कर्तृत्ववान सेवाव्रतींचा आज सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 10:18 PM2017-11-18T22:18:18+5:302017-11-18T22:19:25+5:30

सामान्य ते असामान्य असा प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील कर्तृत्ववान स्त्रिांचा ‘सखी सन्मान’ पुरस्कार देऊन रविवार १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता येथील दर्डा उद्यान स्थित ‘शक्ती स्थळा’वर गौरव केला जाणार आहे.

Distinguished service honors today | कर्तृत्ववान सेवाव्रतींचा आज सन्मान

कर्तृत्ववान सेवाव्रतींचा आज सन्मान

Next
ठळक मुद्देसखी सन्मान सोहळा : दर्डा उद्यान ‘शक्तीस्थळा’वर दुपारी ३.३० वाजता गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सामान्य ते असामान्य असा प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील कर्तृत्ववान स्त्रिांचा ‘सखी सन्मान’ पुरस्कार देऊन रविवार १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता येथील दर्डा उद्यान स्थित ‘शक्ती स्थळा’वर गौरव केला जाणार आहे.
या सेवाव्रतींचा सत्कार नागपूर येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रोहिणी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरीताई आडे, यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचनताई चौधरी आणि पालकमंत्री मदन येरावार यांच्या सुविद्य पत्नी मीनल येरावार उपस्थित राहतील.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यात सामाजिक - कांचन नारायण वीर, शौर्य - मोहिनी सुधाकर डगवार, क्रीडा - यशश्री वसंतराव खडसे, व्यावसायिक-औद्योगिक - अपर्णा प्रशांत परसोडकर, आरोग्य - सुभाबाई बळीराम टिकनोर, शैक्षणिक - मीरा गुलाब टेकाम, सांस्कृतिक-साहित्यिक - चारुलता राज पावसेकर आणि जीवन गौरव पुरस्काराने पुसद येथील सुनीता रघुनाथ केळकर यांचा गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्यातील स्त्री-पुरुष सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
जीवनगौरव : सुनीता रघुनाथ केळकर
जिद्द, चिकाटी आणि अपार कष्ट करण्याची तयारी ध्येयापर्यंत पोहोचविल्याशिवाय राहात नाही. पुसद शहरातील सुनीता रघुनाथ केळकर यांनी जिद्द आणि चिकाटीच्या बळावर शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. २२ आॅक्टोबर १९४२ रोजी जन्मलेल्या सुनीता केळकर यांनी एसएससी डीएड केले आहे. १९७० साली पुसदच्या मोतीनगर भागात प्रयोग म्हणून बालक मंदिर सुरू केले. त्यावेळी ते एकच बालक मंदिर होते. १९९८ साली अभिनव महिला मंडळाची स्थापना केली. राणी लक्ष्मीबाई विद्यालय सुरू केले. भारतीय संस्कृतीचे शिक्षण देणारी पुसदमधील एकमेव शाळा म्हणून लोकमान्य पावली. मालती माधव शिशुवाटिका आजही सुरू आहे. अभिनव महिला मंडळाचे अध्यक्षपदाचे दायित्व त्या सांभाळत आहे. आप्पासाहेब अत्रे प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब पुसदच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार देवून त्यांना गौरविण्यात आले आहे.
सामाजिक : कांचन नारायण वीर
नेर येथील कांचन नारायण वीर या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांसाठी अनाथांची माऊली ठरल्या आहेत. तब्बल ५० मुला-मुलींच्या जीवनात त्यांनी आशेचा किरण निर्माण केला आहे. स्वत:ची शेती विकून ५० मुलांना ‘स्नेहआधार’ दिला आहे. त्या संवेदनशील कवयत्री असून शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचा प्रकल्प समाजासाठी प्रेरणादायी आहे.
शौर्य : मोहिनी सुधाकर डगवार
लहानपणी अपघातात दोनही हात गमावलेली मोहिनी सुधाकर डगवार प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत जिद्दीने शिक्षण घेत आहे. संपूर्ण आयुष्य शौर्याने भरलेली ही तरुणी इतरांसाठी प्रेरणा देणारी आहे. पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मोहिनीने अपंगत्वावर मात करीत जीवन कसे जगायचे याचा आदर्श समाजापुढे निर्माण केला आहे.
क्रीडा : यशश्री वसंतराव खडसे
यवतमाळच्या मातीत घडलेली यशश्री वसंतराव खडसे कुस्तीपटू आहे. अनेक राज्यस्तरीय आणि राष्टÑीय स्पर्धेत पदकांची लयलूट केली.‘दंगल’ सिनेमात ज्यांची कथा मांडली त्या गीता फोगटसोबत यशश्रीने कुस्तीत दोन हात केले. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत कुस्तीत आपले नाव चमकविणारी यशश्री समाजासाठी प्रेरणादायी आहे.
आरोग्य : सुभाबाई बळीराम टिकनोर
यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथील सुभाबाई बळीराम टिकनोर यांनी आयुष्यभर विना मोबदला बाळंतपणात महिलांची सुखरुप सुटका केली. सुभाबाई बाळाची चार महिने मालिशही करतात. आता गर्भवती महिलांना मार्गदर्शन करून रुग्णालयातच बाळंतपणाचा सल्ला देतात. आरोग्य क्षेत्रात त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
शैक्षणिक : मीरा गुलाबराव टेकाम
नेर तालुक्यातील चिंचगाव येथे मीरा गुलाबराव टेकाम शिक्षिका आहे. त्यांनी यांनी शैक्षणिक कार्यातून आदर्श निर्माण केला. जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त त्यांना मिळाला. एका विद्यार्थिनीचा अपघातात हात तोडावा लागला. तिला कृत्रिम हात मिळवून दिला. मीराताई समाजासाठी प्रेरणादायी आहे.
औद्योगिक/ व्यावसायिक : अपर्णा प्रशांत परसोडकर
व्यवसायात अपर्णा प्रशांत परसोडकर यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. यवतमाळच्या एमआयडीसीत स्वत:चे प्रिंटीग व्यवसाय आहे. अपर्णातार्इंनी केवळ ५०० रुपये भांडवलावर परसोडकर प्रिंटर्स सुरू केले. आज जवळपास एक कोटीचे गुंतवणूक असलेले महाराष्टÑातील त्यांचे एकमेव युनिट असावे. त्यांचा हा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी आहे.
सांस्कृतिक-साहित्यिक : चारूलता राज पावसेकर
यवतमाळच्या सांस्कृतिक क्षेत्रातील नाव म्हणजे चारुलता राज पावसेकर विविध नाट्य महोत्सवात पुरस्कार प्राप्त केले आहे. आपल्या सकस अभिनयाच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. शेतकरी आत्महत्यांवर आधारित आत्मदाह संघर्ष मृत्यूनंतरचा या चित्रपटातही त्यांनी अभिनय केला आहे. रमाई अल्बममध्ये रमाईची भूमिका साकारण्याची संधी त्यांना मिळाली आहे. सांस्कृतिक चळवळीतून समाजाची प्रगल्भता वाढविण्याचे त्यांचे काम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

Web Title: Distinguished service honors today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.