भूखंड घोटाळ्यावर ‘आयजीं’चाही वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:28 PM2018-08-17T22:28:13+5:302018-08-17T22:28:48+5:30

कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्याच्या तपासावर आता अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाचाही वॉच राहणार आहे. अलिकडेच या कार्यालयाने ‘एसआयटी’च्या तपास अधिकाऱ्यांला अमरावतीमध्ये पाचारण करून तपासातील प्रगतीची अपडेट माहिती घेतली होती.

IG's watch on plot scam | भूखंड घोटाळ्यावर ‘आयजीं’चाही वॉच

भूखंड घोटाळ्यावर ‘आयजीं’चाही वॉच

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्याला अमरावतीत पाचारण : भूमाफियांच्या तपासातील प्रगतीचा अहवाल मागणार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्याच्या तपासावर आता अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाचाही वॉच राहणार आहे. अलिकडेच या कार्यालयाने ‘एसआयटी’च्या तपास अधिकाऱ्यांला अमरावतीमध्ये पाचारण करून तपासातील प्रगतीची अपडेट माहिती घेतली होती. पुढील आठवड्यात या तपासाचा अहवाल महानिरीक्षकांकडून मागितला जाणार असल्याची माहिती आहे.
‘लोकमत’ने कोट्यवधींचा भूखंड घोटाळा उघडकीस आणला. त्यातील भूमाफियांचा पर्दाफाश केला. यात आतापर्यंत सात गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या तपासासाठी ‘एसआयटी’ अर्थात विशेष तपास पथक स्थापन केले गेले असले तरी या पथकाच्या तपासाची गती अगदीच मंद आहे. भूमाफियांमध्ये ‘एसआयटी’ची दहशत अपेक्षित होती. मात्र प्रत्यक्षात भूमाफिया उलट ‘एसआयटी’मुळे ‘रिलॅक्स’ झाल्याचे विसंगत चित्र पहायला मिळत आहे. भूमाफियांच्या या कारनाम्यांची वार्ता अमरावतीपर्यंत पोहोचल्याने आता विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयानेही या तपासावर लक्ष केंद्रीत केले आहे. ‘एसआयटी’च्या तपास अधिकाºयाला महानिरीक्षकांनी अमरावतीत बोलविले होते. मात्र नेमके त्यावेळी ते गैरहजर असल्याने त्यांच्यावतीने तपासातील प्रगतीचा आढावा घेतला गेला. भूखंड घोटाळ्याशी संबंधित ‘लोकमत’च्या सर्व वृत्तांची फाईल महानिरीक्षकांच्या टेबलवर पोहोचली आहे. याच अनुषंगाने ‘एसआयटी’च्या स्थापनेपासून दाखल गुन्ह्यांच्या तपासात नेमकी काय प्रगती झाली, याचा आढावा पुढील आठवड्यात महानिरीक्षक स्वत: घेणार आहेत. भूखंड घोटाळ्यातील रेकॉर्डवर असलेले व भविष्यात आरोपींच्या बयानातून रेकॉर्डवर येण्याची शक्यता असलेले संशयित ‘एसआयटी’च्या सोईच्या भूमिकेमुळे आतापर्यंत अगदी ‘रिलॅक्स’ होते. परंतु आता महानिरीक्षकांनी या तपासावर लक्ष केंद्रीत केल्याने त्यांचे टेंशन वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
लतेश अटक, ब्रोकर प्रकाशही ताब्यात
भूखंड घोटाळ्यातील एक आरोपी लतेश चमेडिया याला गुरुवारी शहर पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयापुढे हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर सायंकाळी लतेशच्या कबुलीवरून दुय्यम निबंधक कार्यालयातील अर्जनवीस तथा ब्रोकर प्रकाश उर्फ विलास भाऊराव विठाळे, रा. सूर्योदय सोसायटी भोसा रोड, यवतमाळ याला अटक करण्यात आली. शनिवारी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागितली जाणार आहे. या साखळीतील सचिनच्याही अटकेची