माजी राज्यमंत्र्यांच्या घरावर प्राप्तीकर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 10:06 PM2019-02-05T22:06:29+5:302019-02-05T22:07:53+5:30

भाजपा नेते तथा माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या दिग्रस येथील घरावर मंगळवारी सकाळी प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाड घातली. नागपूर येथील प्राप्तीकर विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे २० सदस्यीय पथक दोन वाहनांनी दिग्रसमध्ये दाखल झाले.

Pratikker Dhad at the residence of former minister of state | माजी राज्यमंत्र्यांच्या घरावर प्राप्तीकर धाड

माजी राज्यमंत्र्यांच्या घरावर प्राप्तीकर धाड

Next
ठळक मुद्देभाजपा नेते : नागपूरचे २० सदस्यीय पथक

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : भाजपा नेते तथा माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या दिग्रस येथील घरावर मंगळवारी सकाळी प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाड घातली.
नागपूर येथील प्राप्तीकर विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे २० सदस्यीय पथक दोन वाहनांनी दिग्रसमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्या समवेत पोलीस कर्मचारीही होते. आवारात शिरताच पोलिसांनी फाटक बंद केले. त्यानंतर घरात सर्च सुरू झाला. माजी राज्यमंत्री संजय देशमुख आर्णीकडे निघाले होते. मात्र धाडीची माहिती मिळताच ते घरी परत आले. सदर प्रतिनिधीने प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता धाडीची कारवाई अद्याप पूर्ण न झाल्याने आत्ताच काहीही सांगणे शक्य नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ही धाड एक किंवा दोन दिवसही चालू शकेल असे संकेत या अधिकाऱ्याने दिले.
संजय देशमुख काही वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडून भाजपात दाखल झाले. मात्र विधान परिषद, मंडळ-महामंडळ या पैकी कुठेच पुनर्वसन न झाल्याने त्यांचा हिरमोड झाला होता. ते भाजपात अस्वस्थ असल्याचीही चर्चा राजकीय गोटात आहे. दरम्यान सत्ताधारी असूनही संजय देशमुख यांच्या घरावर प्राप्तीकर विभागाची धाड पडल्याने जिल्ह्याच्या राजकारणात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विशेष असे संजय देशमुख यांच्या नेतृत्वात नुकताच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढला गेला होता. या माध्यमातून जणू भाजपा सरकारलाच टार्गेट केले गेले. त्यामुळे तर ही धाड नव्हे ना अशी उलटसुलट चर्चा आहे. रियल इस्टेट व्यवसायातही त्यांनी बरीच उलाढाल केल्याचे सांगितले जाते. त्याचा हिशेब जुळविण्यासाठी तर ही प्राप्तीकरची धाड नव्हे ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: Pratikker Dhad at the residence of former minister of state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.