Speak the role of the role of the role on the platform of words | शब्दांच्या व्यासपीठावर भूमिकन्येचे खडे बोल
शब्दांच्या व्यासपीठावर भूमिकन्येचे खडे बोल

ठळक मुद्देवैशालीच्या विशाल दृष्टीने शब्दप्रभू घायाळ : बोलणारी नाही, डोलणारी बाई चालते

अविनाश साबापुरे /रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : प्रज्ञावंत नयनतारा सहगल यांचे न वाचलेले भाषण आणि आयुष्यात पहिल्यांदाच वैशाली येडे यांनी केलेले भाषण... या दोन्ही भाषणांनी साहित्य संमेलनाचा पहिला दिवस गाजवून टाकला. संकुचित मनोवृत्तीच्या व्यवस्थेला या दोघींनीही अक्षरश: ‘येडे’ ठरविले. सहगल यांच्या भाषणावरून त्यांचे निमंत्रण रद्द झाले. त्यांच्याऐवजी शेतकरी महिला वैशाली येडे यांना उद्घाटक म्हणून मान देण्यात आला. ही शेतकरी महिला संमेलनाच्या व्यासपीठावर काही बोलू शकेल का, ही शंका खोटी ठरवत वैशाली म्हणाली, ‘ह्या लोकायले बोलणारी बाई नाई चालत. डोलणारी आन् डोलवणारी बाई मात्र चालते..!’
वैशाली येडे असो की, संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे असो... साहित्य महामंडळाच्या प्रभारी अध्यक्ष विद्या देवधर असो की यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचन चौधरी असो... या महिलांच्या भाषणांतून पुरुषप्रधान व्यवस्थेच्या अहंकाराला अत्यंत सुज्ञ शैलीत उत्तर दिले. संमेलनाचा पहिला दिवस महिलांची प्रज्ञा, महिलांच्या अस्मितेनेच गाजविला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलेला उद्घाटक म्हणून व्यासपीठावर स्थान मिळाले. या दुर्लभ संधीचा ही ग्रामीण बाई उपयोग करेल की नाही, केवळ सहानुभूती म्हणून तिला मान मिळाला मात्र उद्घाटन प्रसंगी ती साहित्यक्षेत्राला काही नवा विचार देऊ शकेल का अशा शंका घेतल्या जात होत्या. मात्र वैशाली येडे यांच्या अस्सल वºहाडी भाषेतील भाषणाने अशा शंकेखोरांना जबर उत्तर दिले. शिवाय, तिने वºहाडी भाषेला मराठीच्या सर्वोच्च मंदिरात सन्मान मिळवून दिला. तर दुसरीकडे पतीनिधनानंतर एकट्या जगणाऱ्या महिलांच्या प्रश्नांना वाचाही फोडली. शेती, उद्योग, सरकारी धोरण या विषयांवरही सडेतोड मत मांडले.
वैशालीचे खमके शब्द होते, ‘दिल्लीची नाई गल्लीचीच बाई कामी येते. शेवटी ह्या मराठीच्या सोहळ्याले कुंकवाचा टिळा लावाले मायासारखी विधवाच आली ना.’ साहित्यिकांनी संमेलनात घुसविलेल्या राजकारणाला तिने उत्तर दिले. तर राजकारणाने आणि भांडवलशाहीने शेतकºयांचा कसा घात केला हेही तिने नोंदविले. ‘माह्या नवºयानं आत्महत्या नाई केली. पुढचा जन्मी उद्योगपतीच्या घरी जन्म घेईन अन् भरघोस नफा कमविन म्हणून तो मेला. पण माहा याच जन्मावर विश्वास हाये. म्हणून मी याच जन्मात भांडून जगत हावो. मी एकटी जगतो पण कवाच ज्योतिषाले हात नाई दाखवत. जो मले निराधार समजून आंगावर हात टाकाचा प्रयत्न करते त्याले मी हात दाखवतो...’ वैशालीच्या या टोकदार निग्रही भाषणाने समाजाचे कान टोचले.
आपला सारा समाजच विधवा झाला हाये. एकट्या बाईले पाहून तो लक्ष्मणरेषा काढते. बाई नवºयाच्या घरात येते. ते कायले येते? पण आल्यावर तिले सारंच बदलाव लागते. नाव बी बदलते. आर्धी जिंदगी झाल्यावर बाईचं नाव बदलते. मर्दाचं नाव बदललं तं थो जगू शकन का? मी वैशाली धोटे होती. नंतर येडे झाली. पण सुधाकर येडेचा सुधाकर धोटे झाला असता तं? शेवटी गोधन आन् स्त्रिधन आजपर्यंत धनच वाटत आलं. हे विधवापण नैसर्गिक नाई. व्यवस्थेनं माह्या नवºयाचा बळी घेतला. म्हणून आम्ही ‘तेरवं’ केलं.... अशा ठसक्यातलं उद्घाटकीय भाषण करत वैशाली येडे यांनी समाजातल्या दांभिकतेला, व्यवस्थेतल्या बनवेगिरीला ‘येडे’ ठरविले.

