धीर सोडू नका, मी शासनाशी बोलतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 10:14 PM2017-11-17T22:14:49+5:302017-11-17T22:15:26+5:30

बीटीने काही ठिकाणी फायदा, तर काही ठिकाणी नुकसान केले. बियाण्यांची योग्य पडताळणी न केल्याने शेतकऱ्यांची दुर्दशा झाली.

Do not give up, I talk to the government | धीर सोडू नका, मी शासनाशी बोलतो

धीर सोडू नका, मी शासनाशी बोलतो

Next
ठळक मुद्देशरद पवार : बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

किशोर वंजारी / आकाश कापसे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर /मांगलादेवी : बीटीने काही ठिकाणी फायदा, तर काही ठिकाणी नुकसान केले. बियाण्यांची योग्य पडताळणी न केल्याने शेतकऱ्यांची दुर्दशा झाली. सुरुवातीला अळ्यांना बीटी खायची, पण आता अळीच बीटी खातेय. काही झाले तरी धीर सोडू नका. आत्महत्या करू नका. मी केंद्र व राज्य शासनाला तुमची परिस्थिती सांगतो. शेतकºयांना निश्चितच आर्थिक मदत मिळवून देऊ, असा दिलास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मांगलादेवी येथील शेतकऱ्यांना दिला.
तालुक्यातील मांगलादेवी येथील शेतकरी रामभाऊ दहापुते यांच्या सहा एकर शेतात गुलाबी बोंडअळीचा शोध लागला. मुळात बीटी जादा उत्पादन देणारे बियाणे असताना यंदा बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीने जन्म घेतला. जवळपास दोन डझन नेते अळी बघून गेल्यावर शुक्रवारी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मांगलादेवी येथील शेतकरी श्याम मुरलीधर उघडे यांच्या शेतात पाहणी केली. यावेळी मनोज उमरतकर, सागर लोंखडे, रामभाऊ दहापुते या शेतकऱ्यांनी गुलाबी अळीमुळे प्रचंड नुकसान झाल्याचे पवार यांना सांगितले. फवारणी करताना शेतकरी मेला, तर शासन दोन लाखांची मदत करते. मात्र आमची अवस्था दयनीय असूनही शासनाने मदत न दिल्याची खंत शेतकºयांनी व्यक्त केली. गुलाबी अळीने सहा एकरातील कपाशीने दगा दिल्यामुळे मरणाची वेळ आली. मेल्याशिवाय शासन मदत करत नाही, अशी व्यथा रामभाऊ दहापुते यांनी मांडली.
या शेतकºयांना दिलासा देताना शरद पवार म्हणाले, शेतकरी संकटांशी झुंज देत आहे. शासनाने बोगस बियाण्याची चौकशी करावी. बियाणे तपासताना काय चूक झाली, याची चौकशी केली पाहिजे. राज्य शासनाने त्वरित पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावे व जिल्हाधिकाºयांनी राज्य शासनाला लवकर माहिती द्यावी. शासनाने हमीभाव आणि जमिनीची उत्पादनक्षमता लक्षात घेऊन मदत जाहीर करावी. यासाठी केंद्र व राज्य शासनाशी मी बोलेल, असे आश्वासन पवार यांनी दिले.
यावेळी त्यांच्यासोबत आमदार मनोहरराव नाईक, आमदार ख्वाजा बेग, माजी मंत्री अनिल देशमुख, वसंतराव घुईखेडकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आरती फुफाटे, बांधकाम सभापती निमिष मानकर, राजू पाटील, उत्तमराव शेळके आदी उपस्थित होते. सुभाष भोयर, सुनील खाडे, युवराज अर्मळ, पिंटू पाटील खोडे यांसह राँका कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
शेतमालाच्या भावाबाबत शासनाला प्रश्न विचारा
कापूस-सोयाबीनला कवडीमोल भाव मिळत आहे, याबाबत एका युवा शेतकऱ्याने विचारले असता, शरद पवार म्हणाले, ज्यांना तुम्ही मतदान केले त्यांना विचारा असा टोला लगावला. बळीराजाप्रती आपुलकीने मी येथे आल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री माझे ऐकतात असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीच आहे. मी शेतकरी बांधवांत राजकारण करत नसल्याचेही पवार म्हणाले .
काँग्रेसचे निवेदन
मांगलादेवी येथे शेताची पाहणी करताना काँग्रेस कार्यकर्त्यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी काँग्रेसचे पंजाबराव खोडके, राजेंद्र माहुरे, अनिल पाटील जवळगावकर, बाशिद खान, विलास बोनकीले आदींनी शरद पवार यांच्याकडे निवेदन दिले.
मेल्याशिवाय शासन मदत देत नाही!
मांगलादेवी येथील रामभाऊ दहापुते यांच्या शेतात डझनभर नेत्यांनी भेट दिली. पण सांत्वनाशिवाय काहीच मिळाले नाही. शेवटी त्यांनी उभ्या कपाशीवर नांगर फिरवला. शुक्रवारी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार शेतात आल्यावर, शासन मेल्याशिवाय मदत करत नाही, अशी व्यथा त्यांनी बोलून दाखविली. दहापुते यांच्यावर युनियन बँकेचे पाच लाखांचे कर्ज आहे. ते फेडावे कसे, ही विवंचना असताना त्यांनी शेतावर नांगर फिरवला.

Web Title: Do not give up, I talk to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.