक्षक अतिरिक्त होणार
जिल्हा परिषद शाळांमध्ये नियमबाह्यपणे पाचवा, आठवा वर्ग सुरूच राहिल्यास अनुदानित शाळांमधील साधारण १२०० शिक्षक अतिरिक्त होतील, अशी शक्यता शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर यांनी व्यक्त केली. प्रत्येक जिल्ह्यातच अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे जे वर्ग नियमबाह्य आहे, जेथे सुविधा नाही, असे वर्ग बंद करावे, अशी मागणीही भोयर यांनी केली.

नियमबाह्य वर्गांचा अहवाल १० जुलैपर्यंत
शिक्षक महासंघाचा ठिय्या : जिल्हा परिषदेत पोहोचला पोलीस ताफा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नियमबाह्य पाचवा व आठवा वर्ग बंद करण्याच्या मागणीसाठी शिक्षक महासंघाने ठिय्या आंदोलन सुरू केल्याने प्राथमिक शिक्षण विभागात तणावाची स्थिती निर्माण झाली. सायंकाळी पोलीस कर्मचाºयांसह प्रशासन पोहोचल्याने वातावरण अधिकच गंभीर झाले होते. परंतु, सीईओंनी तातडीने बैठक घेत आंदोलकांची बाजू ऐकून घेतली.
शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षण उपसंचालकांकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर उपसंचालकांनी यवतमाळच्या प्राथमिक शिक्षणाधिकाºयांकडून १९ मेपर्यंत वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविला होता. शिवाय, ज्या गावात १ किलोमीटरमध्ये पाचवा वर्ग उपलब्ध आहे, तसेच ३ किलोमीटर अंतरात आठवा वर्ग उपलब्ध आहे, अशा जिल्हा परिषद शाळेत हे वर्ग सुरू करता येणार नाही, असेही उपसंचालकांनी नमूद केले होते.
परंतु, शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत अहवाल न पाठविल्याने सोमवारी शिक्षक महासंघाने जिल्हा परिषदेत धडक दिली. उपसंचालकांच्या पत्रानुसार, नियमबाह्यपणे सुरू केलेले वर्ग बंद करावे, अशी मागणी केली. परंतु, शिक्षणाधिकारी काहीही तोडगा न काढता निघून गेल्या, असा आरोप शेखर भोयर यांनी केला. जोपर्यंत शिक्षणाधिकारी येऊन आमच्या प्रश्नावर तोडगा काढत नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका घेत शिक्षकांनी शिक्षणाधिकाºयांच्या कक्षातच ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान, वाशीमच्या शिक्षणाधिºयांनी सोमवारीच पत्र काढून नियमबाह्य वर्ग बंद करण्याचे आदेश तेथील गटशिक्षणाधिकाºयांना दिला. मात्र यवतमाळच्या शिक्षणाधिकारी जुमानण्यास तयार नाही, असा आरोप आंदोलकांनी केला.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष नीलेश तायडे, पी. एन. जरीले, बळीराम दिवटे, जी. डी. कैटिकवार, अनिल डहाके, प्रशांत उगले, प्रणील वानखडे, संजीव गुर्जर, डी. आर. बंगळे, अमोल पवार, पुरुषोत्तम दरेकार आदी उपस्थित होते.
सीईओंनी घेतली तातडीची बैठक
दरम्यान, सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर आंदोलन स्थळी आले. यावेळी पोलीस कर्मचाºयांनाही पाचारण करण्यात आले होते. सीईओ शर्मा यांनी तातडीने बैठक घेऊन शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेतले. उपसंचालकांच्या पत्रानुसार शिक्षण विभागाने अहवाल पाठविला नाही, असे त्यांनी कबूल केले. आता १० जुलैपर्यंत हा अहवाल तयार करून अंतराच्या अटीचे उल्लंघन होणाºया शाळेतील वर्ग बंद करण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: The teachers in the 'eo' room are stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.