अव्वाच्यासव्वा वीज बिल : वीज वितरण कंपनीच्या कारभारावर रोष
यवतमाळ : वीज वितरण कंपनीकडून सर्वसामान्य वीज ग्राहकांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. महिन्याकाठी हजारो रुपयाच्या घरात वीज बिल दिले जात आहे. यामुळे त्रस्त झालेल्या कळंब चौक, इस्लामपुरा, कुंभारपुरा, तेलीपुरा, दलित सोसायटी, पाटीपुरा, रामरहिम नगर, अलकबीर नगर, कोहिनूर सोसायटी, बिलाल कॉलनी, गुलशन नगर परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
वीज वितरण कंपनीकडून महिन्याकाठी वीज मीटरचे रिडींग घेतल्या जात नाही. अ‍ॅव्हरेज बिल पाठवून आर्थिक पिळवणूक केली जात आहे. प्रत्यक्ष वापर आणि आलेले बील यात मोठी तफावत आहे. अनेकांना घरगुती वापराचे वीज बिल हे पाच ते सहा हजाराच्या घरात आले आहे. या भागांमध्ये वितरण कंपनीने नवीन मीटर लावले आहे. हे मीटर सदोष असल्यामुळेच ही समस्या निर्माण झाल्याचा आरोप नगरसेवक अमन निर्बाण यांनी केला आहे.
त्यांच्या नेतृत्वात वसीम पटेल, जानमहम्मद गिलाणी, डॉ. देवेंद्र भुमकाळे, रेवनाथ बन्सोड यांच्यासह नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वीज कंपनीचा कारभार सुधारावा अशी मागणी केली. (कार्यालय प्रतिनिधी)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.