ठळक मुद्देगुजरातच्या केंद्रीय भांडाराच्या पत्राचा आधारमलिदा लाटल्याचा आरोप

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींसाठी थेट गुजरातमधील केंद्रीय भांडाराच्या दर पत्राचा आधार घेत लाखो रूपयांचे सौर पथदिवे खरेदी करण्यात आले. ही खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून संबंधित गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी यात मलिदा लाटल्याचे उघडकीस येत आहे.
पुसद पंचायत समितीमार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध वस्तींमध्ये लावण्यासाठी सौर पथदिवे खरेदी करण्यात आले. ही खरेदी शासनाच्या नियमानुसार केली नसल्याचा आक्षेप खुद्द जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती निमीष मानकर यांनी घेतला होता. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. समाजकल्याण विभागाने या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पुसदच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी आत्तापर्यंत दोन अहवाल सादर केले. मात्र हे दोनही अहवाल परस्परविरोधी असल्याचे खुद्द समाज कल्याण अधिकाऱ्यांनीच कबूल केले. नंतर या प्रकरणाची सीईओंपुढे सुनावणी झाली. मात्र अद्याप त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.
पुसद पंचायत समितीप्रमाणेच जिल्ह्यातील इतर पंचायत समितींमार्फत लाखोंच्या सौर पथदिव्यांची खरेदी करण्यात आली. यवतमाळ, उमरखेड, महागाव, दारव्हा, दिग्रस आदी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये आता लाखोंचे सौर पथदिवे (एलईडी) लावण्यात आले. शासन नियमानुसार तीन लाखांवरील खरेदी ई-निविदा पद्धतीने करावी लागते. तसेच दर करार पद्धत बंद झाली आहे. मात्र संबंधित गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी चक्क केंद्रीय भांडार विभागाचे पत्र जोडून लाखोंच्या पथदिव्यांची खरेदी केल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेने या प्रकरणाची कसून चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.


जादा दराने केली खरेदी
४सौर पथदिव्यांच्या खरेदीसाठी बीडीओ आणि ग्रामसेवकांनी चक्क गुजरातमधील केंद्रीय भांडार विभागाच्या दर कराचे पत्र जोडले. वास्तविक दर करार पद्धत राज्य शासनाने बंद केली. मात्र ग्रामसेवकांनी अत्यंत चलाखीने हे पत्र जोडून लाईटची खरेदी केली. तीसुद्धा जादा दराने. यातून संबंधित गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांनी लाखोंचा मलिदा लाटल्याचे उघड होत आहे.