शेती विकली, पण स्पर्धा परीक्षा दिलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 11:38 PM2018-01-16T23:38:36+5:302018-01-16T23:38:53+5:30

तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय... घरी पाच बहिणी लग्नाच्या अन् वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला.. अशा अवस्थेत कोण खचणार नाही? तो खचला नाही. बहिणीचे लग्न केले. वडिलांचा उपचार केला अन् स्वत:ही स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाला.

Farming was sold, but it was a competitive examination | शेती विकली, पण स्पर्धा परीक्षा दिलीच

शेती विकली, पण स्पर्धा परीक्षा दिलीच

Next
ठळक मुद्देगरिबीवर मात : ‘क्लासेस’विना घाटंजी तालुक्यातील युवक झाला विक्रीकर निरीक्षक

सुधाकर अक्कलवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय... घरी पाच बहिणी लग्नाच्या अन् वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला.. अशा अवस्थेत कोण खचणार नाही? तो खचला नाही. बहिणीचे लग्न केले. वडिलांचा उपचार केला अन् स्वत:ही स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्याचे नाव आकाश दत्ता जाधव. गरीब शेतकºयाचा हा मुलगा कोणत्याही ‘क्लासेस’विना विक्रीकर निरीक्षक बनला आहे.
तालुक्यातील साखरा खुर्द हे आकाशचे गाव. घरी शेती आहे, पण शेतकºयांच्या पाचवीला पूजलेली गरिबीही आहे. सोबतीला पाच बहिणींच्या लग्नाची चिंता. पदवीपर्यंत शिकल्यावर स्पर्धा परीक्षा देण्याची आकाशची इच्छा असली तरी परिस्थिती नव्हती. एका मित्राने त्याला दर्यापूरला (जि. अमरावती) नेऊन त्याच्या अभ्यासाची व्यवस्था केली. पण त्याचवेळी मोठे संकट आले. मजुरी करून आकाशसाठी पैसे पाठविणारे वडीलच आजारी पडले. त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. आकाशसाठी हाच मोठा धक्का असताना वडिलांच्या उपचारासाठी पैसे नसणे हे दुसरे संकटही उभे झाले. शेवटी अभ्यास थांबवला अन् शेती विकली. उपचार सुरू केला. दीड वर्षांनंतर वडीलांची प्रकृती थोडी सुधारली. ४ मे २०१४ रोजी एका बहिणीचे लग्न उरकल्यावर मात्र आकाश पुन्हा अभ्यासाकडे वळला.
दररोज १० ते १२ तास अभ्यास करून अवघ्या सहा महिन्यातच एसटीआय पूर्व परीक्षा त्याने उत्तीर्ण केली. पण मुख्य परीक्षेत एक गुण कमी मिळाल्याने तो अपात्र ठरला. त्यावेळी ‘क्लासेस’ लावल्याशिवाय यश अशक्य आहे, असे वाटू लागले. पण शिकवणीचा खर्च परवडणारा नव्हता. त्यामुळे आपल्या अनुभवाचा, चुकांचा आधार घेत जोमाने अभ्यास सुरू केला. त्याचवेळी तो २०१६ च्या सप्टेंबरमध्ये तलाठी म्हणून परभणी येथे रूजू झाला. पण त्यात तो समाधानी नव्हता. पुन्हा एसटीआय परीक्षा दिली.
डिसेंबरमध्ये लागलेल्या निकालात विमुक्त जाती वर्गवारीतून आकाशची अखेर विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाली. या यशाचे श्रेय त्याने आपल्या आईवडीलांना आणि कष्टाळू बहिणींना समर्पित केले आहे.
आकाश-अतुल बनले घाटंजी तालुक्याची शान
घाटंजी तालुक्याला एसटीआय परीक्षेत यंदा दुहेरी यश मिळाले आहे. आकाश जाधवप्रमाणेच जुनोनी येथील अतुल वानखडे या तरुणानेही प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत विक्रीकर निरीक्षक परीक्षेत यश मिळविले. आईचा मृत्यू पाहिलेल्या अतुलला काका, काकू यांच्या रूपाने मोठे प्रोत्साहन मिळाले. गरिबीवर मात करीत अतुल वानखडेदेखील विक्रीकर निरीक्षक बनले आहेत. या दोन्ही तरुणांच्या स्पर्धा परीक्षेतील यशाने तालुक्याची मान उंचावली आहे.

Web Title: Farming was sold, but it was a competitive examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.