अखेर उमरखेडला स्वतंत्र एसडीपीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 07:38 PM2017-07-26T19:38:19+5:302017-07-26T20:48:59+5:30

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर उमरखेडला स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आले आहे.

SDPO UMERKHED | अखेर उमरखेडला स्वतंत्र एसडीपीओ

अखेर उमरखेडला स्वतंत्र एसडीपीओ

Next
ठळक मुद्देपुणे ‘इंटेलिजन्स’ची टीम उमरखेडमध्ये

अविनाश खंदारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर उमरखेडला स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. गृहविभागाने मंगळवार २५ जुलै रोजी या संबंधीचे आदेश जारी केले. आता जिल्ह्यात एकूण सहा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये झाली आहेत.
आतापर्यंत उमरखेड परिसर पुसद उपविभागात समाविष्ठ होता. परंतु पुसदकडील व्याप आणि उमरखेड परिसराची संवेदनशीलता लक्षात घेता उमरखेडला स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय स्थापन करण्याची मागणी जिल्हा पोलीस दलाकडून केली जात होती. यासंबंधी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने २९ एप्रिल २०१७ ला महासंचालक कार्यालयाकडे प्रस्तावही सादर केला होता. अखेर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यासंबंधीचे आदेश २५ जुलै रोजी जारी करण्यात आले. आता उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांतर्गत दराटी, बिटरगाव, महागाव, पोफाळी आणि उमरखेड या पाच पोलीस ठाण्यांचा समावेश राहणार आहे. तर खंडाळा, वसंतनगर, पुसद शहर व पुसद ग्रामीण हे चार पोलीस ठाणे पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांतर्गत समाविष्ठ राहतील.
३१ पोलीस ठाण्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात वणी, पांढरकवडा, यवतमाळ, दारव्हा, पुसद हे पाच पोलीस उपविभाग आहेत. त्यात आता उमरखेडची भर पडल्याने ही संख्या सहा झाली आहे.
पांढरकवड्याचे पद उमरखेडला
पांढरकवडा येथील शासनाच्या ४ मार्च २०१४ च्या निर्णयानुसार पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्राकरिता पोलीस उपअधीक्षकाची २० पदे मंजूर आहेत. त्यातील एक पद उमरखेड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून स्थानांतरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
स्वतंत्र एसडीपीओंची पार्श्वभूमी
पुसद व उमरखेड ही दोनही शहरे अतिसंवेदनशील मानली जातात. या तालुक्यांच्या लोकसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्या भागात नेहमीच लहान मोठ्या जातीय दंगली घडतात. पूर्वीच्या पुसद उपविभागात नऊ पोलीस ठाणे आहेत. त्यापैकी सात पोलीस ठाण्यांचे पुसदपासूनचे अंतर सुमारे ७० किलोमीटरचे आहे. पर्यायाने पुसद एसडीपीओ कार्यालयावर कामाचा ताण वाढतो. कायदा व सुव्यवस्था राखतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच पुसदचे विभाजन करून उमरखेड या स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या स्थापनेची मागणी होती. ही मागणी मंगळवारी मंजूर झाली आहे.


पुणे ‘इंटेलिजन्स’ची टीम उमरखेडमध्ये
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (स्टेट इंटेलिजन्स) पुणे येथील कार्यालयाची एक चमू मंगळवारी उमरखेडमध्ये दाखल झाली. उपअधीक्षक लगडे व अन्य दोन पोलीस निरीक्षकांचा समावेश असलेल्या या चमूने उमरखेडला जाण्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तेथील अतिसंवेदनशीलतेवर चर्चा केल्याचे सांगितले जाते. आगामी गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी आतापासूनच तयारी चालविली असून इंटेलिजन्सच्या टीमची उमरखेड भेट व मुक्काम हा या तयारीचाच भाग असल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीला उमरखेड येथे गालबोट लागले होते. तत्कालीन ठाणेदाराला हवेत गोळीबार करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली होती. त्या घटनेचे पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांनी आतापासूनच सावधगिरी बाळगल्याचे दिसते.
 

Web Title: SDPO UMERKHED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.