यवतमाळात विकास कामांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:45 PM2018-03-21T23:45:43+5:302018-03-21T23:45:43+5:30

धामणगाव आणि आर्णी मार्गाचे चौपदरीकरण, अमृत योजनेच्या पाईपलाईनचे काम शहरात धडाक्यात सुरू आहे. गत तीन-चार महिन्यांपासून सुरू असलेल्या विकास कामांच्या गोंधळाने यवतमाळकर प्रचंड त्रस्त झाले आहे.

The mess of development work in Yavatmal | यवतमाळात विकास कामांचा गोंधळ

यवतमाळात विकास कामांचा गोंधळ

Next
ठळक मुद्देनागरिकांचे हाल : जीवन प्राधिकरण, वीज वितरण, बांधकाममध्ये समन्वयाचा अभाव

सुरेंद्र राऊत ।
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : धामणगाव आणि आर्णी मार्गाचे चौपदरीकरण, अमृत योजनेच्या पाईपलाईनचे काम शहरात धडाक्यात सुरू आहे. गत तीन-चार महिन्यांपासून सुरू असलेल्या विकास कामांच्या गोंधळाने यवतमाळकर प्रचंड त्रस्त झाले आहे. जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनी आणि बांधकाम विभाग यांच्यात समन्वय नसल्याने यात आणखीनच भर पडत आहे.
यवतमाळ शहरात यावर्षी ‘प्रचंड’ विकास कामे सुरू आहे. आर्णी मार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी दोन्ही बाजूला खोदकाम झाले आहे. यामध्ये वीज खांब, पाणी पुरवठा योजनेचे पाईपलाईन यासह दूरसंचारचे भूमिगत केबलही तुटले आहे. नळ पाईप फुटल्याने अनेकांच्या घरी नाळाचे पाणीच येत नाही. सध्या यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई आहे. जीवन प्राधिकरणाचे २० ते २२ दिवसानंतर सोडलेले पाणी या फुटलेल्या पाईपमधूनच वाहून जाते. दुरुस्ती झाल्यानंतर पुन्हा पाईप फुटून पाण्याचा अपव्यय सुरू होतो. बांधकाम झालेल्या रस्त्यावरून लगतच्या कॉलनींमध्ये रपटे बांधण्यात आले. परंतु या रपट्याची उंची आणि रस्ते यात कुठेही समन्वय दिसत नाही. रपटे उंच आणि रस्ते खड्ड्यात यामुळे वाहनधारकांना अडचण जाते. आर्णी मार्गावर सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. बुधवारी काम सुरू असलेल्या भागात चक्क गिट्टीने भरलेला ट्रक काँक्रीटमध्ये फसला. हा फसलेला ट्रक या कामाच्या गुणवत्तेचे दर्शनच घडवित होता.
शहरातीलच धामणगाव मार्गाचहीे चौपदरीकरण केले जात आहे. या कामांची पहिली कुºहाड पडली ती शतकोत्तरी वृक्षांवर. धामणगाव मार्गाची ओळख असलेले दोन्ही बाजूचे निंबाचे वृक्ष तोडण्यात आले. त्यानंतर नालीसाठी खोदकाम करण्यात आले. या खोदकामात जलवाहिन्या, भूमिगत वीज केबल तुटले आहे.
धामणगाव मार्गावर ठिकठिकाणी उघडे पडलेले वीज केबल आणि नळ आल्यानंतर धो-धो वाहणारे पाणी दिसते. खोदकाम करताना कोणतेही नियम पाळले जात नाही. टिंभर भवनच्या पुढे वीज खांबाजवळून नालीचे खोदकाम झाले. त्यामुळे वीज खांब पडण्याच्या अवस्थेत आला. हा खांब कोसळून अपघात होऊ नये म्हणून त्या भागातील नागरिकांनी चक्क नॉयलॉनच्या दोरीने दुसऱ्या खांबाचा आधार घेऊन कोसळणाºया खांबाला आधार दिला आहे. हा प्रकार कुणालाही चिड आणणारा आहे.

खोदकामाने फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम प्राधिकरणाकडून केले जाते. मात्र या दुरुस्तीच्या कामात भूमिगत वीज केबल तुटली जाते. त्यानंतर वीज वितरण भूमिगत केबलच्या दुरुस्तीसाठी खोदकाम करते तेव्हा पुन्हा जलवाहिनी फुटते, असा प्रकार गेल्या महिनाभरापासून सुरू आहे.

आर्णी आणि धामणगाव मार्गावर झालेल्या खोदकामाने या भागातील दूरध्वनी संच गत सहा महिन्यांपासून बंद आहे. त्याचे बिल मात्र नियमित येत आहे. यामुळे अनेकांनी दूरध्वनी सेवा कायमची बंद करण्याचे अर्जच दूरसंचार विभागाकडे दिले आहे. या भागातील ब्रॉडबँड आणि इतर सेवा प्रभावित झाली आहे.

इंदिरा गांधी मार्केटमध्ये अनाठायी खोदकाम
कुठल्याही योजनेत पाईपलाईनचे काम हे शेवटपासून अथवा सुरुवातीपासून केले जाते. परंतु यवतमाळ शहरात अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्याचा अजब नमुना दिसून येते. इंदिरा गांधी मार्केट ते पाच कंदील चौक दरम्यान रस्ता खोदून मोठ्ठाले पाईप टाकण्यात आले. मधातच पाईप टाकण्याचा प्रकार म्हणजे प्रसिद्धीसाठी तर नव्हे ना असा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या या रस्त्यावरून जायचा प्रत्येकजण टाळत आहे. प्रचंड धुळीचे लोट तेथे दिवसभर असतात. गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने या रस्त्याला पांदण रस्त्याचे स्वरूप आले होते.

बेंबळा मुख्य पाईपलाईनला नागमोडी वळण
टाकळी फिल्टर प्लाँट ते जीवन प्राधिकरण कार्यालयापर्यंत प्रस्तावित असलेल्या पाईपलाईनच्या कामात काहींनी हस्तक्षेप केला. यामुळे धामणगाव मार्गाने सरळ येणारी पाईपलाईन आता नागमोडी वळण घेऊन येत आहे. ही पाईपलाईन राणीसती मंदिर, लकडगंज परिसर, अप्सरा टॉकीज मार्गे हनुमान आखाडा चौकातून वळविण्यात आली आहे. कुठलीही पाईपलाईन तांत्रिक दृष्ट्या जेवढी सरळ तेवढी उपयोगिता अधिक असते. परंतु येथे नागमोडी वळणाची पाईपलाईन टाकण्याचा प्रताप सुरु आहे.

Web Title: The mess of development work in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.