पुसद उपविभागात पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 10:29 PM2018-08-16T22:29:59+5:302018-08-16T22:30:23+5:30

पुसद, उमरखेड आणि महागाव तालुक्यात संततधार पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहात आहे. पैनगंगेसह इतर नद्यांच्या पुराचे पाणी कााही गावात शिरल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. बचाव पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.

Rainfall in Pusad subdivision | पुसद उपविभागात पावसाचा कहर

पुसद उपविभागात पावसाचा कहर

Next
ठळक मुद्देदराटीत ११५ मिमी : उमरखेड, महागाव तालुक्यातील नागरिकांना हलविले

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद/उमरखेड/महागाव/दिग्रस : पुसद, उमरखेड आणि महागाव तालुक्यात संततधार पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहात आहे. पैनगंगेसह इतर नद्यांच्या पुराचे पाणी कााही गावात शिरल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. बचाव पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.
पुसद येथे पालिकेसमोरील जुने पिंपळाचे झाड संततधार पावसामुळे उन्मळून पडले. त्यामुळे गांधी चौक ते तहसील चौक दरम्यानची वाहतूक ठप्प पडली. संततधार पावसामुळे पूस धरण ओव्हर फ्लो झाले आहे. शहरात सर्वत्र पाणी साचले आहे. काही भागातील वीज प्रवाह खंडित झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
उमरखेड तालुक्यात दराटी येथे तब्बल ११५ मिमी पाऊस पडला. त्यामुळे शिवाजीनगर व कोरटा येथील अनेक घरात पाणी शिरले. प्रशासनाने तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. उमरखेड-पुसद मार्गावरील वाहतूक सकाळी ९ वाजतापासून बंद आहे. दहागाव नाल्याला पूर आल्याने तसेच मुळावा-शेंबाळपिंपरी मार्गावरील नाल्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली. तहसीलदार भगवान कांबळे व प्रशासन परिस्थितीवर नजर ठेवून आहे.
महागाव तालुक्यात करंजखेड, धनोडा, गुंज, तिवरंग आदी गावांत पाणी शिरले. रेड झोनमधील मोरथ, वाकोडी, कलगाव, अनंतवाडी, हिवरा, जनुना, करंजखेड, संगम, काळी दौ., वडद, ब्रह्मी आदी गावात नाल्याच्या काठावरील घरात पाणी शिरले. तेथील नागरिकांना शाळेत हलवून प्रशासनाने त्यांची जेवणाची व्यवस्था केली. धनोडा पुलावरून पाणी वाहात असल्याने माहूरकडील वाहतूक बंद झाली. १५ गावांत पाणी शिरले असून वाकान व तिवरंगचा संपर्क तुटला. प्रशासनाने यवतमाळातून बचाव पथक पाचारण केले. धनोडा येथे माहूरला जाणारे अनेक प्रवासी खोळंबून पडले आहे. तिवरंग येथे भाऊराव जगताप यांची चार जनावरे पुरात वाहून गेले. तहसीलदार नामदेव इसाळकर, नायब तहसीलदार जी.एम. कदम, ठाणेदार दामोदर राठोड परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. वेणी धरणावरून गोविंदा अडाणे, गणेश लोणारे यांना होडीसह वाकानला पाठविण्यात आले आहे.
दिग्रसमध्ये शंकरनगर, अंबिकानगर, शिवाजी चौक आणि मानोरा चौकापर्यंत पाणी पोहोचले.
महागावात १५ गावांना सतर्कतेचा इशारा
सवना : येथून जवळच असलेल्या वेणी येथील लोअर पूस प्रकल्पाचे आठ दरवाजे प्रत्येकी सव्वा मीटरने उघडण्यात आले. त्यातून ४८ क्यूबिक मीटर पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पूस नदी काठावरील मोरथ, वाकोडी, महागाव, कलगाव, करंजखेड, जनुना, हिवरा, वाघनाथ, संगम, अनंतवाडी, धनोडा येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धारेगाव येथे जनावरे वाहून गेली
बिजोरा : महागाव तालुक्यातील धारेगाव येथील नाल्याच्या पुरात काही जनावरे वाहून गेली. नेमकी किती जनावरे वाहून गेली याची माहिती मिळू शकली नाही. पोलीस पाटील दत्तराव इंगळे यांनी प्रशासनाला माहिती दिली. नाल्या काठावरील अनेक घरातही पाणी शिरले आहे.
पिके पाण्याखाली
उमरखेड : तालुक्यात कृष्णापूर शिवारात अनेक शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे जवळपास ४०० एकरातील पिके पाण्याखाली आली आहे. अनेकांचे स्प्रिंक्लर पाईप वाहून गेले. पिरंजी, कृष्णापूर, ढाणकी परिसरातील शेतकऱ्यांची हानी झाली. शिवाय महागाव तालुक्यात अनेक गावातील वीजपुरवठा खंडित झाल्याने तारांबळ उडाली. खडका-गुंज रस्त्यावर झाड कोसळल्याने मार्ग बंद आहे.
धावंडाचे पाणी दिग्रसमध्ये शिरले
दिग्रस : गुरुवारी दुपारी ३.३० वाजतापासून दिग्रसला झोडपून काढले. यात धावंडा नदीला पूर आला. पुराचे पाणी शहरातील काही भागात शिरले. काही घरात जवळपास तीन फूट पाणी साचले होते. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दुपारी ४ वाजतापासून नेटसेवाही ठप्प होती.

Web Title: Rainfall in Pusad subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस