जिल्ह्याला पहिल्यांदाच मिळाले चार मंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 10:05 PM2019-06-16T22:05:09+5:302019-06-16T22:05:32+5:30

राज्याच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच जिल्ह्यातील चौघांचा समावेश झाला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच जिल्ह्याला चार मंत्रीपदे मिळाली आहे. प्राचार्य डॉ. अशोक उईके आणि प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने भाजप-शिवसेना युतीने जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे.

Four Ministers who got the first time in the district | जिल्ह्याला पहिल्यांदाच मिळाले चार मंत्री

जिल्ह्याला पहिल्यांदाच मिळाले चार मंत्री

Next
ठळक मुद्देयुतीचे वर्चस्व : अशोक उईके, तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट दर्जा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्याच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच जिल्ह्यातील चौघांचा समावेश झाला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच जिल्ह्याला चार मंत्रीपदे मिळाली आहे. प्राचार्य डॉ. अशोक उईके आणि प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने भाजप-शिवसेना युतीने जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे.
आतापर्यंत काँग्रेस व नंतर आघाडीच्या सरकारमध्ये जिल्ह्यातील तिघांना मंत्रीपदाचा मान मिळाला होता. त्यात मनोहरराव नाईक, अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, प्रा. वसंतराव पुरके यांचा समावेश होता. अनेक वर्ष राज्याच्या राजकारणात जिल्ह्याला सातत्याने दोन ते तीन मंत्रीपदे मिळत होती. मात्र यावेळी भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा केवळ दोघांनाच राज्यमंत्रीपद मिळू शकले होते. त्यात भाजपचे मदन येरावार आणि शिवसेनेचे संजय राठोड यांचा समावेश होता. या दोघांनाही मुख्यमंत्र्यांनी महत्वाच्या खात्याचे राज्यमंत्रीपद सोपविले होते. मात्र दोघेही राज्यमंत्री होते. जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रीपदापासून वंचित रहावे लागले होते.
मंत्रिमंडळाच्या विस्तारात युतीने राळेगावचे भाजप आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके आणि यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेलेले शिवसेनेचे आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचा थेट कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश केला. युतीच्या काळात पहिल्यांदाच जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रीपद आता लाभले आहे. या दोन मंत्र्यांमुळे युतीच्या जिल्ह्यातील मंत्र्यांची संख्या चारवर पोहोचली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात जिल्ह्याला चार मंत्री लाभले आहे. यातून भाजप-शिवसेना युतीने जिल्ह्यावर आपली पकड आणखी घट्ट करण्याची व्यूहरचना आखल्याचे दिसून येत आहे.
प्राचार्य डॉ. अशोक उईके व प्रा.डॉ. तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळाल्याने जिल्ह्यातील भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राळेगाव, कळंब येथे भाजप तर यवतमाळात शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. या मंत्री पदांचा जिल्ह्याच्या विकास कामाला हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

‘लोकमत’चे भाकित खरे ठरले
मंत्रिमंडळ विस्तारात प्राचार्य डॉ.अशोक उईके यांचा समावेश होण्याची शक्यता ‘लोकमत’ने वर्तविली होती. ‘लोकमत’चे हे भाकित तंतोतंत खरे ठरले आहे. प्राचार्य डॉ. उईके यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. शिवसेनाही मंत्रिपदाबाबत आग्रही असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. ते वृत्तही तंतोतंत खरे ठरून शिवसेनेतर्फे प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला आहे.

जिल्ह्यात तब्बल सहा जण मंत्री, राज्यमंत्री
या चार मंत्र्यांशिवाय दोघांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यात शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आणि राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार यांचा समावेश आहे. यामुळे युतीच्या कार्यकाळात जिल्ह्याला मंत्री व मंत्रीपदाचा दर्जा असलेले सहा चेहरे मिळाले आहे. आतापर्यंतच्या कार्यकाळात जिल्ह्याची ही सर्वात मोठी उपलब्धी ठरली आहे.

Web Title: Four Ministers who got the first time in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.