साहित्य संमेलन; रस्त्यावर, प्रेक्षकांतून अन् व्यासपीठावरूनही शिक्षणमंत्र्यांना विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 09:50 PM2019-01-11T21:50:13+5:302019-01-11T21:50:45+5:30

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शुक्रवारी यवतमाळात आलेले शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांना चौफेर विरोधाचा सामना करावा लागला.

protests against the education minister in Yawatmal Samelan | साहित्य संमेलन; रस्त्यावर, प्रेक्षकांतून अन् व्यासपीठावरूनही शिक्षणमंत्र्यांना विरोध

साहित्य संमेलन; रस्त्यावर, प्रेक्षकांतून अन् व्यासपीठावरूनही शिक्षणमंत्र्यांना विरोध

googlenewsNext
ठळक मुद्देतावडे म्हणाले, निषेधाचा संमेलनाशी संबंध नाही, तुम्ही बसा खाली

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शुक्रवारी यवतमाळात आलेले शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांना चौफेर विरोधाचा सामना करावा लागला. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ‘तावडे मुर्दाबाद’चे नारे देत काळे झेंडे दाखविले. तर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी संमेलनाच्या मंडपात त्यांच्या निषेधाचे नारे लावले. तर खुद्द मावळत्या संमेलनाध्यक्षांनी व्यासपीठावरून ‘सरकारचे धोरण विनोदी’ आहे असा टोला लगावला.
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी ना. विनोद तावडे प्रमुख अतिथी म्हणून आले होते. मात्र संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याचा मुद्दा आणि अमरावतीत विद्यार्थ्यांसाठी वापरलेली भाषा या विषयावर यवतमाळात त्यांच्याबाबत रोष दिसला. तावडे शहरात दाखल होताच दुपारी ३.३० वाजता एनएसयूआय, युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी विश्रामगृहासमोर त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविले. त्याचवेळी मुर्दाबादचे नारे दिल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या आंदोलकांना तत्काळ ताब्यात घेतले. अमरावती येथे विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांशी केलेल्या वर्तवणुकीवरून त्यांचा सर्वत्र निषेध नोंदविला जात आहे. त्याचेच पडसाद शुक्रवारी यवतमाळात उमटले. या आंदोलनात एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ शिर्के व ललित जैन, राजीक पटेल, आदित्य ताटेवार, अमित बिडकर, शोएब पठाण, शेख शब्बीर यांनी तावडेंचा निषेध केला. त्यामुळे त्यांना पोलिसांनी तत्काळ स्थानबद्ध केले.
त्यानंतर ना. विनोद तावडे संमेलनाच्या व्यासपीठावर पोहोचले. प्रमुख अतिथी म्हणून त्यांचे भाषण सुरू होताच उपस्थितांमधून विनोद तावडे यांचा निषेध असो, तावडे हाय हाय अशी घोषणाबाजी सुरू झाली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी या घोषणा सुरू केल्या होत्या. गलबला ऐकून अनेक प्रेक्षक जागेवर उठून उभे राहिले. मात्र व्यासपीठावर भाषण करत असलेले तावडे म्हणाले, माझ्या अमरावतीच्या प्रकरणावरून हा निषेध सुरू आहे. या निषेधाचा आणि या संमेलनाचा काहीही संबंध नाही. शिक्षणमंत्री म्हणून ते माझा निषेध करीत आहे. इथे मी शिक्षणमंत्री म्हणून उपस्थित नाही. तुम्ही खाली बसा. तावडेंचे भाषण सुरू असले तरी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरूच होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना लगेच स्थानबद्ध केले.
रस्त्यावर, संमेलनाच्या प्रेक्षकांतून विरोध झाल्यावरही तावडे हलले नाही. मात्र चक्क संमेलनाच्या व्यासपीठावर त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. संमेलनाचे मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख शेतकºयांच्या समस्या मांडताना म्हणाले, महाराष्ट्रात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या म्हणजे सरकारच्या विनोदी धोरणाचे उदाहरण आहे. हा अध्यक्षीय टोला मात्र तावडेंना चिडवून गेला. त्यामुळेच ना. तावडेंनी आपल्या भाषणातून सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्नही केला.
 

Web Title: protests against the education minister in Yawatmal Samelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.