Rain and hailstorm | पाऊस व गारपिटीचा तडाखा

ठळक मुद्देपिकांचे नुकसान : लासीना येथे बैल विहिरीत पडले, सर्व्हेक्षणाचे आदेश

ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : सोमवारी सायंकाळी झालेला पाऊस, वादळ आणि गारपिटीचा शेतीपिकासह घरांना तडाखा बसला. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कळंब तालुक्यातील नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. घारफळ परिसरातील नुकसानीची पाहणी आमदार डॉ.अशोक उईके यांनी केली. सोनखास परिसरातील रबीची पिके भूईसपाट झाली.
घारफळ परिसरात गारांचा सडा
घारफळ : परिसरातील अनेका गावे सोमवारी गारांच्या तडाख्यात सापडली. पाचखेड, आष्टारामपूर, सौजना, गोंधळी, किन्ही, वाटखेड, येरंडगाव या गावांमध्ये अधिक नुकसान झाले. जवळपास अर्धा तासपर्यंत वादळ, पाऊस सुरू होता. २०० ग्रॅम वजनाच्या गारांचा सर्वत्र सडा पडला होता. अनेकांच्या घरावरील कौल फुटले. पाचखेड येथे गारांमुळे २० बैल जखमी झाले. बादल यांच्या पाचखेड शिवारातील केळीच्या बागेचे नुकसान झाले. आष्टारामपूर येथील सात मजूर जखमी झाल्याने त्यांच्यावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहे. यामध्ये वतीने टेवरे, वंदना नागतोडे, ललिता डंभारे, अंजना कुथटे, गंगाधर नाकतोडे, पाचखेड येथील मधुकर ठोंबरे, श्रीराम नागपूरे यांचा समावेश आहे. दरम्यान मंगळवारी आमदार प्रा. डॉ. अशोक उईके, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, बाभूळगावचे तहसीलदार दिलीप झाडे यांनी प्रभावित परिसराची पाहणी केली नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश आमदार डॉ. उईके यांनी दिले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सतीश मानलवार, संजय राठी, पाचखेडचे सरपंच पंकज देशमुख आदी उपस्थित होते.
कळंबमध्ये सर्व्हेक्षणाचे आदेश
कळंब : सोमवारी झालेला मुसळधार पाऊस आणि गारपिटीने तालुक्यातील पिकांना मोठा फटका बसला. काढणीवर आलेला हरभरा, भरलेला गहू आणि तोडणीवर आलेला संत्रा हातचा गेला. भाजीपाला पिकांनाही गारपिटीचा मोठा फटका बसला. शासनाने सर्वे करून शासकीय मदत तातडीने द्यावी, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकरी चंद्रशेखर चांदोरे यांच्यासह अनेकांनी केली आहे.
दरम्यान, गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश महसूल व कृषी यंत्रणेला दिले आहे. यासंदर्भातील अहवाल तातडीने शासनाकडे पाठविला जाईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी दिली.
बैलजोडी विहिरीत पडली
सोनखास : सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसासह गारपिटीचा परिसरातील अनेक गावांना तडाखा बसला. लिंबाच्या आकाराच्या गारांनी गहू, हरभरा जमीनदोस्त केला. लासीना येथे दोन बैल विहिरीत कोसळले. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले.
उत्तरवाढोणा, सोनवाढोणा, मालखेड हेटी, लासीना, वाघापूर, घुई आदी गावांना तडाखा बसला. लासीना येथील आनंदराव केशव गाडेकर व सीताबाई आनंदराव गाडेकर या वृद्ध दाम्पत्याला घरकूलाचा लाभ मिळाला. छतापर्यंत बांधकाम झालेले त्यांचे घर कोसळले. लासीना येथील शेषराव राठोड यांची बैलजोडी गारांचा मार बसल्याने घराकडे निघाली असतानाच विहिरीत कोसळली. गावकºयांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या मदतीने बैलजोडी बाहेर काढली. लासीना, हेटी येथील विनायक वाघाडे यांच्या घरावरील टीन उडाले.
काही गावातील विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. यवतमाळ रोडवरील जयभवानी आणि जिंगाट ढाब्यावरील टीनपत्रे उडाली. राजन भोरे यांच्या शेतातील शेळी पालनाच्या फार्मवरील टीनपत्रे उडाले.अनेकांचे गारपिट आणि वादळाने नुकसान झाले.