नेर बांधकामचा हेकेखोरपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:56 AM2018-05-28T00:56:56+5:302018-05-28T00:56:56+5:30

शहरातील अतिक्रमण हटविताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हेकेखोरपणाची प्रचिती आली. काही लोकांना अतिक्रमण काढण्यासाठी बराच वेळ देण्यात आला, तर प्रामुख्याने लहान व्यावसायिकांच्या दुकानांचा चेंदामेंदा केला.

The headache of Ner Construction | नेर बांधकामचा हेकेखोरपणा

नेर बांधकामचा हेकेखोरपणा

Next
ठळक मुद्देदुकानांचा चेंदामेंदा : अतिक्रमण हटाओ मोहिमेत दुजाभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : शहरातील अतिक्रमण हटविताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हेकेखोरपणाची प्रचिती आली. काही लोकांना अतिक्रमण काढण्यासाठी बराच वेळ देण्यात आला, तर प्रामुख्याने लहान व्यावसायिकांच्या दुकानांचा चेंदामेंदा केला. या शिवाय काही लोकांच्या खासगी जागांमध्ये लावलेली दुकानेही काढण्याची संधी यानिमित्ताने साधण्यात आली. हा प्रकार करताना आर्थिक व्यवहारही झाल्याची ओरड अन्यायग्रस्तांमधून होत आहे.
अतिक्रमणात येत असलेल्या व्यावसायिक प्रतिष्ठानांना नोटीस दिल्या. त्यानुसार काही लोकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. अमरावती मार्गापासून नालीपर्यंतचे अतिक्रमण काढण्यासाठी आखणीही करण्यात आली. मात्र पंचायत समिती परिसरात अतिक्रमण हटाओ मोहीम पथकाने मनमानी सुरू केली. आखणी केलेल्या जागेच्या बाहेर असलेली दुकाने पाडण्यास सुरुवात केली. थांबा... थांबा... आम्ही दुकाने काढतो, पण तोडू नका, अशी अतिक्रमणधारकांची विनंती या पथकाने मानली नाही.
जुन्या बसस्थानक परिसरात अतिक्रमण हटविताना या पथकाने तर कहर केला. टीनपत्र्यांची दुकाने पाडण्यासाठी कमालीची घाई करण्यात आली. मात्र काँक्रिटची दुकाने पाडण्यासाठी संबंधितांना बराच अवधी देण्यात आला. वास्तविक काँक्रिटचे बांधकाम असलेल्या लोकांनाही अतिक्रमणातील बांधकाम पाडण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. अशावेळी बांधकाम विभागाने त्यांना संधी का दिली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बांधकाम उपअभियंत्यांच्या मनमानीचा या ठिकाणी कळस झाला.
खासगी जागेतील दुकानेही या मोहिमेत पाडण्यात आली. तिथपर्यंत पोहोचण्याचा अधिकार या विभागाला आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या मार्गावर काही लोकांनी खासगी जागेमध्ये आपला छोटासा व्यवसाय सुरू केला. ज्यांची जागा आहे, त्यांनी बांधकामच्या पथकातील लोकांना चिरीमिरी देऊन अशी अतिक्रमणे काढल्याचा आरोपही होत आहे. या सर्व प्रकारात बेरोजगार, गरीब व्यावसायिक अडचणीत आले आहे.

Web Title: The headache of Ner Construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.