प्रतीक्षा आहे. प्रकाश पाठोपाठ तो अटक झाल्यास अद्याप पडद्यामागे असलेल्या अनेकांची नावे रेकॉर्डवर येण्याची शक्यता आहे. ‘भूमाफियांच्या अटकेचा मुहूर्त केव्हा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १५ आॅगस्टच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर अचानक ‘एसआयटी’च्या तपासाची गती वाढली आणि १६ आॅगस्टला लतेशला अटक करण्यात आली. आता लतेशच्या बयानात आणखी कुणा-कुणाची नावे येतात, याकडे सर्व संंबंधितांच्या नजरा लागल्या आहेत. त्याचे बयान अद्याप पडद्यामागे असलेल्यांना रेकॉर्डवर घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकरणातील राम उर्फ नितीन, मनीष यांच्या अटकेची प्रतीक्षा आहे. ३० लाखांच्या लुटीत आरोपी असलेला मनीष यवतमाळातच ३०२ क्रमांकाच्या वाहनातून फिरताना बुधवारी अनेकांनी पाहिला. त्यामुळे त्याच्या अटकेचे आव्हान आहे. मुसक्या आवळल्या जात असल्याने फरार आरोपी आत्मसमर्पण करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दरम्यान आरोपी मंगेश पन्हाळकर यांच्या शोधार्थ मुंबईला गेलेले पोलिसांचे पथक रिकाम्या हाताने परतले आहे.
साहेबांचा टिफीन जातो चक्क पहेलवानच्या हॉटेलातून !
बनावट मालक उभा करुन परस्पर भूखंड हडपण्याच्या पाच प्रकरणांमध्ये (खरेदीवर) येथील एक हिंदुत्ववादी पहेलवान साक्षीदार आहे. आतापर्यंत दाखल गुन्ह्यांमध्ये साक्षीदारांना थेट आरोपी बनविले गेले असले तरी हा पहेलवान मात्र बिनधास्त आहे. महिन्यातून किमान आठ-दहा वेळा तपास यंत्रणेतील एका साहेबांसाठी व त्यांच्या पाहुण्यांसाठी आपल्या पांढरकवडा रोडवरील हॉटेलातून टिफीन जात असल्याने आपली साहेबांशी सलगी असल्याचे व त्यातूनच आपल्याला बिनधास्त राहण्याचा संदेश मिळाल्याचे तो चार-चौघात सांगतो आहे. अशाच पद्धतीने तीन कोटींच्या कर्जातील रविही बिनधास्त आहे. या पहेलवानाचा क्रिकेट सट्ट्याशीही जवळचा संबंध आहे. गुरुवारीच कर्नाटक प्रिमीअर लीगमध्ये यवतमाळातील पहेलवान, जावेद, मनोज या काही क्रिकेट बुकींनी हुबळी विरुद्ध बिजापूर सामन्यावर सट्टा लावला. सामन्याच्या पूर्वी ९० पैसे व सामना सुरू होताच एक मिनिटात भाव २५ पैशावर आल्याने देशभरातील बुकी शंभर कोटींनी बुडले. त्यात यवतमाळातील बुकींनाही फटका बसला. पहेलवानचे क्रिकेट बुकी म्हणून बरेच मोठे नेटवर्क आहे.
बँकेची लतेशला पर्यायी भूखंडाची आॅफर
घाटंजी येथील शिक्षकाचा स्थानिक पांढरकवडा चौफुलीनजीकचा २० हजार चौरस फुटाचा भूखंड बनावट मालक उभा करून परस्पर खरेदी केला गेला. त्यात दोन बँकांकडून एकाच भूखंडावर सहा कोटी ८० लाखांचे कर्ज उचलले गेले. या प्रकरणात लतेश चमेडिया प्रमुख आरोपी आहे. दोन पैकी एका बँकेने आता लतेशला पर्यायी मालमत्ता उपलब्ध करून देण्याची आॅफर दिली आहे. त्यात बँक एक कोटींचे नुकसान सहन करण्याच्या तयारीत आहे. लतेशनेही तेवढेच नुकसान सहन करावे, अशी बँकेची अपेक्षा आहे. लतेशने पर्यायी भूखंड, शेती द्यावी अशी ही आॅफर आहे. या बँकेची आमसभा २ सप्टेंबरला घाटंजीत होत आहे. त्यापूर्वी ‘ओटीएस’च्या (वन टाईम सेटलमेंट) आडोशाने हे प्रकरण मिटवून संभाव्य प्रश्नांचा भडीमार थांबविण्याचा बँकेचा प्रयत्न असल्याची माहिती आहे.
 

Web Title: IG's watch on plot scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा