Lok Sabha Election 2019; सट्टा बाजारात शिवसेनेला सर्वात कमी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 08:31 PM2019-04-12T20:31:59+5:302019-04-12T20:35:15+5:30

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेना व काँग्रेसमध्ये थेट आणि टफ लढत झाली. बहुतांश ठिकाणी फिप्टी-फिप्टी चालल्याने नेमका कोण निवडून येणार याचा अंदाज बांधणे भल्याभल्या राजकीय तज्ज्ञांनाही कठीण झाले आहे.

Lok Sabha Election 2019; The lowest price in the market for the Shiv Sena | Lok Sabha Election 2019; सट्टा बाजारात शिवसेनेला सर्वात कमी भाव

Lok Sabha Election 2019; सट्टा बाजारात शिवसेनेला सर्वात कमी भाव

Next
ठळक मुद्देयवतमाळ-वाशिम लोकसभा : शिवसेना ७० पैसे, काँग्रेस १ रुपया ४० पैसे, गुप्तचरांचा अहवाल मात्र काँग्रेसला पोषक

राजेश निस्ताने।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेना व काँग्रेसमध्ये थेट आणि टफ लढत झाली. बहुतांश ठिकाणी फिप्टी-फिप्टी चालल्याने नेमका कोण निवडून येणार याचा अंदाज बांधणे भल्याभल्या राजकीय तज्ज्ञांनाही कठीण झाले आहे. गुप्तचर यंत्रणा काँग्रेसच्या विजयाचे संकेत देत असताना सट्टा बाजार मात्र सर्वात कमी दर सांगून शिवसेनेकडे आपला कल दाखवित आहे. त्यामुळे एकूणच संभ्रमाची स्थिती असून खरे चित्र २३ मे नंतरच स्पष्ट होणार आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात २४ उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे व शिवसेनेच्या भावना गवळी यांच्यात थेट लढत झाली. मात्र वंचित बहुजन आघाडी, भाजप बंडखोर, प्रहार, बसपा हे उमेदवारही मतविभाजनाच्या दृष्टीने दखलपात्र ठरले. मतदारांच्या कलानुसार उमेदवारांची हवा सातत्याने बदलत असल्याचे चित्र पहायला मिळाले. मतदारांमध्ये मोदी हवे व मोदी नको असे थेट दोन गट पडले. मोदी हवे म्हणणारे एकजूट आहेत, तर मोदी नको म्हणणारे विविध उमेदवारांमध्ये विखुरले गेले आहे. मतदानाची टक्केवारी, प्रत्येक पंचक्रोषित बदलती हवा यामुळे नेमका कोण निवडून येणार हे सांगणे कठीण आहे. तर्क व अंदाज यावरच उमेदवारांच्या संभाव्य विजयाचे इमले बांधले जात आहे. सर्वत्र संभ्रमाची स्थिती आहे. अमूक उमेदवार निवडून येईल, असे कुणीही छातीठोकपणे सांगण्यास तयार नाही. काँग्रेस व शिवसेनेची मंडळीसुद्धा तेवढी ‘कॉन्फीडन्ट’ दिसत नाही. त्यामुळे कुणी काँग्रेस तर कुणी शिवसेना सांगते आहे. या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर शासनाची गुप्तचर यंत्रणा व सट्टा बाजारातील कल तपासले असता तेथूनही संभ्रमाचेच संकेत मिळाले आहे.
सट्टा बाजारातील दरांवर बरेच अंदाज बांधले जातात. ‘ज्याचा भाव कमी त्याच्या विजयाची शक्यता अधिक’ असे सट्टा बाजाराचे समीकरण आहे. मतदानापूर्वीपासून सट्टा बाजारात काँग्रेस व शिवसेनेच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार होत आहे. मात्र गुरुवारच्या मतदानानंतर हे भाव स्थिर झाल्याचे चित्र पहायला मिळाले. सूत्रानुसार, सट्टा बाजारात शिवसेनेला सर्वात कमी ६५ ते ७० पैसे भाव आहेत. काँग्रेसला हा भाव १ रुपया ३५ पैसे ते १ रुपया ४० पैसे असा आहे. मतदानापूर्वी भाजप बंडखोराचा दर १७ रुपये होता. मतदानानंतर मात्र हा दर उघडलाच गेला नाही.
सट्टा बाजारातील दर व अंदाजानुसार शिवसेनेला पोषक स्थिती असल्याचे सांगितले जात आहे. मात्र शासनाच्या गुप्तचर यंत्रणेचे कल नेमके या उलट आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात यावेळी काँग्रेस गड सर करेल परंतु मतांची आघाडी मोठी राहणार नाही, असा गुप्तचरांचा अंदाज असल्याची माहिती आहे.

माणिकरावांची दिल्लीत एन्ट्री की भावनाताईचा विक्रम ?
माणिकराव ठाकरे खासदार म्हणून पहिल्यांदा दिल्लीत एन्ट्री करतात की भावनाताई गवळी पाचव्यांदा निवडून येण्याचा विक्रम नोंदवितात, हे स्पष्ट होण्यासाठी नागरिकांना आणखी दीड महिना अर्थात २३ मे रोजीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत राजकीय गोटात व चौकाचौकात तर्क, अंदाज, शक्यता वर्तवून चर्चांचा फड तेवढा रंगणार एवढे निश्चित.

तर गुप्तचरांवर होते कारवाई
निवडणूकीचे अंदाज खोटे ठरल्यास कारणे दाखवा नोटीस, बदली या सारखी कारवाई होत असल्याने संपूर्ण मतदारसंघात फिरुन, विविध कौशल्य वापरुन व आपला अनुभव पणाला लावून गुप्तचर यंत्रणा शक्यतोवर तंतोतंत किंवा जवळपास तरी अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न करते. गुप्तचरांच्या या अंदाजावर विश्वास दाखविल्यास काँग्रेसचे संकेत मिळत आहेत. सट्टा बाजार व गुप्तचरांच्या अंदाजानंतरही संभ्रमाची स्थिती मात्र कायम आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; The lowest price in the market for the Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.