पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होती सभा अन् पाण्याअभावी विद्यार्थिनीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 07:18 AM2019-02-22T07:18:26+5:302019-02-22T07:18:58+5:30

पांढरकवडा येथील महिला मेळाव्यातील घटना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होती सभा

The meeting of Prime Minister Narendra Modi and the death of the student due to lack of water | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होती सभा अन् पाण्याअभावी विद्यार्थिनीचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होती सभा अन् पाण्याअभावी विद्यार्थिनीचा मृत्यू

नरेश मानकर

पांढरकवडा (यवतमाळ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पांढरकवडा येथे शनिवारी झालेल्या महिला महामेळाव्यात ५-६ तास पाण्याचा थेंबही न मिळाल्याने प्रकृती खालावून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. क्षितिजा बाबूराव गुड्डेटवार (१२, रा. शिवाजी वार्ड) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

क्षितीजा ही मूळची नांदेड जिल्ह्यातील आहे. वडिलांचे चार वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर ती आईसह आजोळी पांढरकवडा येथे राहायला आली. येथील जिल्हा परिषद विद्यालयात ती शिकत होती. १६ फेब्रुवारी रोजी स्वयंसाहाय्यता समूहाच्या महिलांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला पंतप्रधानांनी संबोधित केले. या मेळाव्यासाठी शिवाजी वार्डातील काही महिला गेल्या होत्या. त्यांच्यासोबत क्षितीजा, तिची आई सुनीता व सात वर्षांचा भाऊ कृष्णासुद्धा गेला होता. सकाळी ११ वाजताची सभा असल्याने उन्हही जोरात होते. मेळाव्याच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने कित्येक महिलांचा जीव कासावीस झाला होता. गर्दीमुळे महिलांना बाहेर निघणे कठीण होते.

‘जागीच बसून रहा’ : पोलिसांचे फर्मान

सुरक्षेच्या कारणावरून ‘जागीच बसून रहा’ असे फर्मान पोलीस अधिकाऱ्यांकडून सोडले जात होते. महिलांना पाच ते सात तास पाण्याविना रहावे लागले. वेळीच पाणी न मिळाल्याने घरी आल्यानंतर क्षितिजाची प्रकृती खालावली. तिला आधी पांढरकवड्यातील खासगी रुग्णालयात, नंतर उपजिल्हा रुग्णालयात व तेथून यवतमाळला हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूरला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता पाण्याअभावी तिचे अवयव निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्यावर उपचार शक्य नसल्याचेही सांगण्यात आले. अखेर आॅक्सीजन लावून क्षितीजाला पांढरकवडा येथे घरी आणण्यात आले. मात्र तेथे बुधवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली. पांढरकवडा येथे दुपारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
महिलांमध्ये संतप्त भावना
सभेत पाण्याची व्यवस्था न केल्याने क्षितीजाचा मृत्यू झाल्याची संताप्त भावना स्थानिक महिलांनी व्यक्त केली. क्षितीजाचे बुधवारी निधन झाले, तरी कुणी भाजपा पदाधिकारी तिच्या घराकडे फिरकला नाही.

पोलिसात तक्रार नोंदविणार
मृतक क्षितीजाची आई सुनीता गुड्डेटवार या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करणार असल्याचे पद्मशाली समाजाच्या एका पदाधिकाºयाने गुरुवारी ‘लोकमत’ला सांगितले.

क्षितीजाला नरेंद्र मोदींच्या महिला मेळाव्यात वेळीच पिण्याचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे तिची प्रकृती खालावली व त्यातच तिचा मृत्यू झाला. मात्र यात आता नेमका दोष कुणाला द्यावा हेच समजत नाही.
- विनोद पेंटावार (पांढरकवडा) क्षितीजाचे मामा.

Web Title: The meeting of Prime Minister Narendra Modi and the death of the student due to lack of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.