शासन बळीराजा चेतना अभियान गुंडाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 09:52 PM2018-07-08T21:52:37+5:302018-07-08T21:53:56+5:30

शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान २०१५ मध्ये सुरू करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या अभियानाची तीन वर्षांची मुदत येत्या २४ जुलैला संपत आहे.

Government will roll back the 'Biliraja' consciousness campaign | शासन बळीराजा चेतना अभियान गुंडाळणार

शासन बळीराजा चेतना अभियान गुंडाळणार

Next
ठळक मुद्दे२४ जुलै अंतिम मुदत : मुदतवाढ की, दुसऱ्या योजनेत विलिनीकरण?

रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान २०१५ मध्ये सुरू करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या अभियानाची तीन वर्षांची मुदत येत्या २४ जुलैला संपत आहे. यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रयोगाला लगाम लागणार आहे.
सदर अभियान राबविण्यासाठी दरवर्षी ३२ कोटी रूपये देण्याची घोषणा सरकारने केली होती. प्रत्यक्षात तीन वर्षात जिल्ह्याला कधीही ३२ कोटींची रक्कम एकमुस्त मिळाली नाही. शेवटच्या वर्षी तर अभियानासाठी निधी वळता करताना सरकारने आखडता हात घेतला. निधीअभावी बळीराजा चेतना अभियानाचे गाव पातळीवरील कार्यक्रम थांबले. यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी, कीर्तन, प्रबोधन मेळावे, स्वच्छता अभियान आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी वर्ग १ मधील १०१ अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या अधिकाऱ्यांकडे १०१ महसूल मंडळे दत्तक देण्यात आली होती. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यावर हे अधिकारी काम करणार होते. प्रारंभी काही दिवस हे काम चालले. नंतर बैठका बंद झाल्या. शैक्षणिक अडचण आणि कॅन्सरग्रस्त रूग्णांना मदतीचे वाटप अभियानातून करण्यात आली. सामूहिक विवाह मेळावे पार पडले. मात्र या मेळाव्याचा निधी अडकला आहे.
लोकसहभागातून लाखोंचा निधी
अभियानाच्या अंमलबजावणीसाठी लोकसहभागातून लाखोंचा निधी गोळा झाला. यातून कामाला गती मिळाली होती. नंतर अभियानाची गती मंदावली. यामुळे अभियानाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. गावपातळीवर अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पाच हजारापर्यंत मदत देण्याच्या सूचना होत्या. या निधी वाटपात गावपातळीवर हेराफेरी झाल्याच्या तक्रारी जिल्हा आल्या. यानंतर अभियानाच्या कामाची गती मंदावली.
ग्रामपंचायतींना अद्यापही पुस्तकांची प्रतीक्षा
बळीराजा चेतना अभियानातून जाणीव जागृतीसाठी ग्रामपंचायतीमध्ये वाचनालयाची संकल्पना मांडण्यात आली. १८४८ ग्रामपंचायतींसाठी १०१ पुस्तकांचा संच तयार करण्यात आला. प्रत्यक्षात २०० सार्वजनिक वाचनालयांना ही पुस्तके मिळाली. मात्र ग्रामपंचायतीच्या वाचनालयांना ही पुस्तके अद्यापही मिळालेली नाहीत.
नानाजी देशमुख अभियानात विलिनीकरणाच्या हालचाली
शासकीय स्तरावर नानाजी देशमुख अभियान राज्य शासनाने नव्याने हाती घेतले आहे. बळीराजा चेतना अभियानाची मुदत संपत आहे. यामुळे या अभियानाला नव्याने मुदतवाढ देण्याऐवजी नानाजी देशमुख अभियानात विलीन करण्याच्या हालचाली सुरू आहे. प्रत्यक्षात राज्य शासन काय निर्णय घेणार, यावरच हे अभियान अवलंबून राहणार आहे.

Web Title: Government will roll back the 'Biliraja' consciousness campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.