सेना, काँग्रेसचा उमेदवार निश्चित, गवळी-राठोड यांचे मनोमीलन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 06:23 AM2019-03-18T06:23:43+5:302019-03-18T06:24:09+5:30

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांची पाचवी टर्म चुकविण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र काँग्रेसला यावेळीसुद्धा अंतर्गत लाथाड्यांचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

 Force, Congress candidate, Gavli-Rathod Manoholan | सेना, काँग्रेसचा उमेदवार निश्चित, गवळी-राठोड यांचे मनोमीलन

सेना, काँग्रेसचा उमेदवार निश्चित, गवळी-राठोड यांचे मनोमीलन

Next

- राजेश निस्ताने

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांची पाचवी टर्म चुकविण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र काँग्रेसला यावेळीसुद्धा अंतर्गत लाथाड्यांचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
२०१४ च्या निवडणुकीत शिवसेना एकसंघ होती, शिवाय मोदी लाटेचाही फायदा झाला. परंतु यावेळी खासदार भावना गवळी व महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यात वितुष्ट आल्याने शिवसेना दुभंगली. ‘मातोश्री’ने पुढाकार घेऊन या दोन्ही नेत्यांमध्ये नुकताच ‘समझोता’ घडवून आणला. मात्र तो किती यशस्वी होतो हे वेळच सांगेल.
काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगितले जाते. ते तब्बल २० वर्षांनंतर समोरच्या दाराने निवडणूक लढणार आहेत. प्रदेश संसदीय मंडळाने ठाकरेंचे एकमेव नाव दिल्लीत पाठविले. मात्र त्यानंतरही गतवेळच्या पराभूत उमेदवारासह चौघे अजूनही तिकिटासाठी जोर लावून आहेत. त्यांच्या सातत्याने मुंबई-दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. काँग्रेस व शिवसेनेकडून निश्चित झालेला मराठा उमेदवार, काँग्रेसमधील गटबाजी, शिवसेनेतही पडलेले गट, सामाजिक समीकरणे बघता बंजारा समाजाचा तिसरा पर्याय येथे प्रभावी ठरू शकतो.
काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षात गटबाजी असली तरी सहा महिन्यानंतर विधानसभा निवडणुका होणार असल्याने लोकसभेत या गटबाजीचे तेवढे परिणाम दिसणार नाहीत, असे मानले जाते. संजय राठोड यांची समजूत काढून ‘मातोश्री’ने या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व आणि भावनातार्इंच्या विजयाची जबाबदारी राठोड यांच्याच खांद्यावर सोपविली आहे. तार्इंनीही ‘झाले गेले विसरून जा’ असे म्हणून नमते घेतले आहे. तरीही सेनेचा पराभव झाल्यास त्याचे बहुतांश खापर राठोड यांच्यावर फुटण्याची शक्यता आहे. मनोमिलन झाले मग सेना नवा चेहरा देणार याचा प्रचार पुन्हा कशासाठी, हा प्रश्न आहे. ते पाहता मनोमिलन केवळ देखावा तर नाही अशी शंका व्यक्त होत आहे.
अशीच काहीशी स्थिती काँग्रेसमध्ये आहे. माणिकराव ठाकरेंचे नाव उमेदवारीसाठी गेल्याने काँग्रेसमधील ज्येष्ठ माजी मंत्र्यांचा गट नाराज आहे. मात्र समोर विधानसभा असल्याने माणिकरावांच्या विरोधात काम करून मराठा समाजाची नाराजी ओढवून घेणे हे माजी मंत्री व त्यांच्या पाठीराख्यांना परवडणारे नाही. या ज्येष्ठ माजी मंत्र्यांचे त्यांच्या समाजात खरोखरच किती ऐकले जाते, हे पाहणेही महत्वाचे ठरते. या लोकसभा मतदारसंघात सहापैकी चार भाजपाचे व एक सेनेचा आमदार असल्याने गवळींच्या विजयाची खरी जबाबदारी त्यांच्यावर आहे. गवळी पराभूत म्हणजे मोदींना नुकसान हे गणित डोळ्यापुढे ठेवण्याचे टार्गेट या आमदारांना भाजपाकडून दिले जाऊ शकते.

सध्याची परिस्थिती

वर्धा-यवतमाळ-नांदेड हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प संथगतीने सुरू आहे. यवतमाळ-मूर्तिजापूर या नॅरोगेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतराचीही चिन्हे दिसत नाहीत.

‘मातोश्री’वरून सेनेच्या दोन्ही नेत्यांचे मनोमिलन करण्यात आले असले तरी ते खरोखरच झाले का ? याचा पुरावा लोकसभेच्या मतमोजणीनंतरच मिळणार आहे.

काँग्रेसची मदार दलित, अल्पसंख्यक, ओबीसी मतदारांवर आहे. मात्र येथे वंचित बहुजन आघाडी, बसपाचा उमेदवार किती चालतो, यावर काँग्रेसचे विजयाचे गणित अवलंबून आहे.

जिल्ह्यात बंजारा समाज, आदिवासी समाज निर्णायक आहे. ना. संजय राठोड यांनी पोहरादेवीत दाखविलेली शक्ती मनोमिलनानंतर सेनेकडे वळते का, यावर सर्वांच्या नजरा आहेत.

Web Title:  Force, Congress candidate, Gavli-Rathod Manoholan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.