‘त्या’ नसूनही होत्या अन् ‘ते’ होत्याचे झाले नव्हते
साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांना ऐनवेळी अडविण्यात आले. निमंत्रण रद्द करण्यात आल्याने त्या यवतमाळच्या संमेलनात आल्या नाही. पण त्या नसूनही उद्घाटनाच्या कार्यक्रमात शब्दा-शब्दात त्यांचा उल्लेख होता. संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे, उद्घाटक वैशाली येडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, साहित्य महामंडळाच्या प्रभारी अध्यक्ष विद्या देवधर या सर्वांच्या भाषणात नयनतारा प्रकरणाचा उल्लेख आलाच. कुठे खंत होती तर कुठे झाकण्याचा प्रयत्न होता. पण मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सरळसरळ नयनतारा निमंत्रण वापसीवरून सरकार, आयोजक, महामंडळाला दोषीच्या पिंजºयात उभे केले. सडेतोड शब्दात साºयांचाच निषेध केला. कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते तर ‘या स्मृती आयुष्यभर राहतील’ म्हणत भावूक झाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संमेलनातील हजारो प्रेक्षकांच्या चर्चेतही नयनतारा प्रकरणाचीच कुजबूज होती. काही जणींनी सहगल यांचे मुखवटे घातले. तर खुद्द संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत आजही नयनतारा सहगलच कायम आहेत. त्याचवेळी संमेलनावर सुरूवातीपासून एकछत्री अमल गाजवू पाहणारे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी राजीनामा देऊन बाजूला झाले. ते महामंडळाचे सदस्य म्हणूनही संमेलनात हजर राहिले नाही. शिवाय, त्यांच्या गैरहजेरीचा साधा उल्लेखही एकाही मान्यवराचा भाषणात आला नाही. आधीच छापून तयार झालेल्या काही जणांच्या भाषणात महामंडळ अध्यक्ष म्हणून जोशींचा उल्लेख होता. तोही अनेकांनी टाळला. माजी अध्यक्ष असाही उल्लेख झाला नाही.

लेखक अन् कास्तकार सारखेच, दोघांनाही भाव नाही
उद्घाटक म्हणून आपल्या नावाची घोषणा झाल्याचे कळताच शेतकरी विधवा वैशाली येडे म्हणाली होती, आता संमेलनात काय बोलाव थे काई सुचून नाई रायलं... पण प्रत्यक्ष संमेलनात मात्र तिने जोरदार शाब्दिक फटकारे हाणले. ‘माणसं पुस्तकं वाचून नाई समजत. त्यासाठी माणसातच जाव लागते’ हे विधान करून अस्सल शेतकरी कुटुंबातल्या वैशाली येडे यांनी आपल्या भाषणाला साहित्यिक स्पर्श दिला. पण खरा कहर तेव्हा झाला, जेव्हा वैशाली म्हणाली, आमचे कास्तकारावर तुमी लोकं पुस्तकं लिहिता, सिनेमे काढता. पण आमच्या जीवनात काहीच फरक नाई पडत. लेखक आन् कास्तकार सारखेच. दोघांनाही भाव मिळत नाही. ह्या साहित्य संमेलनातून येकच अपेक्षा हाये. अभावात जगणाºयालेच भाव भेटावं..!


Web Title: Speak the role of the role of the role on the platform of words
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.